‘सहकाराचा यात्री’ चरित्र ग्रंथाचे प्रकाशन राजकीय टोलेबाजी आणि कोट्यानी रंगली सभा…

0

‘सहकाराचा यात्री’ चरित्र ग्रंथाचे प्रकाशन
राजकीय टोलेबाजी आणि कोट्यानी रंगली सभा…

मुरगूड प्रतिनिधी: समीर कटके 
‘सहकाराचा यात्री’ हा चरित्र ग्रंथ  निस्पृहता,चारित्र्य आणि लोकसेवेचा मापदंड असणाऱ्या कर्तृत्ववान व्यक्तीच्या जीवनाचा दस्तऐवज आहे.हा वाचकांना  लक्षवेधून घेणारा मुरगूडचा ऐतिहासिक  ठेवा पुढील पिढ्यांना मार्गदर्शक ठरेल असे गौरवोद्गार डॉ.श्रीकृष्ण देशमुख यांनी काढले.सहकारात कार्यकर्ता कसा असावा याचे मूर्तिमंत उदाहरण स्व.आण्णा.सहकार म्हणजे स्वाहाकार नव्हे.सहकारातील नेतृत्व मालक नाही तर विश्वस्त असतात अशी आयुष्यभर भूमिका घेऊन लोककल्याणासाठी झटणारे स्व.आण्णानी आदर्श उभा केला असे प्रतिपादन माजी मंत्री व आम हसन मुश्रीफ यांनी केले.

       मुरगूड ता कागल येथे माजी नगराध्यक्ष सहकार रत्न स्व.विश्वनाथराव पाटील यांच्या जीवन कार्यावर आधारित ‘सहकाराचा यात्री’ या पांडुरंग पाटील (पी आर)लिखित चरित्र ग्रंथाच्या प्रकाशन सोहळा संपन्न झाला.अध्यक्षस्थानी डॉ. श्रीकृष्ण देशमुख होते. यावेळी आम. हसन मुश्रीफ,शिवसेना सहसंपर्क प्रमुख प्रा.संजय मंडलिक,आम.सतेज पाटील,माजी आम.के.पी.पाटील,माजी मंत्री प्रविणसिंह भोसले प्रमुख उपस्थित होते.माजी नगराध्यक्ष प्रविणसिंह पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त नागरी सत्कार डॉ.देशमुख यांच्या हस्ते करण्यात आला.निमित्त ग्रंथ प्रकाशन सोहोळ्याचं असलं तरी हजारो लोक मंचावरील राजकीय दिग्गजांची लोकसभा आणि विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवरील टोलेबाजी ऐकण्यासाठी जमले होते.
ग्रंथ प्रकाशन व प्रविणसिंह पाटील यांच्या नागरी सत्कार प्रसंगी सुरु झालेल्या आतषबाजीचा संदर्भ देत व प्रा.मंडलिक यांच्याकडे पहात आम.सतेज पाटील म्हणाले”मुरगुडकरांनी लोकसभेपूर्वीच फटाके फोडायला सुरवात केली.आता स्व.खास.मंडलिक आणि सहकार रत्न विश्वनाथ आण्णा यांनी सहकार आणि राजकीय संधीच्या माध्यमातून साकारलेल्या इतिहासास पुढे घेऊन जाण्याची जबाबदारी लोकांची आहे.मूरगुडचा स्वाभिमान जागता ठेवण्याची जबाबदारी मुरगुडकरांनी आपल्या शिरावर घ्यावी.धर्म संकट आले तरी सत्याच्या बाजूने राहण्याची भूमिका घेणाऱ्या प्रविणसिंह पाटील यांनी लोकसभा निवडणुकीत प्रा.मंडलिक यांची पाठराखण करावी असे अप्रत्यक्ष सूचित करताना ते म्हणाले मुश्रीफ राज्याचे नेते आहेत त्यांना राज्याची जबाबदारी आहे.तुम्ही आम्ही गावची माणसं.आपण गावात खेळायचं.दररोज उठून एकमेकाचे तोंड पहायचे तर मग एकमेकांना सांभाळून घेऊया.
यावर मुश्रीफ काय भाष्य करणार याबाबत सर्वांची उत्कंठा वाढली असताना मुश्रीफ यांनी सावध भूमिका घेत “सतेज पाटील यांनी काही भूमिका व्यक्त केली असली तरी मी राष्ट्रवादीचा प्रमुख नेता आहे त्यामुळे यावर भाष्य करणार नाही” असे वक्तव्य केले.त्याच बरोबर विधानसभेसह सर्वच राजकीय संघर्षात लहान भावाने मोठ्या भावाचे रक्षण करावे तसे प्रविणसिंह पाटील यांनी आपल्याला साथ दिली असे उदगार काढले.तसेच बिद्रीचे अध्यक्ष के. पी.पाटील यांच्या भाषणाचा संदर्भ घेत प्रविणसिंह बिद्रीच्या राजकारणात केपी यांच्या बरोबरच राहतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
प्रा संजय मंडलिक यांनी “मंडलिक पाटील राजकीय संघर्ष लोकांनी अनुभवला.अलीकडच्या काळात मुरगुड शांत आहे.या विभागातील जेष्ठ या नात्याने मुरगुडचा विकास प्रवीण पाटील यांच्या मार्गदर्शनाने आणि नेतृत्वाखाली चालू राहावा अशी आमची भूमिका राहील.नेहमी गोड बोलणारा संयम ठेवणारा नेता म्हणून केपी यांची ओळख आहे पण अलीकडच्या काळात केपी अँग्री यंग मॅन सारखे आक्रमक झाले आहेत असे ते म्हणाले.यावेळी आम. मुश्रीफ यांनी मंचावर पाठीमागून “केवळ म्हेवण्या बाबतच अँग्री यंग मॅन आहेत” अशी कोटी केल्याने सभेत हास्याचा फवारा उडाला.
माजी मंत्री प्रविणसिंह भोसले म्हणाले सहकार आणि समाजवादाच्या विचारापासून आपले भाचे रणजितसिंह पाटील बाजूस गेले.स्व.अण्णांचा विचार अधिक बळकट करण्यासाठी कोण चुकले असेल तर त्यांना जवळ करा,समेट घडावा.त्यासाठी मुश्रीफ यांनी पुढाकार घ्यावा.अण्णांचा विचार टिकण्यासाठी या घराण्याची ताकद टिकली पाहिजे.
यावेळी प्रा.किसन कुराडे,लेखक पी.आर.पाटील यांचे मनोगत झाले स्वागत प्रवीणसिंह पाटील, प्रास्ताविक डी.डी. चौगले यांनी केले.यावेळी आम मुश्रीफ यांच्या हस्ते लेखक पी.आर.पाटील यांचा सत्कार करण्यात आला.यावेळी युवराज पाटील,भैया माने,अजितराव पाटील बेनाडीकर,गणपतराव फराकटे,विजय मोरे,प्रवीण भोसले,नगराध्यक्ष राजेखान जमादार,नामदेवराव मेंडके,अजितसिंह पाटील,अविनाश पाटील,रविराज पाटील उपस्थित होते.

….त्यात आमचं काय चुकलं….
मामा म्हणून तुम्हीच पुढाकार घ्या ..आम मुश्रीफ
रणजितसिंह आणि प्रविणसिंह पाटील यांच्या यांच्यात समेट घडवून आणण्याचे आवाहन त्यांचे मामा आणि माजी मंत्री प्रविणसिंह भोसले यांनी मुश्रीफ यांना केले.त्यांच्या भूमिकेचे स्वागत करून मुश्रीफ म्हणाले “पाटील गटाने विधानसभेसाठी ताकद दिली त्यांचा पैरा फेडण्यासाठी गोकुळ निवडणुकीत राष्ट्रवादीची ताकद त्यांच्या मागे उभी केली त्याचे शल्य आजही सतेज पाटील आणि संजय मंडलिक बोलून दाखवतात.पण जर ‘ते’ ‘त्यांचा’ आदेश मानून काम करत असतील तर समेट कसा होणार ? मामा म्हणून तुम्हाला जे शक्य झाले नाही ते आम्हाला होईल का ?असा प्रश्न करून मामा म्हणून या कार्यात तुम्ही पुढाकार घ्या त्यासाठी लागेल ते सहकार्य करू असे ते म्हणाले

फोटो : मुरगुडचे माजी नगराध्यक्ष सहकार रत्न विश्वनाथराव पाटील यांच्या ‘सहकाराचा यात्री’ जीवन चरित्र ग्रंथाचे प्रकाशन प्रसंगी डॉ श्रीकृष्ण देशमुख, आम हसन मुश्रीफ,सतेज पाटील,संजय मंडलिक,के.पी.पाटील,प्रविणसिंह भोसले, किसन कुराडे, प्रविणसिंह पाटील आदी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here