या गावात आहे खरेखुरे प्रजासत्ताक गणतंत्र..!

0

दीडशे वर्षाच्या गुलामीनंतर स्वतंत्र झालेला भारत 26 जानेवारी 1950 रोजी खऱ्याअर्थाने प्रजासत्ताक झाला. या प्रजासत्ताकचे कौडकौतूक भारतासाठी नेहमीच आगळे वेगळे राहिलेले आहे. पण या कौतुकात भारताचे प्रजासत्ताक नक्की आहे कुठे.? आहे काय.? याचा प्रश्न अनेकांना पडत असतो. या सत्तर वर्षात भारतीय नागरिकांची वाटचाल या आदर्श गणतंत्र प्रजासत्ताकाच्या दिशेने किमानपक्षी झालीय का असाही सवाल अनेकांच्या मनात येत असतो. सगळीकडे अनागोंदी सुरू असताना आदर्श प्रजासत्ताकाची अपेक्षा थोडी धूसर वाटू लागते. पण औरंगबद जिल्ह्यातल्या पोखरी गावातलं चित्र मात्र थोडंस वेगळं आहे. कारण या गावाने अवघ्या काही दिवसात मोठ्या कष्टाने आपली वाटचाल खऱ्याखुऱ्या प्रजास्तकाच्या दिशेने केलीय… ही आहे या गावाच्या आदर्श प्रजासत्ताकाची काहणी…

औरंगाबादहुन जालनाच्या दिशेने निघालं की केम्ब्रिज चौकतुन डावीकडे सिल्लोड बायपासला वळायचं चार एक किलोमीटरचा अंतर कापला की पोखरी फाटा येतो. या पोखरी फाट्यावर उजव्या हाताला वळल्यानंतर दीड किलोमीटर अंतरावर पोखरी हे गाव लागतं… ज्या गावाची ओळख परिसरात आदर्श गाव म्हणून आहे. गावात पेव्हर ब्लॉकचे पक्के रस्ते, प्रत्येक घराच्या अंगणात बांधलेलं टॉयलेट, ड्रेनेज लाईनची व्यवस्था, रस्त्यात कुठेही पाण्याचे लोंढे नाहीत की चिखलही नाही. सगळीकडे स्वच्छता, हिरवीगार झाडं, मोठी जुनी झाडं अजूनही तशीच अजस्त्र पसारा घेऊन उभी असलेली. खरंतर कुठल्याही आदर्श गावात गेलं तर हे सुखावह चित्र दिसतच मग आदर्श प्रजासत्ताक म्हणण्यासारखं या गावात काय आहे. असा प्रश्न कुणालाही पडू शकतो. त्याचाच शोध घेत आपण जेव्हा गावातल्या गल्ल्या तुडवू लागतो तेंव्हा त्याचं उत्तर मिळू लागतं. गावात फिरतांना अगदी कोणत्याही घरावर त्या घरातल्या कुटुंबप्रमुखांची नावे लिहिलेली पाहायला मिळतात त्यात पुरुष प्रमुखांच्या नावाबरोबर स्त्री प्रमुखाचीही नावे लिहिलेली आढळून आली. खरंतर नावं लिहून जबादारी संपत नाही तर त्या घराच्या मालकी हक्कातही त्या स्त्रीला स्थान असावं आणि नेमकं तेच स्थान या गावाने दिलंय, प्रत्येक घराच्या नमुना नंबर 8 च्या प्रत्येक स्त्रीला अगदी सन्मानाने अर्धी भागीदारी देण्यात आलीय. हीच या गावाची प्रजासत्ताक गणतंत्राची पहिली पायरी आहे. पण या गावाने याही पुढे आणखी खूप मजल मारलीय.

स्त्रीला संपत्तीत वाटा देऊन हे गाव थांबलं नाही तर या गावात स्त्रियांच्या जन्मदारात कमालीची वाढ झालीय. अंगणवाडी सेविका असलेल्या रुक्मिणी साळवे सांगत होत्या की “सगळ्या गरोदर मातांच रेकॉर्ड माझ्याकडे असतं गेल्या 15 वर्षात माझ्या गावात एकही स्त्रीभ्रुण हत्या झालेली नाही.” मी सहज म्हणून त्या गावाच्या मुलांच्या जन्मच राजिस्टर तपासलं तर त्यात खूप सुखावह चित्र पाहायला मिळालं सण 2016 / 17 चं रेकॉर्ड नुसार या गावात गतवर्षी फक्त चार मुलं जन्माला अलीयेत तर तब्बल सात मुली जन्माला आल्या आहेत. देशभर मुलींच्या प्रमानात कमालीची घट होत असताना या गावाने मारलेली ही मजल खूप उल्लेखनीय आहे. अंगणवाडी सोडून गावातल्या शाळेतील मुला मुलींचं प्रमाण पाहिलं तर तिथेही मुलीचं सरस निघाल्या. सातवीपर्यंत शाळा असलेल्या या गावातल्या शाळेचा विद्यार्थी पट आहे 96 चा आणि त्यात मुली आहेत तब्बल 53 तर मुलांची संख्या मात्र फक्त 43 इतकी आहे. म्हणजे या गावात मुलांपेक्षा मुलींचं प्रमाण जास्त आहे. ज्या गावाने कोवळ्या काळयांना फुलण्यासाठी मोकळं आकाश खुलं करून दिलं त्या गावातलं प्रजासत्ताक आदर्श नाही का म्हणता येणार…

महिलांच्या बाबतीत गावातलं असं बोलकं चित्र आहे. अगदी तसंच राजकीय बाबतीतही गावातलं चित्र सर्वसमावेशक आहे. गावात गेल्या अनेक वर्षांपासून सरपंच आणि सदस्य हे बिनविरोध निवडले जातात. यावेळेला अमोल काकडे हे ओपन कॅटेगरीतले सरपंच आहेत. पण यापूर्वी गावाने रेखाताई गोरे या ओबीसी सुतार समाजातल्या अत्यंत अल्पसंख्याक समाजातल्या महिलेलाही बिनविरोध निवडून गावाचा कारभार करण्याची संधी दिली होती. तर त्यापूर्वी भाऊसाहेब मगर या दलित समाजातल्या सापांचनेही पाच वर्षे गावाचा यशस्वी कारभार केला होता. जातीपातीच्या भिंती पाडून या गावातले सार्वजनिक संधीची योग्य वाटणी करताय त्यामुळे सामाजिक अन्यायाचा लवलेस सुद्धा या गावाच्या वेशीवर नसतो. आजही गावातले असंख्य निर्णय हे ग्रामसभेच्या परवानगीशिवाय होत नाहीत. आणि ग्रामसभेला प्रत्येकवेळी कोरम हा पूर्ण असतोच आणि गावातल्या गरीबातल्या गरीब व्यक्तीलाही बोलण्याची पूर्ण संधी दिली जाते. गावातले सगळे प्रशासकीय व्यवहार हे ऑनलाइन करण्यात आले आहेत. त्यामुळे दाखले देताना कसलेही हेवेदावे नाहीत की लाचारी नाही. पण हे एवढ्यावरच थांबलं नाही तर देशात कुठेच आढळणार नाही अशी झिरो पेंडंशी या गावाने पाळलीय म्हणजे कुठलेच दाखले देण्यासाठी वेळ लागत नाही. अर्ज आला की दाखला तयार इतकी तत्परता या गावात असते. त्यामुळे इथलं प्रशासन प्रजाफ्रेंडली झालेलं आहे. प्रजासत्ताक झालेलं आहे.

पीपल फ्रेंडली कार्यक्रम राबवल्यामुळे या गावाच्या ग्रामपंचायतीला iso नामांकन सुद्धा मिळालंय. गाव शंभर टक्के हागणदारी मुक्त आहे. शासनाने मंजूर केलेलं साडेबारा हजार रुपयांचं अनुदान देऊन प्रत्येकाच्या घरात पक्के टॉयलेट बांधण्यात आलेत. त्याचा शंभर टक्के वापर होतोय. सार्वजनिक स्वच्छतागृह ही गावात आहेतच. दलीत वस्तीचाही सर्वांगीण विकास झालेला आहे. दलित वस्तीत सगळीकडे पक्के सिमेंटचे रस्ते आहेत, टॉयलेट आहे, आणि पाण्याचा नळ प्रत्येकाच्या दारात ठरलेला आहे. गावात अपंगाचीही विशेष काळजी घेतली जाते. शासनाने सुरू केलेल्या अपंगाच्या एक टक्का निधीचंही इथे पारदर्शक वाटप होतं एका पायाने अपंग असलेल्या प्राची नवगिरे या नववीत शिकणाऱ्या गरीब विद्यार्थिनीला या निधीतूनच 10 हजाराची मदत देण्यात आलीय. त्यामुळे तिच्या पुढील शिक्षणाला खूप मोठा आधार मिळतो आहे. प्राची सारखे इतरही आणखी चार जण गावात आहेत. त्यांनाही अशीच दहा दहा हजाराची मदत देण्यात आलीय. आणि विशेष म्हणजे ही मदत दरवर्षी दिली जाणार आहे. अपंग मदत निधीची काटेकोर अंमलबजावणी करणारी बहुदा ही महाराष्ट्रातली पहिली ग्रामपंचायत असावी, अन्यथा इतर ग्रामपंचायतीत सरळ सरळ अपहार होत असतो.

भ्रष्टाचार आणि प्रशासन हे अलिकडलं देशातलं सहज सोप्प समीकरण बनलंय पण या गावात मात्र भ्रष्टाचाराचा लवलेश नाही. मुळात गावात निवडणूक होत नाही, त्यामुळे मतदानासाठी पैसे वाटणे नाही की कुणाला हात जोडणे नाही. वृत्तीने प्रामाणिक असलेल्या सात माणसांची बॉडी ग्रामसभा निवडते त्यातलाच एखादा सरपंच केला जातो आणि सुरू होतो गावाच्या विकासाचा कारभार, मामला सगळा ऑनलाइन असल्याने भ्रष्टाचाराला कसलाच थारा नाही. त्यामुळे सगळे व्यवहार परदर्शल होतात. गावाची घरपट्टी पाणीपट्टी वसुली ही चांगली होते. वसुली शंभर टक्के व्हावी यासाठी गावात मोफत पिठगिरणी सुरू करण्यात आलीय. अवघ्या पाच रुपयात पिण्याचं शुद्ध आरओ फिल्टर पाणी दिलं जातं त्यामुळे आजाराचं प्रमाण 70 टक्क्यांवर खाली आलंय गावात एकही हॉस्पिटल नाही गेल्या सात वर्षात एकही साथीचा आजार पसरलेला नाही. चौका चौकात बसलेल्या प्रत्येक म्हाताऱ्याच्या चेहऱ्यावर तेज आणि समाधान झळकत होतं.

नुकत्याच झालेल्या कर्जमाफीत गावातल्या फक्त चारच लोकांना कर्जमाफीचा लाभ मिळालाय उर्वरित सगळे लोक नियमित कर्जफेड करतात, त्यामुळे त्यांना कर्जमाफी देण्याचा सवालच नव्हता. पण चिंता, काळजी किंव्हा हुरहूर गावातल्या कुण्याही शेतकऱ्याला नाही. बँकेची वसुलीही 90 टक्के असते. शासनाचं कर्ज बुडवायचं नाही हा या गावाचा शिरस्ता प्रत्येक माणूस नेटाने पाळतो. म्हणून तर या गावातला लोकांना प्रजासत्ताकचे खरेखुरे पाईक समजले पाहिजेत, गावात ही पराकोटीची शिस्त निर्माण होणे आणि प्रत्येक व्यक्तीने नियमाने आणि नीतिमत्तेने वागणे ही बाब सहज शक्य झालेली नाही. विशेष म्हणजे या गावातली ही आदर्श पायवाट निर्माण करण्यासाठी गावाला कुणी मासिहासुध्दा भेटला नाही गावातल्या प्रत्येक नागरिकाने स्वयंशिस्त पाळून गावात हे असे अनेक आदर्श निर्माण केलेत. त्यामुळे हे गाव खरंखुरं प्रजासत्ताक गणतंत्र ठरतं आहे. चौफेर नीतिमत्तेचा अंधार पसरत असताना या गावाने पेटवलेला प्रजसत्ताकाचा महायज्ञ, देशाला नवी दिशा देणारा ठरणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here