गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या वाहनधारकांनी टोलमाफीसाठी पोलीस स्थानकाशी संपर्क साधावा- दीपक केसरकर

मुंबई गोवा महामार्गाऐवजी पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आवाहन

0

मुंबई : गणेशोत्सव काळात कोकणात जाणाऱ्या भाविकांनी मुंबई गोवा महामार्गावरील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पर्यायी मार्गाचा वापर करावा. तसेच कोकणात जाणाऱ्या मार्गावर टोलमाफी करण्यात आली असून त्यासाठी जवळच्या पोलीस स्थानकात जावून पाससाठी माहिती द्यावी, असे आवाहन गृह (ग्रामीण) राज्यमंत्री दीपक केसरकर यांनी केले आहे. श्री. केसरकर यांनी सांगितले की, गणेशोत्सव काळात मुंबईहून अनेक चाकरमानी कोकणात जात असतात. त्यांच्यासाठी मुंबई-गोवा महामार्गावर सुविधा देण्यात आल्या आहेत. या मार्गावरील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी रायगडमध्ये जाणाऱ्यांनी द्रुतगतीमार्गे खोपोली, पाली मार्गाचा वापर करावा. रत्नागिरीत जाणाऱ्यांनी कराड-चिपळून मार्गाचा तर सिंधुदुर्गला जाणाऱ्यांनी कोल्हापूर, गगनबावडा मार्गे तसेच सावंतवाडीला जाणाऱ्यांनी निपाणी, अंबोली घाट मार्गाचा वापर करावा. कोकणात जाणाऱ्या वाहनांसाठी सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांनी टोलमाफी जाहीर केली आहे. टोलमाफीसाठी नागरिकांनी आपले नाव, वाहनाचे नाव, कोठे जाणार त्या गावाचे नाव आदी तपशील जवळच्या पोलीस स्थानकावर द्यावा, असे आवाहनही श्री. केसरकर यांनी केले आहे.

सार्वजनिक बांधकाम विभागाने मुंबई गोवा महामार्गाचे काम केले असून त्या कामांची नुकतीच सार्वजनिक बांधकाम मंत्री (सार्वजनिक उपक्रम वगळून) चंद्रकांत पाटील यांनी पाहणी केली आहे. या मार्गावर पोलीस, संबंधित जिल्हा प्रशासन व परिवहन विभागाने एकत्रितपणे मदत केंद्र उभारण्यात येणार आहे. वाहतूक कोंडीच्या काळात मदतीसाठी क्रेन, तसेच आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. नागरिकांनी या केंद्राशी संपर्क साधावा, असेही श्री. केसरकर यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here