राज्यात ‘स्पर्श’ कुष्ठरोग जनजागृती अभियान राबविणार

0

आरोग्य सेवा सहसंचालक डॉ. संजीव कांबळे यांची माहिती


मुंबई :
कुष्ठरोगाविषयीची माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यत पोहोचविण्यासाठी 26 जानेवारी रोजी घेण्यात येणाऱ्या ग्रामसभेमध्ये संपूर्ण राज्यात स्पर्शकुष्ठरोग जनजागृती अभियान राबविण्यात येणार आहे, अशी माहिती आरोग्य सेवा (कुष्ठरोग व क्षयरोग), सहसंचालक डॉ. संजीव कांबळे यांनी आज राज्य कुष्ठरोग जनजागरण प्रसिध्दी समितीच्या बैठकीत दिली.

यावेळी प्रधानमंत्री यांच्या प्रगती योजनेत कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रमाचा समावेश करण्यात आला असून यावर्षी 26 जानेवारी रोजी केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार संपूर्ण देशभरामध्ये ‘स्पर्श’ कुष्ठरोग जनजागृती राबविण्यात येणार आहे. या अभियानाअंतर्गत ग्रामपंचायत असलेल्या प्रत्येक गावांमध्ये विशेष ग्रामसभा घेण्यात येणार आहे. या ग्रामसभेमध्ये जिल्हाधिकारी यांची घोषणा, सरपंच यांचे भाषण ‘सपना’ ने द्यावयाचे संदेश, कुष्ठरोगाविषयी शास्त्रीय माहिती, समाजामध्ये असलेले कुष्ठरोगाविषयीचे गैरसमज, व्याख्याने, निबंध स्पर्धा, प्रश्नमंजुषा यासारखे कार्यक्रम कुष्ठरोग जनजागृतीसाठी घेण्यात येणार आहे. अशीही माहिती त्यांनी यावेळी दिली.

यानुसार राज्यात स्पर्श कुष्ठरोग जनजागृती अभियान यशस्वी करण्यासाठी आयुक्त आरोग्य सेवा व अभियान संचालक राष्ट्रीय आरोग्य अभियान महाराष्ट्र शासन मुंबई यांनी राज्यातील सर्व जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी यांना पत्राद्वारे कळविले आहे. जिल्हास्तरावर जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी जिल्हा समन्वय समितीची सभा घेऊन स्पर्श कुष्ठरोग जनजागृती अभियान राबविण्याबाबत सर्व विभागांना सूचना दिल्या असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

या अभियानासाठी सहसंचालक आरोग्य सेवा (कुष्ठरोग ) यांच्या कार्यालयातून संपूर्ण राज्याच्या ग्रामसभांचे नियोजन करण्यात येत आहे. तसेच या अभियानासाठी जिल्हा परिषदेमधील सर्व विभागांचा सहभाग हा पंचायत विभागाच्या पुढाकाराने घेण्यात येणार आहे. जेणेकरुन या ग्रामसभांना चांगली उपस्थिती राहून कुष्ठरोगाची माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचणार असल्याचे त्यांनी सांगितले.

या रूग्णांना भविष्यात होणाऱ्या विकृती टाळण्यासाठी त्यांचे लवकर निदान होणे गरजेचे असते. यासाठी कुष्ठरोगबाधित रूग्णांना उपचाराखाली आणण्यासाठी शासकीय तसेच सामाजिक बांधिलकी असलेल्या सर्व यंत्रणांनी या कार्यासाठी मदत करावी, असे आवाहन यावेळी डॉ. संजीव कांबळे यांनी केले.

राज्य आरोग्य शिक्षण व संपर्क विभाग पुणे यांच्यावतीने आरोग्य भवन येथे बैठक पार पडली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी आरोग्य सेवा संचलनालय मुंबईचे संचालक डॉ. बी.डी.पवार, राज्य आरोग्य शिक्षण अधिकारी हरिदास धनवडे, राज्य समन्वयक आयलेप पुणे चे डॉ. मिलिंद चव्हाण, मुंबई आकाशवाणीचे कार्यक्रम अधिकारी हशम मसुरकर आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here