मराठा लाइट इन्फंर्ट्री भारतीय लष्करातले गौरवशाली रेजिमेंट – डाॅ. जितेंद्र आव्हाड

0

मराठा आणि दलितांमध्ये दुफळी निर्माण करायचं काम इंग्रजांना आणि पेशव्यांना जितकं सफाईदारपणे जमलं नव्हतं त्यापेक्षा भीमा-कोरेगाव दंगली आधी/नंतर मनुवाद्यांनी केलं आहे. या प्रकरणानंतर आम्ही महार रेजिमेंटवर सविस्तर माहिती दिली. आज मराठा लाइट इन्फंर्ट्री या भारतीय लष्करातल्या तितक्याच गौरवशाली रेजिमेंटवर बोलणार आहे.

सुरुवातीला आपल्या वखारींचे सुरक्षा रक्षक म्हणून इंग्रज स्थानिक भारतीयांना ईस्ट इंडिया कंपनीच्या नोकरीत ठेवायला लागले. कंपनीचा विस्तार होऊ लागल्यावर आणि इथल्या राजे रजवाड्यांशी संघर्षाला सुरुवात झाल्यावर कंपनीच्या लष्करी गरजा वाढल्या. प्रत्येक सैनिक इंग्लंडहून आणणं शक्य नव्हतं. मद्रास, कलकत्ता आणि मुंबई इथे त्यांनी भारतीयांना नोकरीत ठेवून पलटणी उभारल्या. इंग्रजांचं काम किती पद्धतशीर होतं पहा. ईस्ट इंडिया कंपनीचा अधिकृत इतिहासकार रोबेन ऑर्मे याच्या कागदपत्रांनुसार कर्नल बॅरिक्लोस आणि कर्नल व्हॅन्स केनेडी हे त्यासाठी तामिळ आणि मराठी शिकले.

या पलटणीना पूर्ण प्रशिक्षण देऊन त्यांच्या आधुनिक रेजिमेंट तयार करण्याचा निर्णय १७४२ साली झाला आणि मेजर जनरल स्ट्रिंगर लाॅरेन्सच्या हाताखाली ब्रिटिश इंडियन आर्मीची पहिली ज्येष्ठ रेजिमेंट १७६८ साली तयार झाली, ती मरहट्टा (मराठा) लाईट इन्फंर्ट्री!

आज बेळगावला मुख्यालय असलेली मराठा रेजिमेंट भारतीय लष्कराची शान आहे. अफगाणिस्तान, बलुचिस्तान, इराक, म्यानमार आणि दुसर्या महायुद्धात तिने गाजवलेल्या शौर्याच्या गाथा प्रसिद्ध आहेत. मुर्री टोळ्यांचे क्रूर हल्ले अन्नपाण्यावाचून थोपवत आणि ब्रिटिश सैन्याची कुमक येईपर्यंत तिने अफगाणिस्तानात काहूनचा किल्ला सहा महिने शर्थीने लढवला. अनेक देशांमध्ये लष्करी प्रशिक्षणात हा लढा अभ्यासक्रमात आहे.

११ डिसेंबर १९४१ हा दिवस मराठा रेजिमेंटच्या इतिहासातला एक अनोखा दिवस मानावा लागेल. पूर्व आफ्रिकेत जर्मन-इटालियन सैन्याशी लढताना तिचा धीर खचला. आपण लढाई हरणार हे लक्षात आल्यावर कॅप्टन बुमगार्ट या इंग्रज कमांडिंग ऑफिसरने, “बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय, हर हर महादेव”, ही घोषणा अस्खलित मराठीत दिली आणि आपल्या संगीनधारी रायफलने तो शत्रूवर तुटून पडला. मराठ्यांचं रक्त त्यानंतर इतकं खवळलं की जर्मन-इटालियन सैन्याची अक्षरशः कत्तल झाली. खंदकांमध्ये प्रेतांचा खच पडला. इतिहासकार विल्यम शिररने या लढाईचं सुरेख वर्णन केलं आहे. मराठा लाईट इन्फंर्ट्रीला तिची युद्धगर्जना एका शूर आणि चाणाक्ष इंग्रज अधिकार्याने दिली. कॅप्टन बुमगार्ट या लढाईत स्वतः मारला गेला. नाईक यशवंत घाडगे आणि शिपाई नामदेव जाधव यांना ब्रिटिश सरकारचा सर्वोच्च शौर्य पुरस्कार व्हिक्टोरिय क्राॅस मिळाला.

गेल्याच वर्षी भारतीय कमांडोंनी म्यानमारच्या जंगलात हेलिकॉप्टरने उतरून तिथे लपलेल्या नागा दहशतवाद्यांना कंठस्नान घातलं अशी बातमी आपण वाचली. हा अत्यंत धाडसी सर्जिकल स्ट्राईक होता. मराठा लाईट इन्फंर्ट्रीत पॅरा २१ अशी एक खास प्रशिक्षित कमांडो तुकडी आहे. “वाघनख” अशा नावानेही ती ओळखली जाते. ही कारवाई वाघनखने केली होती.

भारताचे माजी लष्करप्रमुख आणि नंतर अरुणाचल प्रदेशचे राज्यपाल जनरल जोगिंदर जसवंत उर्फ जे.जे. सिंग यांना एका पत्रकाराने सांगितलं की लष्करप्रमुख होणारे आपण पहिले शीख अहात. त्यावर संतापून ते म्हणाले, चुकूनही मला शीख म्हणू नका. मी पगडी बांधतो कारण शीख आईवडिलांच्या पोटी मी जन्माला आलो. पण ३५ वर्षं मी मराठा लाईट इन्फंर्ट्रीचा अधिकारी आहे. मराठी भाषा, जेवणखाण, साहित्य, संस्कृती हे माझे आहेत. सर्वप्रथम एक भारतीय, नंतर एक सैनिक आणि त्यानंतर मी एक मराठा आहे.

मराठ्यांचं भारतीय नातं आणखी सुंदरपणे काय सांगणार? जनरल सिंग स्वतःला मराठा मानतात, ३५ वर्षांच्या सहवासामुळे! कॅप्टन बुमगार्ट “शिवाजी महाराज की जय” गर्जना करत धारातिर्थी पडतो. आपल्या राष्ट्रगीतात, पंजाब, सिंध, गुजरात, मराठा असा महाराष्ट्राचा उल्लेख आहे. याचा अर्थ, मराठा ही एक जात अशी संकुचित कल्पना नाही. अठरापगड जातींनी समृद्ध असलेला महाराष्ट्र ही व्यापक, विशाल कल्पना रविंद्रनाथ टागोरांच्या मनात असणार आणि जी छत्रपती शिवाजी महाराजांनाही अभिप्रेत होती. या सर्व जातीजमातींना एकत्र घेऊन मनुवाद्यांचा पराभव करून शिवरायांचा महाराष्ट्र घडवूया!

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here