हल्लाबोलच्या दुसऱ्या टप्प्याला उदयापासून मराठवाडयातून सुरुवात- सुनिल तटकरे

0

तुळजापूरच्या आई भवानीच्या साक्षीने होणार हल्लाबोल…

  मुंबई राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने काढलेल्या हल्लाबोल पदयात्रेला जनतेचा उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला आणि आत्ता हल्लाबोलचा दुसरा टप्पा मराठवाडयातून उदयापासून सुरु होत असून इथेही जनतेचा उदंड प्रतिसाद मिळेल असा विश्वास प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांनी पत्रकार परिषदेमध्ये व्यक्त केला.

 हल्लाबोल आंदोलनाच्या तिसऱ्या टप्प्याच्या पूर्वनियोजनासाठी आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची बैठक राष्ट्रवादी भवन येथे पार पडली. उत्तर महाराष्ट्रात हा तिसरा टप्पा पार पडणार आहे. या आंदोलनाची सांगता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या नाशिक येथील सभेने होणार आहे. तसेच येणाऱ्या काळामध्ये पश्चिम महाराष्ट्रातही हल्लाबोल आंदोलन घोषित करु असे सुनिल तटकरे यांनी सांगितले.

 त्यांनी पत्रकारपरिषदेमध्ये बोंडअळी रोगाने कापूस शेतीचे झालेले नुकसान,ओखी वादळाने शेतकरी व मच्छीमारांना बसलेला फटका, शेतकऱ्यांना न मिळालेली कर्जमाफी या प्रश्नांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमदारांनी अधिवेशन काळात पाठपुरावा केला. विरोधीपक्षाच्या आक्रमकतेमुळे सरकारने मदतीची घोषणा केली. मात्र त्या घोषणांची पूर्तता अदयाप झालेली नाही. या सरकारने कर्ज घेण्याचा एकप्रकारे विक्रमच केला आहे. मात्र सर्वसामान्य जनतेच्या पायाभूत सुविधा सुटलेल्या नाहीत ते त्यापासून वंचित आहेत. येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये श्वेतपत्रिका काढण्याची मागणी आम्ही करणार असल्याचेही सुनिल तटकरे यांनी यावेळी सांगितले.भीमा कोरेगाव प्रकरण हाताळण्यामध्ये सरकार अपयशी ठरले आहे. या सर्व परिस्थितीला जनता कंटाळली आहे अशी खंत सुनिल तटकरे यांनी व्यक्त केली.

 राष्ट्रवादी काँग्रेस युवक प्रदेशाध्यक्ष संग्राम कोतेपाटील यांच्या अध्यक्षतेखाली विविध ठिकाणी मेळावे घेवून जनजागृती केली जात आहे तर महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यादेखील महिला अत्याचाराच्याविरोधात आवाज उठवत आहेत याबाबत सुनिल तटकरे यांनी समाधान व्यक्त करत २६ जानेवारीला होणाऱ्या संविधान बचाव आंदोलनामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सहभागी होणार असल्याचे जाहीर केले.या पत्रकारपरिषदेला महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ,प्रदेश उपाध्यक्ष अशोक धात्रक,भारती पवार आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here