केलेल्या विकास कामांचे मार्केटिंग करण्यात आम्ही कमी पडलो – सुनील तटकरे

0

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना झाल्यापासून पक्ष सत्तेत राहिला. सत्तेत राहून लोकांची सेवा करत असताना पक्ष संघटनेकडे काहीसं दुर्लक्ष झाले, यापुढे पक्षसंघटनेकडे दुर्लक्ष होऊ नये याची काळजी आम्ही घेत आहोत. ठाणे महानगरपालिकेवर शिवसेनेची सत्ता असतानाही, आघाडी सरकार काळात प्राधिकरणाच्या माध्यमातून आम्ही ठाणे शहराचा विकास केला. परंतु जे काम केले त्याचे मार्केटिंग करण्यात आम्ही कमी पडलो अशी खंत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आ.सुनील तटकरे यांनी ठाणे येथे पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात बोलताना व्यक्त केली..
पुढे ते म्हणाले देशात गोरक्षेच्या नावावर अल्पसंख्यांक बांधवांची हत्या केली जाते. महिलांवर अत्याचार वाढलेत हे लोकांना दिसू लागले आहे. आपण आता गप्प बसू नये लोकांचे प्रश्न मांडण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी प्रयत्न केले पाहिजेत. ठाण्यात नियुक्तीचं काम पूर्ण झालंय हे कौतुकास्पद आहे. पुढे कधीही निवडणुका असल्या तरी राष्ट्रवादी काँग्रेस त्यासाठी तयार असेल असा विश्वास यावेळी तटकरे यांनी व्यक्त केला.
यावेळी बोलताना राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा चित्राताई वाघ म्हणाल्या जेलमध्ये महिला कर्मचाऱ्यांवर लैंगिक अत्याचार होत असल्याचे पत्र एका महिलेने मुख्यमंत्र्याना पाठविले आहे. अशा अत्याचाराच्या घटनांतील या नराधमांवर प्रशासनाचा वचक राहिलेला नाही. इथं कोणीही सुरक्षित नाही. अशावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या महिला कार्यकर्त्यांनी पुढाकार घेत या सर्व गोष्टींचा विरोध करायला हवा. महिलांच्या मनात एक विश्वास तयार करायला हवा की राष्ट्रवादी काँग्रेसच आपल्याला मदत करू शकेल, असे आवाहन वाघ यांनी केले.
आ.जितेंद्र आव्हाड  आपल्या भाषणात बोलताना म्हणाले काल भुजबळ साहेबांना बघितल्यानंतर राजकारणात राहायचं की नाही? असा प्रश्न मनात आला. ज्या माणसाने अवघा महाराष्ट्र गाजवला त्याची काय अवस्था केली, अशी खंत व्यक्त केली. असलं राजकारण बरं नाही. विरोधक म्हणून आम्ही विरोध करतो तर आम्हाला मुंगीप्रमाणे चिरडण्याचा प्रयत्न केला जातो ही लोकशाही आहे का, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. आज ठाण्यात २५ वर्ष शिवसेनेची सत्ता आहे. त्यांनी शहराची फार बिकट परिस्थिती करून ठेवली आहे. या लोकांनी फक्त भावनिक राजकारण केलं. फक्त मराठी माणसाचा मुद्दा लावून धरला. ठाण्यात क्लस्टरसाठी फक्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने प्रयत्न केले. सत्तेच्या जोरावर मनपात शिवसेना ठराव पास करून घेते. त्या ठरावांवर कोणतीही चर्चा केली जात नाही अशी दादागिरी सध्या शहरात सुरू आहे, असा खुलासा आव्हाड यांनी येथे बोलताना केला.
ठाणे जिल्ह्याचे माजी पालकमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गणेश नाईक  यांनी पुढे पाच राज्यात निवडणूक होणार आहे. भाजपकडून सत्तेचा, पैशांचा प्रचंड वापर केला जाईल, अशी सावध करणारी सूचना केली. शिवसेनेला लाजवेल अशी गुंडागिरी राज्यात भाजपकडून सुरु आहे. आपण संघटना आणि चळवळीवर लक्ष दिलं तर नक्कीच येणारा काळ राष्ट्रवादी काँग्रेसचा काळ असेल. पैसाच सर्व काही नसतो तुम्ही माणसांशी जी बांधीलकी जपली ती उपयोगी पडते, असा सल्लाही त्यांनी याठिकाणी बोलताना दिला.
माजी खासदार आनंद परांजपे म्हणाले ठाण्यात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा मुकाबला फक्त शिवसेनेसोबत आहे, आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडे कोणतीही सत्ता नसताना देखील राष्ट्रवादी जनतेच्या प्रश्नांसाठी झटत आहे. शिवसेनेच्या “अरे ला, का रे” करण्याची धमक फक्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत आहे. मनपा सभागृहात शिवसेनाला जाब विचारण्याचं काम राष्ट्रवादी काँग्रेस करत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या नेत्यांनी आतापर्यंत जी साथ दिली ती यापुढेही मिळत राहील अशी अपेक्षा करतो, अशी अपेक्षा व्यक्त केली.

यावेळी माजी खासदार संजीव नाईक, प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद हिंदुराव, आ. जयदेव गायकवाड, आ.निरंजन डावखरे, ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष ईश्वर बाळबुधे व पक्षाचे अन्य प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here