जिल्ह्यात काँग्रेस का ढेपाळलीय हेच कळत नाही – आम. हसन मुश्रीफ

0

 

कोल्हापूर ( प्रतिनिधी ) :

लोकसभा निवडणुकीत देशपातळीवर काँग्रेस प्रचंड सक्रीय झाली आहे. पण राज्यात आणि जिल्ह्यात काँग्रेस का ढेपाळलीय हेच कळत नाही, असा टोला राष्ट्रवादीचे नेते आमदार हसन मुश्रीफ यांनी रविवारी आघाडीच्या बैठकीत काँग्रेस नेत्यांना लगावला. बुधवारी (ता. १७) गांधी मैदान येथे होणाऱ्या शरद पवार यांच्या सभेच्या तयारीसाठी खासदार धनंजय महाडिक यांच्या संपर्क कार्यालयात प्रमुख नेते आणि पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. यावेळी मुश्रीफ यांनी काँग्रेस नेत्यांना चांगलेच टोले लगावले. बुधवारच्या सभेला एक लाख नागरिक आणण्याचा निर्धार आघाडीच्या नेत्यांनी व्यक्त केला.

यावेळी मुश्रीफ म्हणाले, ‘ कोल्हापुरात काही जण ‘आमचं ठरलंय’ म्हणतात, वारणेत जनसुराज्य शक्ती पक्षाचे नेते विनय कोरे यांचे वेगळेच सुरू आहे. मात्र, आत्ता आपण कामाला लागले पाहिजे. जिल्हाध्यक्ष प्रकाश आवाडे यांनी उर्वरित काँग्रेस सोबत घेऊन जोरदार कामाला लागावे. आघाडीच्या कार्यकर्त्यांनी गावागावांत यंत्रणा गतिमान करावी. प्रचाराच्या सात दिवसाच्या कालावधीत कितीही त्रास होऊ दे, कोणत्याही परिस्थितीमध्ये महाडिकांना खासदार करणार, असा निर्धार करुन प्रत्येक कार्यकर्त्याने प्रचारात झोकून द्यावे.’

काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आवाडे म्हणाले, ‘कोल्हापूर व हातकणंगले लोकसभा मतदारसंघात आघाडीच्या उमेदवारासाठी काँग्रेसचे कार्यकर्ते तळमळीने प्रचार करत आहेत. पवार यांच्या सभेला पक्षाचे कार्यकर्ते पक्षाचे झेंडे लावून वाजतगाजत येतील.’

खासदार धनंजय महाडिक म्हणाले, ‘संपूर्ण मतदारसंघात प्रचाराला चांगला प्रतिसाद मिळत आहे. महिला मेळावे, महामेळावा, मतदारांशी संपर्कातून वातावरण निर्मिती झाली आहे. उर्वरित सात दिवसांच्या कालावधीत गावपातळीवर सकाळी नऊ ते दुपारी बारा वाजेपर्यंत प्रचारफेरी आणि कोल्हापुरातील प्रत्येक वॉर्डनिहाय प्रचार फेरीचे नियोजन करावे.’ असे आवाहन केले. याप्रसंगी प्रा. मच्छिंद्र सकटे प्रा. विश्वास देशमुख, दगडू भास्कर यांची भाषणे झाली. जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील यांनी स्वागत केले. कार्याध्यक्ष अनिल साळोखे यांनी आभार मानले. बैठकीला माजी आमदार भरमूअण्णा पाटील, नंदिनी बाभूळकर, शहराध्यक्ष प्रल्हाद चव्हाण, ‘गोकुळ’चे संचालक अरुण डोंगळे, विश्वास जाधव, उदयसिंह पाटील, ‘स्वाभिमानी’चे प्रा. जालिंदर पाटील, भगवान काटे उपस्थित होते. याप्रसंगी उमेदवारी अर्ज माघारी घेतलेल्या यशवंत शेळके यांनी महाडिक यांना पाठिंबा जाहीर केला.

लग्न,मंडप आपल्या दारात, इतरांचा सन्मान राखा

मुश्रीफ म्हणाले, ‘राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी आघाडीतील इतर पक्षांच्या कार्यकर्त्यांचा सन्मान राखावा, त्यांना प्रचाराच्या नियोजनात सामील करून घ्या. कारण लग्न आणि मंडप आपल्याच दारात आहे.’

जेवढी यंत्रणा तेवढी माणसं’

बुधवारच्या सभेसाठी २५ हजार माणसे आणण्याची जबाबदारी आपण स्वीकारत असल्याचे महाडिकांनी सांगितले. तसेच मतदारसंघनिहाय आढावा घेत असताना माजी आमदार के. पी. पाटील यांनी ‘जेवढी यंत्रणा तेवढी माणसे जमतील’असे सुचविले. त्यावर महाडिकांनी, ‘यंत्रणेचा तुटवडा नाही. सभा यशस्वी होण्यासाठी जे नियोजन सांगाल त्याची पूर्तता करू’असे सांगितले.

होळी देवाची पोळी कायम कागलमध्येच

आमदार मुश्रीफ यांनी सभेसाठी पाच हजार माणसे आणू असे सांगितले. त्यावर माजी आमदार के. पी. पाटील यांनी मुश्रीफांचा चिमटा काढला. ते म्हणाले, ‘कागलमधून सभेसाठी पाच हजार माणसे हे मुश्रीफांना शोभणारे नाही. कागलची राखीव फौज त्यांनी मैदानात उतरवावी. पक्षाचे नेते शरद पवार यांनी कागलच्या सभेत त्यांचे प्रचंड कौतुक केले. त्यांना मंत्रिपदाची घोषणा केली. आमच्या मतदारसंघात मात्र सभाही घेतली नाही आणि अन्य काही दिलेही नाही. नाही तर आम्ही सभेला २५ हजार माणसे आणली असती. पण काही गोष्टी आमच्या हातात नाहीत. कारण होळी देवाची पोळी कायम कागलमध्येच पडते’ या वक्तव्यावर मुश्रीफांनाही हसू आवरले नाही.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here