स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा काँग्रेस, राष्ट्रवादी समवेत समझोता?

0

कोल्हापूर (प्रतिनिधी) :

काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीतून लोकसभेसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेला हातकणंगले व बुलडाणा या जागा देण्याबाबत शिक्कामोर्तब झाल्याची माहीती पुढे आली आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी तशी घोषणा रविवारी नांदेड येथे केली; परंतु बुलडाण्याची जागा राष्ट्रवादी काँग्रेसकडे असल्याने त्या पक्षाने संमती देण्याची गरज आहे. याबाबत येत्या दोन-तीन दिवसांत दोन्ही काँग्रेस व स्वाभिमानी शेतकरी संघटनेची एकत्रित बैठक होत आहे. त्यामध्येच त्याचा अंतिम निर्णय होईल.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेने तीन जागा मागितल्या आहेत, पण त्यातील दोन मिळत असतील तर संघटनेलाही ते हवेच आहे. दुसऱ्या बाजूला खासदार राजू शेट्टी यांच्यासारखा मोदी सरकारविरोधात आक्रमक बोलणारा नेता आघाडीत हवा ही देखील दोन्ही काँग्रेसचीही अगतिकता आहे. त्यामुळे काँग्रेस आघाडी काही करून खा. शेट्टी यांना आघाडीतून बाहेर जाऊ देणार नाही. बुलडाण्यातून संघटनेचे प्रदेशाध्यक्ष रविकांत तूपकर हे उमेदवार असतील. त्यांनी जिल्ह्यात चांगला जम बसविला आहे. संघटनेला लोकसभेच्या दोन जागांवर विजय व ६ टक्के मते मिळाल्यास प्रादेशिक पक्ष म्हणून मान्यता मिळू शकते. संघटनेतील दोन नंबरचे नेतृत्व म्हणून तूपकर यांना बळ देणे याचा शेट्टी यांच्यावरही दबाव आहे. त्यामुळे बुलडाण्याची जागा मिळाल्यास संघटनेला आघाडीसोबत जाण्यात अडचण नाही. या मतदारसंघांतून राष्ट्रवादीकडून माजी मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांचे नाव चर्चेत आहे. त्यांच्यासाठी स्वत: पक्षाध्यक्ष शरद पवार हेच आग्रही आहेत; परंतु त्यांना जर स्वाभिमानी संघटना आघाडीत हवी असेल तर ही जागा सोडावीच लागेल, असे चित्र आहे. तो अंदाज घेऊनच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष चव्हाण यांनी तशी घोषणा केली असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here