या सरकारचा पायगुणच चांगला नाही राज्यात नुसत्या अळयाच अळया –अजित पवारांची सरकारवर खोचक टिका

0

अन दादांनी सिंहासन खुर्ची नाकारली…

नांदेड ( उमरी )  – या सरकारचा सत्तेत आल्यापासून पायगुणच चांगला नाही.शेतकऱ्यांच्या शेतात बोंडअळीने, तुडतुडया अळीने धुमाकुळ घातला आहे. हे सरकारच अळी असल्याची जोरदार टिका अजित पवार यांनी उमरीच्या जाहीर सभेत केली.

अजित पवार यांनी आपल्या भाषणामध्ये सरकारवर हल्लाबोल करतानाच भाजप नेत्यांच्या वक्तव्यावर आणि त्यांच्या कारभारावर जोरदार हल्ला केला. अजित पवार यांनी भाजप नेत्यांचे खुमासदार किस्से सांगतानाच भाजप प्रवेशकर्ते नारायण राणे यांनाही त्याच्या प्रवेशावर चिमटे काढले.

भारनियमनमुळे लोकं त्रासली होती १२ डिसेंबर १२ ला आम्ही शरद पवार साहेबांच्या वाढदिवशी राज्याला भारनियमनमुक्त केले. शेतकऱ्याला पार संपवायचं ठरवलं आहे का,भाव देत नाही सोयबीनला योग्यपध्तीचा दर देत नाही,साखरेचे भाव वाढवले,खताच्या किमती वाढवायच्या पाणीपट्टी वाढवायची मग आम्ही प्रपंच कसा करायचा असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे असेही अजित पवार म्हणाले.

गोदावरी नदी वर्षानुवर्ष वाहत जात होती. परंतु गोदावरीवर बॅरेजस केल्यानंतर आमच्यावर टिका झाली पण आज त्या नदीच्या बाजुचा परिसर हिरवागार झाला आहे. परंतु हेच बॅरेजस बंद करण्याचा घाट सरकार करत आहे असेही अजित पवार म्हणाले.

कुणीही निवडून आले तरी आपल्याला काय फरत पडतो या पध्दतीमुळे जनतेचे नुकसान होत आहे. आपले प्रश्न समजण्याची आणि सोडवण्याची दृष्टी असणारे नेते जनतेने निवडून दिले पाहिजे. या देशाचे कृषीमंत्री कोण आहेत हे जनतेला माहित नाही. त्याचं नाव राधामोहन असले तरी त्यांच्यात राधाही नाही आणि मोहनही नाही अशी टिका अजित पवार यांनी कृषीमंत्र्यांवर केली.

हे सरकार गाजर दाखवण्यात फार हुशार आहे. सामान्य माणूस, शेतकरी, कामगार यांना तर भाजपने गाजर दाखवलेच पण मुख्यमंत्र्यांनी एका माजी मुख्यमंत्र्यांलाही मंत्रीपदाचे गाजर दाखवून ताटकळत ठेवले आहे.अशी टिकाही दोन्ही आजी-माजी मुख्यमंत्र्यावर अजित पवार यांनी केली.

अन दादांनी सिंहासन खुर्ची नाकारली…

सभेच्याठिकाणी अजित दादा यांचे आगमन झाले त्यावेळी सभास्थळी पदाधिकाऱ्यांनी दादांसाठी महाराजासाठी वापरली जाणारी सिंहासनासारखी खुर्ची ठेवली होती आणि इतर नेत्यांसाठी दुसऱ्या खुर्च्या इतरांना होत्या.मात्र ही गोष्ट लक्षात आल्यावर दादांनी त्या सिंहासन खुर्चीवर बसण्यासा नकार दिला आणि ती खुर्ची काढायला लावली आणि साध्या खुर्चीव दादा बसले.दादांचा हा साधेपणा जमलेल्या हजारो नागरीकांना भावला.

सभेमध्ये प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांनी आपल्या भाषणामध्ये सरकारच्याविरोधात जनता रोष व्यक्त करत  रस्त्यावर उतरत आहे  हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या हल्लाबोल आंदोलनाचे यश असल्याचे सांगितले. मराठवाडयामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे हे हल्लाबोल आंदोलन यशस्वी होत असून आता बदलाच्या परिवर्तनाची लाट आल्याचेही सुनिल तटकरे म्हणाले.

विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी आठ महिने झाले सरकारने कर्जमाफीची घोषणा करुन मात्र माझ्या जनतेला ऑनलाईनच्या गर्तेत अडकवून ठेवले आहे.कर्जमापी योजनेला नाव देवून हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाची फसवणूक केली आहे असा आरोप धनंजय मुंडे यांनी केला.

या सभेला प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे, विधीमंडळ पक्षनेते अजित पवार, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, पक्षाचे मुख्य प्रवक्ते नवाब मलिक, माजी मंत्री अनिल देशमुख, महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ, आमदार विक्रम काळे, आमदार सतिष चव्हाण, आमदार रामराव वडकुते, माजी आमदार कमलकिशोर कदम, आमदार जयदेव गायकवाड, युवक प्रदेशाध्यक्ष संग्राम कोतेपाटील, विदयार्थी अध्यक्ष अजिंक्यराणा पाटील, प्रदेश सरचिटणीस बसवराज नागराळकर, ओबीसी सेलचे अध्यक्ष ईश्वर बाळबुधे,  नांदेड जिल्हाध्यक्ष बापूसाहेब गोरठेकर, माजी खासदार गंगाधररावजी कुंटूरकर, राष्ट्रवादी महिला काँग्रेस राष्ट्रीय सरचिटणीस सोनाली देशमुख, हरिहर भोसीकर, विश्वनाथ पाटील आदींसह असंख्य कार्यकर्ते, पदाधिकारी मोठया संख्येने उपस्थित होते.

सभेच्या सुरुवातीला उमरीच्या तहसिलदारांना निवेदन देण्यात आले.  या सभेमध्ये अनेक संभाजी ब्रिगेडच्या लोकांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here