आरोग्य सेवेच्या बळकटीकरणासाठी विविध योजना – डॉ. दीपक सावंत

0


राज्यातील आरोग्य सेवेचे बळकटीकरण करण्यासाठी शासनाने अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. बाईक ॲम्ब्युलन्स, महात्मा फुले जनआरोग्य योजना, शिवआरोग्य टेलिमेडिसीन, वैद्यकीय अधिकाऱ्यांसाठी विशेष अभ्यासक्रम, मेमरी क्लिनिक, मौखिक आरोग्य योजना, १०४ क्रमांकाची हेल्पलाईन, बाळासाहेब ठाकरे अपघात विमा योजना, कॅन्सरची जनजागृती, अवयवदान मोहिम आदी विषयांची सविस्तर माहिती डॉ. सावंत यांनी दिली आहे.

प्रश्न १)- महाराष्ट्र राज्याला देशातील सर्वोत्कृष्ट आरोग्य सेवा पुरविणारे राज्य म्हणून पहिला मान मिळाला आहे त्याबद्दल आम्हाला सांगा.

इंडिया टुडे पाक्षिकाने एक सर्व्हे केले त्यात विविध राज्याचे अहवाल मागविण्यात आले होते. छोट्या लोकसंख्येची राज्य आणि मोठ्या लोकसंख्येची राज्य अशी त्यांची वर्गवारी केली आणि त्या सर्व्हेतून सगळ्या कामकाजाचा लेखाजोखा तयार करण्यात आला होता त्यातून महाराष्ट्र राज्याला उत्तम आरोग्य सेवा पुरवणारे राज्य, मोठा गट म्हणून बक्षीस देण्यात आले. भूपृष्ठमंत्री गडकरी साहेबांच्या हा हस्ते पुरस्कार देण्यात आले. महाराष्ट्रासाठी खरोखरच ही एक कौतुकाची गोष्ट आहे.

प्रश्न २) आरोग्य सेवेच्या बळकटीकरणासाठी मागच्या तीन महिन्यामध्ये शासनातर्फे वेगवेगळे निर्णय आणि उपक्रम राबविण्यात आले त्याबद्दल काही सांगा.
पालघर टास्कफोर्स ही एक नवीन संकल्पना मुख्यमंत्री महोदयांनी अंमलात आणली .या टास्कफोर्सचे उद्देश राज्यातील कुपोषण, बालमृत्यू आणि अर्भकमृत्यू यांचा दर कमी करणे असा आहे. शासनाने गावागावांतील आशा वर्कर्स, अंगणवाडी सेविका, ग्रामसेवक, एएनएम आणि सरपंच यांचे समूह बनवले. हे समूह त्यांच्या गावातील कुपोषित बालकांच्या घरापर्यंत गेले, त्यांनी कुपोषित बालकांना बरे करण्याच्या उपाययोजनांची माहिती दिली. सरपंचांना सांगितले की त्यांच्या भागातील कुपोषित बालकांना बरे करणे, त्यांना आहार, लसीकरण व्यवस्थित मिळतो आहे की नाही याची काळजी घेणे हे त्यांचे देखील कर्तव्य आहे. यांचे परिणाम फार छान मिळाले. आज अर्भक मृत्यु दर २१ वरून १९ वर आलेला आहे . बालमृत्यू आणि अर्भक मृत्यू दरात घट करून केरळ आणि कर्नाटक राज्याच्या पुढे जायचं आहे. केरळमधली आरोग्यसेवा आणि इन्फेकशन कंट्रोल सिस्टम वाखाणण्यासारखी आहे. एका रुग्णाला दिवसातून फक्त ३ नातेवाईकांना भेटता येईल ते ही संपूर्ण निर्जंतुकीकरण केल्यानंतर असे निर्बंध त्यांनी घातले आहे. अशाप्रकारचे सिस्टम आपल्याकडे सुरु करण्याचे प्रयत्न शासन करीत आहे. याबरोबरच आरोग्य संस्थांच बळकटीकरण करण्यासाठी ११० नवीन संस्थांची स्थापना आणि नवीन पद-निर्मिती करण्यात आली आहे. सिव्हिल डॉक्टर्सच्या निवृत्तीचे वय ५८ वरून ६० वर करण्यात आले आहेत. कॉलेज ऑफ फिजिशियन अँण्ड सर्जन्सच्या माध्यमाने ९ शाखांमध्ये सीपीएस नावाचा एक नवीन कोर्स सुरु करण्यात आला आहे ज्यामुळे आरोग्य खात्याचे स्वतःचे डॉक्टर्स तयार होतील. भूलतज्ज्ञ, स्त्रीरोग, बालरोग तसेच क्षयरोग या विषयांचे पदविका केलेल्या डॉक्टर्सची पहिली बॅच ऑक्टोबर-नोव्हेंबरच्या आसपास तयार होईल. बळकटीकरणाच्या दुसऱ्या टप्प्यात डीएनबी हा एमडीच्या समांतर असा कोर्स सुरु करण्याचे प्रयत्न आरोग्य खाते करीत आहेत.

प्रश्न – बाईक ॲम्ब्युलन्स या योजनेबद्दल आम्हाला सांगा.
शासनाद्वारे १०८ ही ॲम्ब्युलन्स सेवा चालवली जाते. ॲडवान्सड लाईफ सपोर्ट सिस्टम आणि बेसिक लाईफ सपोर्ट सिस्टम या दोन प्रकारच्या ॲम्ब्युलन्स उपलब्ध आहेत. शहरामध्ये वाहतूक कोंडीची समस्या असल्यामुळे रुग्णांपर्यंत पोहोचणे कठीण होते आहे. गोल्डन अवर मध्ये रुग्णाला सेवा मिळण्याकरिता लंडन बाईक ॲम्ब्युलन्सच्या धर्तीवर बाईक ॲम्ब्युलन्स ही योजना सुरु करण्यात आली आहे. मुख्यमंत्री महोदय आणि शिवसेना प्रमुखांच्या हस्ते या सेवेचे उद्घाटन करण्यात आले होते. या योजनेच्या माध्यमातून १३०२ रुग्णांना मृत्युशय्येवरून वाचवण्यात आले आहे. दर महिन्याला २५०-३०० रुग्णांना ही सेवा देण्यात येत आहे. या सेवेच्या बळकटीकरणासाठी मुंबई मध्ये १०, पालघर मध्ये १० आणि मेळघाट मध्ये १० अशा एकूण ३० ॲम्ब्युलन्सचा ताफा पुरवण्यात आला आहे. यामध्ये चालक स्वतः डॉक्टर असल्यामुळे रुग्णांची आरोग्यसेवा त्वरित सुरु होते आणि मग त्यांना १०८ क्रमांकाच्या ॲम्ब्युलन्सद्वारे शासकीय रुग्णालयात नेण्यात येते. गेल्या ५ वर्षाच्या काळात १०८ ॲम्ब्युलन्स सेवेच्या माध्यमातून ५ लाखाहून अधिक रुग्णांना आरोग्य सेवा अगदी विनामूल्य देण्यात आली आहे. फक्त सरकारमान्य आणि निमसरकारी रुग्णालयांत ही सेवा मोफत उपलब्ध आहे.

प्रश्न – महात्मा फुले जन आरोग्य योजना आरोग्य विभागाने राबविलेली आहे त्यासंदर्भात काय सांगाल ?
महात्मा फुले जन आरोग्यसेवेला आणखी बळकट करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. वाढत्या वयानुसार गुडघ्याचे आजार, पाठीच्या कण्यांचे आजार किंवा कॅन्सरसारख्या आजारामुळे रुग्ण हवालदील होत आहेत. अशा रुग्णांना या योजनेमध्ये समाविष्ट करून घेण्याचे प्रयत्न आरोग्य विभागाने केले आहे. यामुळे गरीब माणसाला मोठ्या रुग्णालयात आरोग्यसेवा उपलब्ध झाली आहे. या योजनेमुळे मोठ्या प्रमाणात या रोगांवर मात करणे शक्य झाले आहे.

प्रश्न : शिवा-आरोग्य टेलिमेडिसीन या अभिनव सेवेबद्दल काय सांगाल?
महाराष्ट्रामध्ये एम.डी., एम.एस केलेले वेगवेगळ्या विषयातले तज्ज्ञ डॉक्टर्सचे प्रमाण वाढविण्यासाठी मुख्यमंत्री महोदयांनी जिथे शासकीय रुग्णालय तिथे मेडिकल कॉलेज ही संकल्पना राबविलेली आहे. प्रत्येकाला आरोग्यसेवा पुरविण्यासाठी आवश्यक आहे. शहरी भागातील रुग्णासारखेच ग्रामीण भागातील रुग्णालाही सेकंड-ओपिनियन घेता यावा आणि तज्ज्ञ डॉक्टरांची सेवा मिळावी म्हणून शिव-आरोग्य टेलीमेडिसिनची सुरुवात करण्यात आली. चिखलदऱ्यासारख्या दुर्गम भागातील रुग्णाला मुंबईच्या नानावटी किंवा जे.जे. रुग्णालयासारख्या सरकारी रुग्णालयाशी संपर्क साधून रोगाचे निदान व उपचार करता यावे, तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला मिळावा अशी ही योजना आहे. चिखलदऱ्यातील एक कोरकू मुलगी जिला आय.टी चे ज्ञान आहे तिला प्रशिक्षण देण्यात आले. ती मुलगी कोरकू भाषेत रुग्णांना त्यांच्या समस्या विचारून तज्ज्ञ डॉक्टरांना इंग्रजी, हिंदी किंवा मराठी भाषेत सांगते आणि डॉक्टरांनी सांगितलेले उपाय कोरकू भाषेत रुग्णांना सांगते. असेच इतर आदिवासी भाषेतील लोकांना प्रशिक्षण देऊन टेलीमेडिसीन सुरु करण्यात येणार आहे. याचबरोबर रिअल टाइम मेडिसीन ही संकल्पना सुरु करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. मुंबईतील रुग्णाच्या हृदयाचे ठोके दुबईच्या एखाद्या तज्ज्ञ डॉक्टरला तेव्हाच्या-तेव्हा बघता येईल आणि ते आपले ओपिनियन देऊ शकतील. ही सेवा प्रायोगिक तत्वावरती ६ जिल्ह्यामध्ये घेऊन जाण्याचे कार्य सुरु आहे. सध्या फक्त मेळघाट मध्ये ही सेवा उपलब्ध आहे. यात काही मर्यादा आहेत. इंटरनेट सेवा जिथे उपलब्ध असेल तिथेच हे तंत्रज्ञान चालेल. सोसाट्याचा वारा किंवा पाऊस असल्यास ही यंत्रणा चालणार नाही. यावर उपाय शोधणे सुरु आहे.

प्रश्न- राज्यामध्ये मेमोरी क्लिनिक सुरु करण्याचा विभागाचा मानस आहे त्याबद्दल सांगा.
सध्या स्मृतिभ्रंश या आजाराची वाढ झालेली दिसून येत आहे. आजारात विसराळूपणा येतो. रुग्ण जवळच्या नातेवाईकांना सुद्धा ओळखत नाही. अशावेळी नातेवाईकांनी कसे वागावे, रुग्णाची काळजी कशी घ्यावी,आजाराचं लवकर निदान करता यावे यासाठी मेमरी क्लीनिक ही संकल्पना राज्यातील ६ जिल्ह्यामध्ये सुरु करण्यात आली आहे. या आजारावर एक घोषवाक्य तयार केले आहे , ‘जे तुम्हाला विसरले त्यांना तुम्ही विसरू नका’

प्रश्न -आरोग्य विभागाद्वारे मौखिक आरोग्य योजना राबविली जाते त्याबद्दल आम्हाला सांगा.
सध्या मुख कॅन्सर, स्तन कॅन्सर आणि सर्व्हाईकल कॅन्सरचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. पहिला टप्पा म्हणून २ कोटीहून अधिक मुखरोग कॅन्सरग्रस्त रुग्णांची पाहणी केली. आशा वर्कर,एम.पी.डब्ल्यू, ए.एन.एम यांना प्रश्नावली देण्यात आली आणि काही बेसिक गोष्टींची माहिती देण्यात आली पाहणी केलेल्या रुग्णांमधून ज्यांना जबडा उघडण्यास त्रास असणारे, जिभेवर पॅच असणारे, तोंडामध्ये व्रण असणारे, तंबाखू खाण्याची सवय असणारे, धूम्रपानाची सवय असणारे रुग्ण यांना त्यांच्या आजाराच्या श्रेणीनुसार वेगळे केले. उपकेंद्रांपर्यंत ही चळवळ नेण्यात आली. आता आरोग्यविभागामार्फत बायोप्सी आणि इतर चाचणी करून त्या रुग्णांवर निदान व उपचार केले जाणार आहे. रुग्णांचे ऑपरेशन सुद्धा केले जाणार तसेच दुःखशामक काळजी केंद्र सुरु करण्याची तयारी आहे. यामुळे त्यांना दिलासा मिळेल. याप्रकारे आरोग्य विभाग मौखिक आजारावर मात करण्याचे प्रयत्न करीत आहे.

प्रश्न : आपण सांगितलेल्या या योजना आधी उपलब्ध नव्हत्या काय ?
या उपाययोजना आधी उपलब्ध होत्या परंतु त्यांना एक छत्राखाली आणणे गरजेचे होते. मुखाचे कॅन्सर प्रचलित होते पण अशाप्रकारे लोकांपर्यंत जाऊन चळवळ सुरु करणे महत्त्वाचे होते. ॲक्टिव्ह आणि पॅसिव्ह सर्वेक्षण करून २ कोटीहून अधिक लोकांपर्यंत पोहोचता आले हे जास्त महत्त्वाचे आहे.

प्रश्न – मुख कॅन्सर या आजारांबद्दल जनजागृती निर्माण व्हावी म्हणून आरोग्यविभागतर्फे वेगळ्याप्रकारचे उपक्रम राबविण्यात आले त्याबद्दल सांगा.
मुख कॅन्सर या आजारांबद्दल जनजागृती निर्माण व्हावी यासाठी एक महत्त्वाचा उपक्रम म्हणजे टाटा मेमोरियल रुग्णालयाच्या माध्यमातून किती लोक धूम्रपान करतात, तंबाखूचे सेवन करतात त्यांचा एक सर्वे करण्यात आला. त्याचबरोबर डॉक्टरांनी कॅन्सर कसा तपासावा याचे ऑनलाईन प्रशिक्षण देण्यात आले. डॉक्टरांनी ऑनलाईन व्हीडिओ बघायचे, त्यातल्या गोष्टी आत्मसात करायच्या आणि दिलेल्या प्रश्नांची उत्तरे द्यायची. परीक्षेत उत्तीर्ण नाही झाले तर पुन्हा परीक्षा देण्याची मुभा आहे, अश्याप्रकारे डॉक्टरांचे ज्ञानवर्धन होत राहील.

प्रश्न- कधीकधी डॉक्टर वेळेवर उपलब्ध नसतात अशावेळी आरोग्यसेवा कशाप्रकारे देण्यात येईल?
डॉक्टर वेळेवर उपलब्ध नसतात अशावेळी आरोग्यसेवा देण्यासाठी बायोमेट्रिक हजेरी हे उपाय केले होते. त्यापेक्षा चांगले उपाय म्हणजे १०४ हेल्पलाईन. सिव्हिल रुग्णालयात जर डॉक्टर उपलब्ध नसेल तर १०४ डायल केल्यावर एक तासाच्या आत दुसरे डॉक्टर उपलब्ध करण्यात येईल. डॉक्टरांनी सुद्धा सुट्टी घ्यायची असल्यास रितसर अर्ज देऊन आणि वरिष्ठांना कळवूनच सुट्टी घ्यावी. सूचना दिल्याशिवाय गैरहजर राहणे चुकीचे आहे.

प्रश्न- बाळासाहेब ठाकरे अपघात विमा योजनेचे लाभ कोणा-कोणाला घेता येईल आणि त्यातील तरतुदी काय आहेत?
कर्नाटकच्या धर्तीवर “बाळासाहेब ठाकरे अपघात विमा योजना” हे एक महत्त्वाकांक्षी उपक्रम आरोग्य विभागाद्वारे सुरु करण्यात येणार आहे. यासाठी हॉस्पिटल एप्लायमेंटचे काम सुरु आहे. महाराष्ट्रात अपघात झालेल्या व्यक्तीला रुग्णालयातील पहिल्या तीन दिवसांचे ३० हजारापर्यंत मोफत औषध आणि उपचार दिले जाणार आहे. या योजनेची रचना ३ टप्प्यात केली आहे. नुसते खरचटले असेल तर टाके लावण्यासाठी लेव्हल-१, फ्रॅक्चर असेल तर लेव्हल-२, मल्टिपल फ्रॅक्चर, रक्तस्राव किंवा डोक्याला दुखापत झाली असेल तर लेव्हल-३ चे हॉस्पिटल अशी वर्गवारी करण्यात येणार आहे. यापुढे जाऊन लंडन आणि अमेरिकेच्या धर्तीवर आजारानुसार रुग्णालयात भरतीसाठी कार्ड सिस्टम योजना राबविण्यात येणार आहे.

प्रश्न- आरोग्य विभागातर्फे अवयवदान जनजागृती मोहीम राबविण्यात येत आहे, त्याबद्दल काही सांगा.
अवयवदानाबद्दल जनजागृती हा फार महत्त्वाचा विषय आहे. विभागातर्फे एक मोबाइल ॲप तयार करण्यात येणार आहे ज्यावर अवयवदानाबद्दल संपूर्ण माहिती उपलब्ध होऊ शकेल. याचप्रकारे ज्या रुग्णालयात अवयवदान होते तिथे वेटिंग रूम मधल्या टीव्हीवर अवयवदानाची माहिती सांगणारे व्हीडिओ दाखविण्यात यावे असे प्रयत्न सुरु आहेत जेणेकरून मेंदूमृत असलेल्या रुग्णाचे नातेवाईक जर तिथे असतील तर त्यांचे विचार परिवर्तन होऊन निश्चितच ते अवयवदानाकरिता प्रवृत्त होतील.

प्रश्न- अवयवप्रत्यारोपण करताना होणारे गैरप्रकार टाळण्यासाठी विभागातर्फे काय प्रयत्न सुरु आहेत?
किडनी ट्रान्सप्लांट साठी एस.ओ.पी. तयार करण्यात आली आहे, त्यात मार्गदर्शक सूचना आहेत. किडनी दानबद्दल माहिती, दान करताना काय काळजी घ्यावी, डॉक्टर्सनी रुग्णाच्या नातेवाईकांना किडनी प्रत्यारोपण आणि ऑपरेशननंतर घ्यावयाची काळजी पुढचे परिणाम आदी माहिती देणे आणि माहिती देताना व्हीडिओग्राफी करणे, सोबतच अवयवदान करणाऱ्या व्यक्तीची बायोमेट्रिक नोंदणी करणे आणि संपूर्ण प्रक्रिया आधारकार्डशी जोडलेली असणे अशा सूचना असलेला एस.ओ.पी करण्यात आला आहे. त्यामुळे किडनीदान मधील गैरप्रकारावर आळा बसण्यास मदत होईल.

प्रश्न- आरोग्य विभागाच्या भविष्यातील योजनाबद्दल सांगा.
केरळ आणि कर्नाटक राज्याच्या बरोबरीने बालमृत्यूवर मात करण्याचे आणि सर्व ६ कोटी जनतेपर्यंत आरोग्यसेवा पुरवण्याचे प्रयत्न विभाग करणार आहे. ८०% जनता ही खाजगी रुग्णालयात उपचार घेते हा गैरसमज दूर करून आरोग्य खात्यात लोकांना चांगले उपचार मिळावे आणि प्रत्येक प्रायमरी आरोग्यसेवा केंद्र एम.बी.बी.एस. आणि बी.ए.एम.एस. डॉक्टरांनी भरलेले असायला हवे यादृष्टीने आरोग्यखाते प्रयत्नशील असणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here