उचंगी प्रश्नाबाबत तातडीने निर्णय घ्या ; आमदार संध्यादेवी कुपेकरांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन

0

गडहिंग्लज ( प्रतिनिधी ) :
उचंगी धरणाचे काम आणि धरणग्रस्तांच्या पुनर्वसनाच्या प्रश्नाबाबत लोकप्रतिनिधी व धरणग्रस्तांची संयुक्त बैठक झाली आहे. या बैठकीत विविध गोष्टींवर चर्चा झाली असून या चर्चेच्या अनुषंगाने प्रश्न सोडविण्यासाठी तातडीने निर्णय घ्यावा अशी मागणी आमदार संध्यादेवी कुपेकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनातून केली आहे.
उचंगीतील सध्याच्या धरणग्रस्त शेतकऱ्यांना देय असणारी जमीन उपलब्ध नाही. यामुळे उंची दोन मीटरने कमी करावी, अन्यथा आणखी ७० खातेदार बुडीत क्षेत्रात येणार असून त्यांना द्याव्या लागणाऱ्या जमिनी कोठून उपलब्ध करणार असा प्रश्न धरणग्रस्तांनी केला होता. धरणग्रस्तांनी मांडलेल्या समस्या, लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाकडून झालेली चर्चा यातून मार्ग काढून निर्णय घेण्यासाठी तातडीने बैठकीचे आयोजन करावे अशी मागणीही कुपेकर यांनी केली.
उचंगीबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा झाल्यानंतर महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयात येत्या चार दिवसात बैठक घेतली जाईल अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिल्याचे कुपेकर यांनी सांगितले. उचंगीबाबत झालेल्या चर्चेतून धरणग्रस्तांचे प्रश्न सोडविण्यासाठी झालेल्या निर्णयांची अंमलबजावणी तातडीने होणे गरजेचे आहे. येत्या चार दिवसात कोल्हापूर येथे होणाऱ्या बैठकीत हा प्रश्न सुटेल अशी आशा कुपेकर यांनी व्यक्त केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here