‘ आमचं ठरलय, मंडलिकाना विजयी करून खरं करून दाखवा’ – उद्धव ठाकरे

0

 

गडहिंग्लज : ‘राजर्षी छत्रपती शाहू महाराज आणि प्रतापराव गुर्जर यांच्या पराक्रमाचा वारसा लाभलेल्या कोल्हापूर जिल्ह्यात शिवसेनेचा भगवा फडकलाच पाहिजे. ‘नुसत आमचं ठरलंय म्हणून गप्प बसू नका, ते मंडलिकांना विजयी करून करून खरं करून दाखवा,’ असे आवाहन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केले. गडहिंग्लज येथे शनिवारी महायुतीचे उमेदवार प्रा. संजय मंडलिक यांच्या प्रचारासाठी आयोजित सभेत बोलत होते.

ठाकरे म्हणाले, ‘योजना येतात आणि जातात, सरकार येतं जातं, पण देश स्थिर असतो. देशाच्या हितासाठी नरेंद्र मोदींच्या पाठीशी शिवसेना उभी राहिली आहे. देशात देशद्रोहाचा कायदा आणि काश्मीरमधील ३७० वे कलम काढण्याचा निर्धार काँग्रेस आघाडी सरकारने आपल्या जाहीरनाम्यातून केला आहे. या देशद्रोही मंडळींनाच या निवडणुकीतून आता हद्दपार करा. भाजप-सेना एकत्र येताच काँग्रेस-राष्ट्रवादीच्या भ्रष्ट पुढाऱ्यांच्या पोटात भीतीचा गोळा उठला आहे. म्हणूनच ५६ पक्ष एकत्र येऊन मोदींना विरोध करत आहेत.’

पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, ‘गोकुळ हा महाडिकांचा प्राण आहे. आपली राजकीय समीकरणे बिघडू नयेत म्हणून धनंजय महाडिक यांना शिवसेनेऐवजी राष्ट्रवादीच्या चिन्हावर लढण्याचा सल्ला देण्यात आला. इतकेच नव्हे तर राष्ट्रवादीची उमेदवारी घेण्यासाठी त्यांच्यावर सक्ती करण्यात आली. गोकुळ मल्टिस्टेटसाठी महाराष्ट्र सरकार ना हरकत दाखला देणार नाही.’

यावेळी प्रा. संजय मंडलिक यांनी आपली भूमिका स्पष्ट करून कोल्हापूरच्या विकासासाठी सदैव कटिबद्ध असल्याचे अभिवचन दिले. प्रचारसभेत संजय घाटगे, समरजित घाटगे, आमदार प्रकाश आबिटकर, गोपाळराव पाटील, संग्राम कुपेकर आदींची भाषणे झाली.

…आणि हे महाडिक कुठे?

आपल्या पतीला वीरमरण आले म्हणून खचून न जाता सातारची स्वाती महाडिक सैन्यात दाखल होऊन देशसेवा करते आणि विरोधी पक्षाचे उमेदवार कोल्हापूरचे महाडिक गोकुळची मलई खाण्यासाठी कोणत्याही थराला जातात. तेव्हा महाडिकग्रस्त कोल्हापूर जिल्हा स्वच्छ करा आणि आपलं ठरलं, हे मतदानातून सिद्ध करा, असे आवाहनही ठाकरे यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here