काय …! केवळ तेरा शिक्षक प्रशिक्षणास ? जोतिबाच्या नावानं चांगभलं….!

0

काय …! केवळ तेरा शिक्षक प्रशिक्षणास ? जोतिबाच्या नावानं चांगभलं….!
वाडी रत्नागिरी येथील अध्यापन तंत्र प्रशिक्षणाचा उडाला फज्जा ?
80 टक्के शिक्षक प्रशिक्षणापासून वंचित ?
डायटच्या नियोजनावर शिक्षक नाखूष

मुरगूड प्रतिनिधी
जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था कोल्हापूर डायट यांनी मंगळवार दिनांक 12 ते 16 मार्च अखेर महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या वाडी-रत्नागिरी येथील रिसॉर्ट मध्ये कागल तालुक्यातील शिक्षकांचे ‘समावेशित शिक्षण अध्यापन तंत्र पद्धतीचे प्रशिक्षण’ आयोजित करण्यात आले आहे.पण या प्रशिक्षणासाठी कागल तालुक्यातील 95 शिक्षकांपैकी फक्त 13 शिक्षकच उपस्थित राहिले आहेत.गैरसोयीच्या ठिकाण, निवडणूक बीएलओ कामकाज,प्रज्ञाशोध परीक्षा,द्वितीय सत्र मूल्यमापन व पटनोंदनीच्या कामामुळे शिक्षक गैरहजर राहिल्याने पहिल्याच दिवशी प्रशिक्षणाचा फज्जा उडाला असल्याचा दावा समन्वय समिती कागल यांनी केला आहे.

डायटचे प्राचार्य आय.सी.शेख यांनी समावेशीत शिक्षणातर्गत अध्यापन तंत्र पद्धती हे पाच दिवसीय जिल्हा स्तरीय निवासी प्रशिक्षण यापूर्वी आयोजित केले होते.पण काही कारणास्तव ते स्थगित होऊन मंगळवार दि 12 ते 16 मार्च या कालावधीत जोतिबा डोंगर वाडी-रत्नागिरी येथील महाराष्ट्र पर्यटन मंडळाच्या रिसॉर्टमध्ये ठेवण्यात आले आहे.पण हे ठिकाण गैरसोयीचे असल्यामुळे शिवाय लोकसभा निवडणूक बीएलओ कामकाज इयत्ता चौथी व सातवी प्रज्ञाशोध परीक्षा द्वितीय सत्र मूल्यमापन आणि पट नोंदणी यासारखी कामे शिक्षकांना असल्यामुळे या प्रशिक्षण स्थळी शिक्षक उपस्थित राहू शकत नाहीत त्याऐवजी आदमापूर ता.भुदरगड या मध्यवर्ती ठिकाणी प्रशिक्षण घेण्यात यावे अशी मागणी समन्वय समिती कागल यांच्या वतीने करण्यात आली आहे

समितीचे अध्यक्ष सुरेश कांबळे, सुकुमार पाटील,सदानंद यादव,एस.के. पाटील,संजय दाभाडे,जयवंत पाटील, आयलू देसा,रमेश कांबळे,रविराज भोई,ओमाजी कांबळे,सिद्धार्थ कांबळे,प्रकाश मगदूम,नरगडी फकीर,तुकाराम राजुगडे आदींनी प्रशिक्षण मध्यवर्ती ठिकाणी ठेवावे अशी मागणी केली होती.पण या मागणीकडे डायटचे प्राचार्य श्री शेख यांनी दुर्लक्ष केले असा आरोप समन्वय समिती कागल यांनी केला आहे.दरवर्षी मार्च अखेर कोणतेही प्रशिक्षण होऊ नये यासाठी शिक्षक संघटना वारंवार मागणी करतात परंतु प्राचार्य शेख हे या मागणीचा कधीही विचार करत नाहीत.गैरसोयीचा कालावधी आणि ठिकाणामुळे या प्रशिक्षणापासून 80 टक्के शिक्षक वंचित राहिले आहेत.याला पूर्णतः प्राचार्य आय. सी.शेख जबाबदार असल्याचे समन्वय समिती कागल यांनी प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.

राधानगरी भुदरगड तालुक्यातील शिक्षकांसाठी प्रशिक्षण आदमापूर, शिरोळसाठी नृसिंहवाडी येथे आयोजित केले आहे.पण कागलच्या शिक्षकांना मात्र गैरसोयीच्या ठिकाणी पन्हाळा तालुक्यात पाठवण्यात आले आहे.वाडी-रत्नागिरी ऐवजी सदगुरू बाळूमामा मंदिर आदमापूर येथे प्रशिक्षण घ्यावे अशी मागणी समिती कडून 10 मार्च रोजी करण्यात आली होती पण डायट प्रशासनाने दुर्लक्ष करून शिक्षकांना वेठीस धरल्याची भावना शिक्षक नेते व्यक्त करत आहेत.

सर्वांना प्रशिक्षण देणार गैरसोय होणार नाही : प्राचार्य आय.सी.शेख ….

दरम्यान याबाबत डायटचे प्राचार्य आय.सी.शेख यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले,आम्हाला 80 ते 90 शिक्षक येणे अपेक्षित होते पण 35 शिक्षकांनी नोंदणी केली आहे आणि 35 शिक्षक उपस्थित राहिले त्यामुळे उपस्थितांची टक्केवारीही शंभर टक्के आहे असे मी मानतो.सर्व सुविधा असणारी ठिकाणे निवासी प्रशिक्षणासाठी निवडली आहेत. जे शिक्षक निवडणूक,गणित संबोध प्रशिक्षण व अन्य कामांच्या निमित्ताने उपस्थित राहू शकत नाहीत.त्या शिक्षकांची गैरसोय करण्याचा आमचा उद्देश नाही पण त्यांना देखील पुढील सत्रात आम्ही सामावून घेत आहोत.समन्वय समिती कागल यांनी प्रशिक्षण सुरू असताना आज आम्हाला लेखी निवेदन दिलेले आहे असेही ते म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here