हत्येच्या वर्षभरानंतर एपीआय अश्विनी बिद्रेंच्या बदलीची ऑर्डर

0

कोल्हापूर : सहाय्यक पोलिस निरीक्षक अश्विनी बिद्रे यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या बदलीची ऑर्डर निघाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अश्विनी बिद्रे यांचा मृत्यू झालेला असताना आणि वरिष्ठ पोलिस अधिकारी अभय कुरुंदकर यांच्यावर बिद्रेंच्या हत्यासंदर्भातला गुन्हा दाखल असताना महाराष्ट्र पोलिसांनी 31 मे 2017 रोजी त्यांची वर्ध्यात बदली झाल्याचं कागदोपत्री दाखवलं आहे.

11 एप्रिल 2016 रोजी भाईंदरमधल्या फ्लॅटमध्ये अभय कुरुंदकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी अश्विनी बिद्रे यांची हत्या केल्याचं तपासात निष्पन्न झालं आहे. बिद्रेंचा मृतदेह लोखंडी पेटीत बंद करुन 12 एप्रिल 2016 रोजी वर्सोवा खाडीत टाकण्यात आला होता. अश्विनी बिद्रे यांच्याशी संपर्क न झाल्याने त्यांच्या कुटुंबीयांनी 14 जुलै 2016 रोजी कळंबोली पोलिस ठाण्यात मिसिंगची तक्रार दाखल केली होती.
31  जानेवारी 2017  रोजी ठाणे ग्रामीणचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभय कुरुंदकर यांच्यासह त्यांच्या साथीदारांवर अश्विनी यांचं हत्येच्या उद्देशाने अपहरण केल्याचा गुन्हा दाखल झालेला आहे. अश्विनी मयत आहेत, असं समजून अश्विनीचे पती आणि त्यांची दहा वर्षाची मुलगी अश्विनीच्या मृत्यूचा दाखला मिळवण्यासाठी अनेक महिने प्रयत्न करत आहेत. तर अश्विनीच्या मृत्यूपश्चात पोलिस दलातील सेवेत कुटुंबातील एकाला सामील करुन घ्यावे अशी मागणी त्यांनी पोलिस खात्याकडे लेखी स्वरुपात केली होती. मात्र अश्विनी बिद्रे यांचे पती राजू गोरे यांच्या हातात अश्विनी बिद्रे यांची बदली विशेष पोलिस महानिरीक्षक कैसर खलीद यांनी 31 मे 2017 रोजी वर्धा येथे केल्याचा कागद समोर ठेवला गेला आणि हा कागद पाहिल्यानंतर गोरे कुटुंबीय हादरुन गेले.
विशेष पोलिस महानिरीक्षक कैसर खलीद, कोकण विशेष पोलिस महानिरीक्षक प्रशांत बुरडे, ठाणे ग्रामीण पोलिस अधीक्षक डॉक्टर महेश पाटील यांनी पोलिस अधिकारी अश्विनी बिद्रे हत्याकांडातील आरोपींना पुरावे नष्ट करण्यासाठी मदत केल्याचा आरोप अश्विनीचे पती राजू गोरे यांनी केला आहे. अश्विनी बिद्रे यांची हत्या झाल्याचे सबळ पुरावे न्यायालयात सादर केले असताना तीन वर्षानंतर अशा पद्धतीचा बदलीचा कागद समोर आणून पोलिसांनी या प्रकरणाला वेगळी कलाटणी देत दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला आहे, असंही गोरे म्हणतात.

काय प्रकरण आहे?

अश्विनी जयकुमार बिद्रे 2000 सालापासून स्पर्धा परीक्षेची तयारी करत होत्या. 2005 साली त्यांचा विवाह हातकणंगले गावातील राजू गोरे यांच्यासोबत झाला. लग्न झाल्यानंतर एकाच वर्षात अश्विनी स्पर्धा परीक्षा पास झाल्या आणि त्यांना पोलिस उपनिरिक्षक पद मिळालं.
पोलीस दलात रुजू झाल्यानंतर त्यांची पहिली पोस्टिंग पुणे आणि त्यानंतर सांगली इथे झाली. यावेळी त्यांची ओळख त्याच पोलीस ठाण्यात असणाऱ्या वरिष्ठ पोलिस अधिकारी अभय कुरुंदकर यांच्यासोबत झाली. या दोघांमध्ये जवळीक वाढली होती. त्यानंतर 2013 साली अश्विनी गोरे यांना प्रमोशन मिळाल्याने त्या रत्नागिरीला रुजू झाल्या. इथेही अभय कुरुंदकर अश्विनीला भेटण्यासाठी वारंवार येत होता. हे सर्व प्रकरण अश्विनी यांचे पती आणि वडिलांना समजलं.

अश्विनी आणि अभय यांच्यात वाद

अभय कुरुंदकर आणि अश्विनीमध्ये सतत वाद होत होते. तेव्हा कुरुंदकरने अश्विनी यांना गायब करण्याच्या धमक्याही पतीला दिल्या होत्या. यामुळे अश्विनी यांचं कुटुंब व्यथित झालं होतं. या काळातच 2015 साली अश्विनी यांची बदली नवी मुंबईतील कळंबोली पोलिस ठाण्यात झाली. मात्र त्या हजर झाल्या नाहीत. त्या हजर का झाल्या नाहीत? या आशयाचं पत्र पोलिस खात्यानेही पाठवलं. त्यावेळी अश्विनीच्या घरातील लोकांना त्या गायब झाल्याचं लक्षात आलं. त्यांनी कळंबोली पोलिसात याची तक्रार दाखल केली.
अश्विनी आणि अभय कुरुंदकर यांच्यातील वादाचे, प्रेमाचे सर्व संवाद अश्विनी यांनी आपल्या संगणकात रेकॉर्ड करुन ठेवले होते. अश्विनीच्या घरातील मंडळींनी जेव्हा संगणक पाहिला, त्यावेळी या गोष्टी उघड झाल्या. अभय कुरुंदकरने भांडणादरम्यान वारंवार जीवे मारण्याच्या धमक्या दिल्याचं उघड झालं. हे सर्व पुरावे कळंबोली पोलिसांना देताच अभय करुंदकर तात्काळ रजेवर गेला. दरम्यान, अश्विनी बिद्रेंची हत्या झाल्याचे पोलिसांच्या तपासात उघड झाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here