सरकार बहुमताच्या जोरावर अधिवेशन गुंडाळण्याचा प्रयत्न करत आहे – अजित पवार यांचा आरोप

0

नागपूर – विदर्भासह राज्यातील इतर विभागातील जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी आणखी दोन आठवडे अधिवेशनाचा कालावधी वाढवण्याची मागणी करुनही बहुमताच्या जोरावर अधिवेशन लवकर संपवण्याचा घाट घालणाऱ्या बेजबाबदार आणि समाजातील कुठल्याच घटकाला न्याय न देणाऱ्या सरकारचा विरोधकांनी तीव्र शब्दामध्ये निषेध केला असल्याची माहिती विधीमडंळ पक्षनेते अजित पवार यांनी मिडियाशी बोलताना दिली.

नागपूर अधिवेशनाच्या कामकाजासाठी आज कामकाज सल्लागार समितीची बैठक नागपूर येथे पार पडली. या अधिवेशनाच्या अगोदर कामकाज सल्लागार समितीची मुंबईमध्ये बैठक झाली.त्यावेळी विरोधी पक्षाच्या सदस्यांनी नागपूरचे अधिवेशन चार आठवडयाचे चालवावे अशी मागणी केली होती. त्यावेळी नागपूरमध्ये अधिवेशनाच्या दुसऱ्या आठवडयाच्या बुधवारी बैठक घेवू आणि कामकाज वाढवण्यासंदर्भात निर्णय घेवू असे ठरले होते.आज आम्ही विरोधी पक्षाचे सदस्य बैठकीला उपस्थित होतो. या बैठकीमध्ये आम्ही अधिवेशन अजुन दोन आठवडे वाढवा अशी मागणी केली. परंतु येत्या शुक्रवारीच सरकार अधिवेशन बहुमताच्या जोरावर गुंडाळणार आहे असा आरोप अजित पवार यांनी केला.

अधिवेशनाच्या पहिल्या दोन आठवडयामध्ये शनिवार-रविवार सोडला तर दहाच दिवस कामकाज झाले. त्यात पहिले दोन दिवस फक्त गोंधळामध्ये गेले. विधानपरिषदेमध्ये सात दिवस आणि विधानसभेमध्ये आठ दिवसाचे कामकाज होणार आहे. त्यातून काहीच न्याय मिळालेला नाही. ना धान उत्पादकाला, कापूस उत्पादकाला, बोंडअळीची नुकसानभरपाई मिळाली नाही, ना तुडतुडयाकरीता भरपाई मिळाली, कर्जमाफीबद्दलच्या अजुनही नवीन नवीन गोष्टी पुढे येत आहेत असा टोलाही लगावला.

महाराष्ट्रातील जनतेला मला सांगायचे आहे की, ११ डिसेंबरपासून अधिवेशन सुरु झाले. वेगवेगळ्या संघटनांचे मोर्चे निघाले,त्यांच्या मागण्या त्यांनी मांडल्या आहेत. मात्र याबाबत सरकार सकारात्मक दिसत नाही. नागपूर शहराचे मुद्दे गटनेते जयंत पाटील यांनी उपस्थित केले. त्यावर मुख्यमंत्र्यांनी पूर्वीपेक्षा कायदा व सुव्यवस्था चांगली चालली आहे असे सांगत पोलिसांचे अभिनंदन केले.मात्र अभिनंदन केले त्याच दिवशी नागपूरमध्ये हत्या झाली.मुख्यमंत्र्याच्या घराजवळच दरोडे पडत आहेत.चोऱ्यांचे प्रमाण वाढले आहे.कायदा आणि सुव्यवस्थेचा बोजवारा उडाला आहे तरीदेखील मुख्यमंत्री त्यावर पांघरुण घालण्याचा केविलवाणा प्रयत्न करत असल्याचा आरोप अजित पवार यांनी केला.

आम्ही पहिल्यांदा मागच्या गुरुवारी विरोधीपक्षांनी प्रश्न उपस्थित केला होता त्याचे उत्तर अजुनही दिलेले नाही. उदयाला आमचा नवीन प्रश्न येईल. मंगळवारच्या प्रश्नावर चर्चादेखील सुरु झालेली नाही. आज लक्षवेधी ९ प्रकरणांच्या लागल्या. त्याच्यामध्ये कित्येक सन्मानिय विदर्भातील सदस्यांच्या आग्रही मागण्या होत्या. सध्या सभागृहामध्ये सिरियसपणा नाही. आजदेखील प्रश्न विचारला त्यावेळी त्या खात्याचे मंत्रीच सभागृहामध्ये नाहीत. मग संसदीयकामकाजमंत्री दिलगिरी व्यक्त करतात. वास्तविक विरोधकांच्या चर्चेच्यावेळी मुख्यमंत्र्यांनी सभागृहामध्ये हजर राहणे आवश्यक आहे. तो एक विरोधी पक्षाच्या नेत्याचा मान असतो. परंतु मुख्यमंत्रीसुद्दा हजर रहात नाहीत.ज्या खात्याची चर्चा असते त्या खात्याचे मंत्रीदेखील हजर नसतात. अशापध्दतीने सरकारचे संपूर्णपणे दुर्लक्ष सुरु आहे असा आरोप त्यांनी केला.

विधीमंडळाच्या कामकाजाला महत्व दयायला पाहिजे. त्या आयुधाचा वापर करुन सदस्य कामकाजात भाग घेत असतात. आज गाजलेला वीज प्रश्न. शेतकरी वीजबील भरत आहेत तरीही त्यांचे वीज कनेक्शन तोडलं जात आहे.अरे त्यांचे तरी कनेक्शन तोडू नका.पैसे भरले नसतील तर त्यांना हप्ते पाडून दया. पुढच्यावर्षीच्या बियाण्याबद्दल काय निर्णय घेणार त्याबद्दल सरकार बोलत नाही. कुठलंही समाधानकारक उत्तर सरकार देत नाही आणि आज तर आम्ही अजून दोन आठवडे अधिवेशनाचा कालावधी वाढवावा अशी मागणी केली.यामध्ये वेगवेगळ्या चर्चा, लक्षवेधी, प्रश्नोत्तरे याबाबत चर्चा झाली असती.त्यामध्ये विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रातील प्रश्न आहेत याला कसा न्याय मिळेल असा प्रयत्न सरकारकडून व्हायला हवा होता असे अजित पवार म्हणाले.

परंतु कामकाज समितीची बराचवेळ मिटिंग चालली .पण बहुमताच्या जोरावर आमची मागणी होती ती फेटाळून लावली. या सरकारला विदर्भातील जनतेला न्याय दयायचा नाहीय. प्रत्येकदिवशी या सरकारने उत्तर दिले आहे अधिवेशन संपायच्या आत मदत करणार.परंतु किती मदत करणार हे सांगितले नाही. आजपर्यंत एकाही प्रश्नाचे उत्तर समाधानकारक दिले नाही. अतिशय बेजबाबदार आणि दुर्लक्ष करणारे सरकार असून आम्ही त्यांचा निषेध करतो असेही अजित पवार म्हणाले.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here