राज्यातील अंगणवाडी केंद्रांना 11 कोटी रुपयांच्या परिवर्तनीय निधीचे वाटप

0

एकात्मिक बालविकास सेवा योजनेंतर्गत राज्यातील 553 ग्रामीण, आदिवासी व नागरी प्रकल्पातील 97 हजार 346 अंगणवाडी केंद्र व 12 हजार 08 मिनी अंगणवाडी केंद्रांना सन 2017-18 या वर्षातील किरकोळ खर्च भागविण्यासाठी 11 कोटी रुपये इतक्या परिवर्तनीय निधीचे (Flexi Fund) प्रकल्प स्तरावर वाटप करण्यात आले आहे. प्रकल्पस्तरावरुन संबधित अंगणवाडी सेविका, मिनी अंगणवाडी सेविका यांचे बॅक खात्यात जमा केले जाणार आहे, अशी माहिती एकात्मिक बालविकास सेवा योजनेचे आयुक्त कमलाकर फंड यांनी दिली आहे.

या परिवर्तनीय निधीमधून अंगणवाडी सेविका यांना अंगणवाडी केंद्रातील साहित्य दुरुस्ती, झेरॉक्स, वजनकाट्यांच्या दुरुस्तीचा खर्च, इलेक्ट्रॉनिक मशीनच्या बॅटरीचा खर्च, अंगणवाडी केंद्राकरिता अत्यावश्यक किरकोळ साहित्य, अंगणवाडीसाठी लागणारे रजिस्टर्स, वही, पेन इ. खर्च या तरतुदीमधून भागविणेबाबत सूचना दिलेल्या आहेत.

किरकोळ खर्च भागविण्यासाठी परिवर्तनीय निधी, प्रवास खर्च, भत्त्याची रक्कम, अंगणवाडी भाड्याची रक्कम, गणवेशाची रक्कम मिळत नसल्याबाबत अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या संपकाळात मागणी होती.  त्याअनुषंगाने किरकोळ खर्च भागविण्यासाठी 11 कोटी रुपयांच्या परिवर्तनीय निधीचे वाटप करण्यात आले आहे.

प्रवास खर्च, भत्त्याची रक्कम, अंगणवाडी भाड्याची रक्कम, गणवेशाची रक्कम यावरील खर्च भागविण्यासाठी माहे नोव्हेंबर 2017 मध्ये निधीचे वाटप करण्यात येणार असल्याचे आयुक्त श्री.फंड यांनी सांगितले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here