शिरोळ तालुक्यातील कारखान्यांच्या कार्यालयावर ‘स्वाभिमानी’चा हल्ला

0

 

जयसिंगपूर : प्रतिनिधी

स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी शनिवारी शिरोळ तालुक्यातील साखर कारखान्यांच्या गेटकेन विभागीय कार्यालयांवर हल्ला चढविला. शहरातील जवाहर, दत्त व गुरूदत्त या साखर कारखान्यांच्या कार्यालयांवर कार्यकर्त्यांनी हल्ला चढवून मोडतोड केली.

‘दत्त’च्या कार्यालयांना टाळे ठोकले. शरद कारखान्याच्या कर्मचार्‍यांना धारेवर धरले. तोडफोड केल्याने सर्व कार्यालयांत काचा विखुरल्या होत्या. कागदपत्रे पेटविण्याचा प्रयत्न झाला. कुरूंदवाड शहरातही जवाहर, गुरूदत्त, दत्त, पंचगंगा, शरद, बेडकीहाळ या साखर कारखान्यांच्या कार्यालयांना टाळे ठोकून सरकार व कारखानदारांचा निषेध करण्यात आला.
रविवारपासून (दि. 13) आंदोलन तीव्र करण्याचा इशारा देण्यात आला आहे. ऊसतोडी बंद करण्यात येणार आहेत. साखर कारखान्यांनी एफआरपीचे तुकडे करून पहिली उचल 2300 रुपये जमा केल्याने कार्यकर्ते सकाळपासून संतप्‍त होते.

सावकार मादनाईक यांच्या नेतृत्वाखाली साखर कारखानदार व शासनाचा धिक्‍कार करीत घोषणा देत कार्यकर्ते शरद साखर कारखान्याच्या विभागीय कार्यालयात घुसले. कर्मचार्‍यांना कार्यालये बंद ठेवण्यास भाग पाडले. पंचगंगा विभागीय कार्यालयाचे गेट मोडून कार्यालयाच्या दरवाजावर जोपर्यंत एकरकमी एफआरपी मिळत नाही, तोपर्यंत कार्यालय उघडायचे नाही, अशी इशारावजा नोटीस लावण्यात आली.
आक्रमक कार्यकर्त्यांनी आपला मोर्चा सांगली-कोल्हापूर महामार्गावर असलेल्या जवाहर कारखान्याच्या विभागीय कार्यालयावर वळविला. कर्मचार्‍यांना बाहेर काढून खुर्च्या, टेबल, खिडक्या, कपाटे अशा सर्व साहित्याची नासधूस केली.

लक्ष्मी रोडवरील दत्त साखर कारखाना कार्यालयातील खुर्च्या, टेबल, कपाटे फोडून टाळे ठोकले. त्यानंतर मार्केट यार्डसमोर शिरोळ मार्गावरील ‘गुरूदत्त’च्या बंद असलेल्या कार्यालयाचे गेट व दरवाजा मोडून कपाटे, खुर्च्या, रजिस्टर, संगणकाची मोडतोड केली.

पंचगंगा कार्यालयाला नोटीस लावताना सागर चिपरगे, सागर मादनाईक, सागर शंभूशेटे, शैलेश आडके, पंकज मगदूम, शिरोळ येथील पं. स. सदस्य सचिन शिंदे, विवेक पाटील, नगरसेवक शैलेश चौगुले, आशिष समगे, दानोळीचे राम शिंदे, महंमद नदाफ, हेरवाडचे बंडू पाटील-कडोले यांच्यासह कार्यकर्ते आंदोलनात सहभागी होते.

पोलिस यंत्रणा सतर्क

स्वाभिमानीच्या हल्ल्यानंतर अप्पर पोलिस अधीक्षक श्रीनिवास घाडगे, जयसिंगपूरचे पोलिस उपअधीक्षक कृष्णात पिंगळे, सहायकपोलिस निरीक्षक नामदेव शिंदे यांनी सर्व कारखान्यांच्या कार्यालयांची पाहणी करून अहवाल घेतला.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या संतप्‍त कार्यकत्यार्र्ंनी कुरूंदवाड शहरातील विविध साखर कारखान्यांच्या विभागीय कार्यालयांना टाळे ठोकले. कारखान्यांच्या कार्यालय परिसरात काही काळ तणाव निर्माण झाला होता. कुरूंदवाड शहरातील जवाहर सहकारी साखर कारखाना, गुरूदत्त शुगर्स लिमिटेड, दत्त सहकारी साखर कारखाना, रेणुका शुगर्स लिमिटेड, व्यंकटेश शुगरसह महाराष्ट्र, कर्नाटक राज्यांतील कुरूंदवाड परिसरात असणार्‍या साखर कारखान्यांच्या विभागीय कार्यालयांना टाळे ठोकले.

यावेळी अण्णासाहेब चौगुले, दत्तात्रय गुरव, माजी नगरसेवक जिनाप्पा भबीरे, मोनाप्पा चौगुले, बंडू उमडाळे, योगेश जिवाजे, बाहुबली पाटील, सचिन पाटील, सदाशिव मगदूम, शांतिनाथ भबीरे, नंदकिशोर पाटील, धोंडिराम चौगुले आदी उपस्थित होते.

शिरोळ : शिरोळ-जयसिंगपूर रोडवरील गुरूदत्त साखर कारखान्याचे विभागीय शेती कार्यालयावर दगडफेक करून कागदपत्रे विस्कटून टाकली. शेती कार्यालय तोडफोडीबाबत शिरोळ पोलिसांत दिलेल्या वर्दीवरून पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. परंतु, रात्री उशिरापर्यंत कोणतीच फिर्याद दाखल करण्यात आली नव्हती.

दरम्यान, आंदोलन अंकुश या सामाजिक संघटनेसह सहा शेतकरी संघटनांनी रविवारी श्री दत्त साखर कारखान्याच्या मुख्य प्रवेशद्वारावर बेमुदत आंदोलन करण्याचे जाहीर केल्याची माहिती धनाजी चुडमुंगे यांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here