काम सुरू न करण्यावर “उचंगी” प्रकल्पग्रस्त ठाम

0

आजरा (प्रतिनिधी) :

प्रकल्पग्रस्तांच्या मागण्या पूर्ण झाल्याशिवाय “उचंगी”चे उर्वरित काम सुरू करू देणार नाही, या भूमिकेवर प्रकल्पग्रस्त चाफवडे (ता. आजरा) येथील बैठकीत ठाम राहिले. प्रशासन तुमच्या मागण्याबाबत सकारात्मक आहे. तुम्हीही दोन पाऊले पुढे या, असे अप्पर जिल्हाधिकारी नंदकुमार काटकर यांनी केलेले आवाहनही प्रकल्पग्रस्तांनी धुडकावून लावले.

आजरा तालुक्यातील उचंगी पाटबंधारे प्रकल्पाची घळभरणी तसेच इतर कामे करण्याचे नियोजन बुधवारी प्रशासन व लोकप्रतिनिधी यांनी केले होते. मात्र त्यावेळी मागण्या पूर्ण झाल्याशिवाय काम सुरू करण्यास प्रकल्पग्रस्तांनी विरोध केला. या पार्श्वभूमीवर शुक्रवारी चाफवडे येथे बैठक आयोजित केली होती. या बैठकीला आमदार श्रीमती संध्यादेवी कुपेकर, अप्पर जिल्हाधिकारी नंदकुमार काटकर, प्रांताधिकारी संपत खिलारी, पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंता स्मिता माने, तहसिलदार अनिता देशमुख, सभापती रचना होलम, शिवसेना जिल्हाप्रमुख विजय देवणे, संग्राम कुपेकर, सुनिल शिंत्रे, प्रभाकर खांडेकर, संजय तर्डेकर, युवराज पोवार उपस्थित होते.

प्रशासनाची भुमिका मांडताना काटकर यांनी प्रशासनाने घेतलेली सकारात्मक बाजू स्पष्ट केली. सनदशीर मार्गाने प्रकल्पग्रस्तांच्या हिताची भुमिका कायद्याच्या चौकटीत राहून बजावल्याचे सांगितले. याचबरोबर धरणाची उंची, तसेच पुनर्वसनाच्या प्रश्नाचा आढावा घेतला. प्रशासन प्रकल्पग्रस्तांच्या बाबतीत दहा पाऊले पुढे आले आहे. प्रकल्पग्रस्तांनी किमान दोन पाऊले पुढे येणे गरजेचे आहे.

यावेळी धरणग्रस्तांनी संकलन रजिस्टर अद्ययावत केल्याशिवाय धरणाच्या कामाला हात लावू देनार नसल्याची भूमिका घेतली. जमिनिच्या बदल्यात आर्थिक पॅकेजला विरोध केला. धरणाची उंची वाढल्यास पुन्हा नव्याने पुनर्वसनाचा प्रश्न जन्माला येईल असे सांगितले. १६ एकर निर्वाह क्षेत्राबाबत पुर्नविचार करावा अशी मागणी करण्यात आली.

यावेळी बोलताना आमदार श्रीमती कुपेकर म्हणाल्या, धरणाच्या उंचीला जो प्रकल्पग्रस्तांचा विरोध आहे. याबाबत जलसंपदा मंत्र्यांची भेट घेण्यात येईल. तसेच त्यांच्या भावना पुन्हा एकदा महसूलमंत्र्यांना कळविण्यात येतील. प्रकल्पग्रस्तांनी सहकार्य केल्यास काही प्रमाणात कामास सुरूवात करता येईल. पण प्रकल्पग्रस्तांच्या विरोधात जाऊन काम केले जाणार नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here