… अन्यथा साखर कारखानदारांना बेड्या ठोकू मंत्री सदाभाऊ खोत यांचा इशारा

आठ दिवसात ऊस बिले शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करा

0

प्रतिनिधी कुरुंदवाड :
येत्या आठ दिवसात उसाची बिले शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग न झाल्यास कारखानदारांना बेड्या ठोकू. सातारा जिल्ह्यात सगळ्यात कमी रिकव्हरी बसत असूनही ते कारखानदार २५०० रुपये ऊस उत्पादकांना दर देत आहेत. या भागात रिकव्हरी जास्त असूनही २३०० रुपयेच अडव्हान्स का देत आहेत ? शेतकऱ्यांचे कैवारी व कारखानदार यांची मिली भगत झाली आहे. ती आपण मोडून काढण्याचा इशारा कृषी व पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी दिला. बुबनाळ (ता. शिरोळ) येथे ७८ लाखाचे सुधारीत नळ पाणीपुरवठा योजना व बुबनाळ ते कवठेगुलंद या रस्त्यासाठी ९८ लाख अशा विविध विकास कामाचे उदघाटन कार्यक्रमात अध्यक्षपदावरून ते बोलत होते. आमदार उल्हास पाटील, गोकुळचे संचालक अनिल यादव यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रारंभी बुबनाळ ते कवठेगुलंद या रस्त्याचे उदघाटन मंत्री सदाभाऊ खोत, आमदार उल्हास पाटील, जिल्हा परिषद सदस्या परविन पटेल, पंचायत समिती सदस्या रुपाली मगदूम यांच्या हस्ते करण्यात आले.
खोत म्हणाले, शेतकऱ्यांचे स्वयंघोषीत नेते व कारखानदार यांची गट्टी झाली आहे. ते शासनाला बदनाम करत असून या मंडळींचे नाटक शासनाच्या लक्षात आले आहे. याचा योग्य बंदोबस्त करण्यात येईल. ऊस दरासाठी आम्हीही मर खाल्ला आहे. पण त्याची प्रसिद्धी आम्ही कधी केली नाही.
सभेत आमदार उल्हास पाटील म्हणाले, शिरोळ तालुक्याच्या विकासासाठी युती शासनाने ४७५ कोटीची निधी देवून एक इतिहास घडविला आहे. या तालुक्यातील कोणताच प्रश्न प्रलंबित ठेवणार नाही. अशी ग्वाही दिली. गोकुळचे संचालक अनिल यादव यांचेही भाषण झाले. सरपंच रोशनबी बैरागदार यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. कार्यक्रमास विविध संस्थांचे पदाधिकारी, ग्रामपंचायत सदस्य तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here