माध्यमांमधील विविध प्रवाह एकमेकांना पूरक – आलोक जत्राटकर

0

कोल्हापूर : स्वयंनियमन, गुणवत्तापूर्ण पत्रकारिता आणि विश्वासार्हता ही आजच्या काळात माध्यमांची फार मोठी गरज आहे. काल सुसंगतता टिकवत ज्या माध्यमांनी नव तंत्रज्ञानाचा झपाट्याने स्वीकार केला अशीच माध्यमे काळाच्या ओघात टिकून आहेत. माध्यमामध्ये एकीकडे स्पर्धा वाढत असली तरी मुद्रीत, इलेक्ट्रॉनिक व सामाजिक हे माध्यम प्रवाह एकमेकांना परस्पर पूरक ठरत आहेत, असे प्रतिपादन शिवाजी विद्यापीठाचे जनसंपर्क अधिकारी आलोक जत्राटकर यांनी केले.

राष्ट्रीय प्रेस दिनानिमित्त विभागीय व जिल्हा माहिती कार्यालयाच्यावतीने विभागीय माहिती कार्यालय, कोल्हापूर येथे `माध्यमासमोरील आव्हाने` या विषयावरील कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यामध्ये मार्गदर्शन करताना ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माहिती उपसंचालक सतीश लळीत होते. यावेळी जिल्हा माहिती अधिकारी वर्षा पाटोळे, सहायक संचालक एस.आर.माने, पत्रकार सर्वश्री विश्वास पाटील, गुरुबाळ माळी, समीर मुजावर, विजय कुंभार आदी उपस्थित होते.

वाढत्या गतीमानतेशी जुळवून घेण्याबरोबरच गुणवत्ता, वैशिष्ट्यपूर्ण, मुल्याधिष्ठीत आशय जपणे हे आज प्रत्येक माध्यमासमोरील आव्हान असल्याचे सांगून आलोक जत्राटकर म्हणाले, प्रत्येक व्यवस्थापनासमोर बदल हा अपरिहार्य झाला आहे. सध्याच्या काळत इलेक्ट्रॉनिक माध्यमांचा पगडा वाढत असला तरी मुद्रीत माध्यमांचे महत्व अबाधित आहे. प्रत्येक टप्प्यावर आलेल्या आव्हानांना समर्थपणे तोंड देत मुद्रीत माध्यमे टप्‍प्याटप्‍प्याने वाढतच गेली आहेत. ज्या वर्तमानपत्रांचे जनमानसात स्थान टिकून आहे त्यामध्ये नव तंत्रज्ञानाची स्वीकारार्हता हा भाग अत्यंत महत्वाचा ठरला आहे. सध्याच्या काळात साखळी वर्तमान पत्रे मोठ्या संख्येने वाढत आहेत त्याचा फायदा वाचक, जाहिरातदार या साऱ्यांना होत आहे. पण त्याचवेळी गुणवत्तापूर्ण वार्तामुल्यासाठी उत्तम विश्लेषण क्षमता असणाऱ्या माध्यमांची नितांत गरज निर्माण झाली आहे. शब्दमर्यादेमुळे व्यक्त होण्यावरही मर्यादा येत आहे. अनेक प्रकारची कामे हाताळू शकणाऱ्या मनुष्यबळाची माध्यम जगताला गरज असून सोशल मीडिया हे फार मोठे व्यासपीठ म्हणून उदयाला येत आहे. यातून माहितीचा प्रस्फोट होत असतानाच अत्यंत संवेदनशील असणारे हे माध्यम कसे हाताळावे याबाबतचे ज्ञान देणे आवश्यक आहे.

गतीमानता हा आजच्या जीवनाचा स्थायीभाव असला तरी माणसाच्या जीवनाची सुरुवात आणि शेवट हा माध्यमांच्या गराड्यातच होणे ही माध्यमांची ताकद असल्याचे सांगून माहिती उपसंचालक सतीश लळीत म्हणाले, सशक्त लोकशाहीसाठी समर्थ माध्यमांचे महत्व फार मोठे आहे. वृत्तपत्रांची आर्थिक उतरंड सध्याच्या काळात महत्वाची ठरत असून अशावेळी लहान, जिल्हा वर्तमान पत्रांना टिकून राहण्यासाठी आधार देणे हे शासनाबरोबरच वाचकाचे कर्तव्य आहे. माध्यमे ही सरकारला दिशा देण्याचे, लोकमत अधोरेखित करण्याचे महत्वाचे काम करीत असतात त्यामुळे चांगल्या लोकशाहीसाठी वर्तमानपत्राचे अस्तित्व महत्वाचे आहे.

इलेक्ट्रॉनिक माध्यमांच्या तुलनेत मुद्रीत माध्यमांनी आपली विश्वासार्हता मोठ्या प्रमाणात जपली आहे, असे सांगून सतीश लळीत म्हणाले सध्याचा सोशल मीडिया हा मोठ्या चर्चेचा विषय आहे. या माध्यमाने गांभिर्य आणि विश्वासार्हता जपली नाही तर ते फार मोठी झेप घेऊ शकणार नाही. अत्यंत चांगले व्यासपीठ असूनही अनेकदा निष्काळजीपणे हाताळल्याने अनेक गंभीर प्रसंग निर्माण होऊ शकतात.

कार्यक्रमाचे प्रस्ताविक जिल्हा माहिती अधिकारी वर्षा पाटोळे यांनी केले. सूत्रसंचालन सहायक संचालक एस.आर.माने यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here