ऊस बिले थकल्याने शेतकरी आर्थिक कोंडीत : संजयबाबा घाटगे

0

व्हनाळी : जिल्हातील साखर कारखाने सुरु होवून दोन महिने उलटले तरीही अद्याप शेतकऱ्यांना ऊसबिले मिळालेली नाहीत. बिले न मिळाल्याने त्यांच्या कर्जाचा हप्ता थकला असून पुढील वर्षीच्या पिकांसाठी खते घेणे अशक्य बनले आहे. तसेच शेकऱ्यांचे संपूर्ण आर्थिक गणित कोलमडले आहे. त्यामुळे कारखानदारांनी केलेल्या चर्चेनुसार ठरलेल्या बिलांची रक्कम त्वरित अदा करून त्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी माजी आमदार संजय घाटगे यांनी केली.
व्हनाळी (ता. कागल) येथे ते पत्रकार परिषदेत बोलत होते. अनेक शेजाऱ्यांनी ऊसबिले न मिळाल्यामुळे होणाऱ्या आर्थिक यातायातीबाबत घाटगे यांच्यासमोर व्यथा मांडल्या त्यामुळे घाटगे यांनी कारखानदारांच्या भूमिकेबाबत नाराजी व्यक्त करत आपली भूमिका मांडली.
सहकारी कारखाने हे शेतकरी सभासद यांच्या योगदानातून आणि सरकारच्या मेहरबानीवर निर्माण झाले आहेत. परंतु शेतकऱ्यांनी वर्षभर कष्ट करून पिकविलेल्या उसाचे पैसे वेळेत न देणे चुकीची बाब आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना पुढील ऊसपिकासाठी खते, मशागत करणे, बँकांचे हप्ते भरणे अशक्य झाले आहे. तसेच मुलांचे शैक्षणिक शुल्क भरणे, समारंभासारखे कार्यक्रमासाठी त्यांना उसनवारी करावी लागत आहे.
ऊसबिलांच्या विलंबामुळे सद्यस्थितीत शेतकरी मेटाकुटीला आला असून त्वरित त्यांची ऊसबिले देण्यात यावीत अशी अपेक्षाही घाटगे यांनी व्यक्त केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here