विद्यार्थ्यांचा कल लक्षात घेऊन, विद्यार्थी घडविणारी शाळा…!!

0

 सातारा जिल्हा हा सैनिक जिल्हा म्हणून ओळखला जातो. स्वराज्यासाठी रक्त सांडण्याचा आणि देशसेवेचा इतिहास इथल्या मातीतला डी.एन.ए आहे. हा जिल्हा शैक्षणिक प्रगतीत नवनवे उच्चांक स्थापित करतो आहे. हा धडपडण्याचा गुण प्रत्येक क्षेत्रात दिसतो. त्याला शिक्षण क्षेत्रही अपवाद नाही. प्राथमिक शिक्षणात ज्या झपाट्याने जिल्ह्याची प्रगती होत आहे, ती उल्लेखनीय अशीच आहे. आता हा प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत आतापर्यंत सातारा जिल्ह्यात जिल्हा परिषद शाळांची कामगिरी अतिशय कौतुकास्पद आहे. सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील विखळे, खंडाळा तालुक्यातील शिरवळ, कोरेगाव तालुक्यातील ल्हासुर्णे, पाटण तालुक्यातील तारळे(मुळी), वाई तालुक्यातील निकमवाडी, जावळी तालुक्यातील ओझरे या जिल्हा परिषद शाळांनी अतिशय चमकदार शैक्षणिक प्रगती केली आहे. मात्र सातारा तालुक्यातील अपशिंगे (मिलिटरी) जिल्हा परिषद शाळेने मात्र गुणवत्तापूर्ण शिक्षणाबरोबर खेळ आणि स्पर्धा परीक्षेतही धवल यश संपादन केले आहे. वर उल्लेख केलेल्या सर्व शाळाही प्रगत शाळा, डिजिटल शाळा आणि आयएसओ मानांकन प्राप्त आहेत.

अपशिंगेची जिल्हा परिषद शाळा ही सर्वांसाठी आता मॉडेल शाळा आहे. नेमकं काय करतात इथले शिक्षक आणि स्थानिकांची शाळा समिती हे पाहण्यासाठी गेलो असता, अनेक सुखद धक्के बसले. शाळेचे सुशोभित कपाऊंड, गेटच्या आत गेल्यानंतर कमालीची स्वच्छता, मोजकीच पण योग्य त्या जागी हिरवाई, झाडे, मधल्या बाजूला शाळेपर्यंत जाण्यासाठी पेव्हरब्लॉकचा रंगीत रस्ता (हा गावकऱ्यांनी निधी गोळा करुन केल्याचे समजले), त्याच्या दोन्ही बाजूला प्रशस्त खेळाचे मैदान. या मैदानाच्या पुढे अतिशय सुबक दगडी इमारत. १९०३ साली बांधलेली ही शाळा पहिली ते सातवीपर्यंतची आहे. एकूण 9 जण इथे शिक्षक आहेत. एका शिक्षिकेचा अपवाद वगळता बाकी आठही शिक्षक पदवीधर आहेत.

 या शाळेच्या प्रभारी मुख्याध्यापक श्रीमती जमिला बागवान यांच्या नेतृत्वाखाली मागच्या मे पासून ही शाळा सध्या सुरु आहे. गेल्या तीन वर्षातील या शाळेच्या प्रगतीचा आलेख खूपच चांगला आहे. आज या शाळेचा पट २८३ एवढा असून यातील ४० विद्यार्थी दुसऱ्या गावावरून स्वखर्चाने या शाळेत येतात. या शाळेत गावकऱ्यांच्या सहकार्याने आणि शिक्षकांच्या तळमळीने ८०० पुस्तकांचे ग्रंथालय सुरु करण्यात आले आहे. मुलं खरच वाचतात का, याची उलट तपासणी केली असता, ते त्या पुस्तकाचा सार अगदी न अडखळता सांगत होते.एक होता कार्व्हर’, ‘अग्निपंख’, ‘श्यामची आईअशी अनेक पुस्तके अतिशय आवडीने हे विद्यार्थी वाचत आहेत. शाळेची वेळ सकाळी दहाची असते मात्र जी मुलं विशेष प्राविण्य मिळविणारे आहेत, त्यांच्यासाठी सकाळी ९ वाजता शाळा सुरु होते. आणि संध्याकाळी शाळा सुटल्यानंतरचा एक तास ज्यांची अभ्यासात गती थोडी कमी आहे त्यांच्या प्रगतीसाठी घेतला जातो. यामुळे या शाळेची १० मुले २०१४-१५ पासून नवोदयला लागली. एवढ्या मोठ्या प्रमाणात नवोदयला मुलं पास होणारी ही जिल्ह्यातील एकमेव जिल्हा परिषद शाळा आहे. चौथीच्या शिष्यवृत्तीतही या शाळेचे विद्यार्थी जिल्ह्यात चमकतात. या विद्यार्थ्यांमध्ये ही गुणवत्ता कशी काय येते, याचे प्रात्यक्षिक वर्गात जावून पाहता आले. बीएससी. डी.एड असलेले कदम सर मुलांना एलईडी च्या स्क्रीनवर पचनसंस्थेविषयी पहिल्यांदा इंग्रजीमधून आणि नंतर त्याचे मराठी रुपांतर करुन शिकवत होते. त्या स्क्रीनवर आपण घास घेतल्यानंतर कुठे कुठे जातो हे त्या चलचित्रातून दिसत होते. मी त्यानंतर उलट तपासणी म्हणून एका निकम नावाच्या विद्यार्थ्याला आता सरांनी काय शिकविले पुढे येऊन सांग, म्हटल्यानंतर तो न घाबरता पुढे आला. त्या एलईडी स्क्रीनवर पचनसंस्था सांगू लागला. मी अवाक झालो, हा पाठ कालच सुरु झाला असल्याचे कळले. एवढ्या लवकर ही मुले केवळ या द्रकश्राव्य माध्यम आणि सरांची त्यांच्या प्रती असलेली आपुलकी यामुळे हे विद्यार्थी पटकन अचूकपणे लक्षात ठेवतात असे वाटले, पुढच्या वर्गात इतिहासाचा तास होता. तिथे मिर्झा राजे जयसिंग बरोबर पुरंदर किल्ल्यावरील तह हा पाठ सुरु होता. तिथल्याही विद्यार्थ्यांनी तसेच फटाफट उत्तरे दिली. नंतर हा प्रगत शाळा पॅटर्न, डिजिटल शाळा यांच्या समन्वय आणि शिक्षकांची शासनाच्या पॅटर्नची १०० टक्के अंमलबजावणी आणि विद्यार्थ्यांप्रती असलेले समर्पण यामुळेच हे दैदिप्यमान यश या शाळेच्या पदरी पडत आहे हे लक्षात आले.

शैक्षणिक गुणवत्तेत वरचष्मा असलेल्या या शाळेचा इयत्ता सातवीत असलेला सुमीत घाडगे बॉक्सिंग मध्ये राज्यस्तरावर खेळतो आहे. दोन वर्षापूर्वी ७ वीत बॉक्सिंग सुरु केलेली प्राची गुरव ही या शाळेची विद्यार्थिनी आता बालेवाडीच्या बॉक्सिंग प्रशिक्षण प्रबोधिनीत प्रशिक्षण घेत आहे. शाळेच्या खो-खो च्या संघातील दोन मुलींची निवड विभागीय पातळीवर झाली आहे. खेळात प्रावीण्य असणाऱ्या विद्यार्थ्याना वेगळे कोचिंग आणि प्रोत्साहन असल्यामुळे ही शाळा क्रीडा क्षेत्रातही आपला नावलौकिक करत आहे. यासाठी गावातील नागरिकांच्या आर्थिक पाठबळाबरोबर प्रोत्साहनही असल्याचे सर्व शिक्षक सांगतात. लोक वर्गणीतून शाळेचा सुसज्ज हॉल, ग्रंथालय, ढोलताशे, प्रत्येक वर्गात एलईडी, आयडीबीआय बँकेने बांधून दिलेले शौचालय, तर इन्फोसिसने बनवून दिलेली लॅब. गावकऱ्यांच्या मागणीवरुन २०१३ पासून पाचवी सुरु झाली आता सहावी, सातवी सुरु झाली. आता या जिल्हा परिषद शाळेचे नाव सर्वदूर पोहचले आहे. त्यामुळे गावात इंग्रजी माध्यमाची शाळा असूनही पहिलीच्या वर्गात प्रवेश मिळावा म्हणून पालक आतापासूनच शाळेत येऊन जात असल्याचे श्रीमती बागवान यांनी सांगितले. सातारा जिल्ह्याचे सहपालकमंत्री सदाभाऊ खोत यांनी हे गाव दत्तक घेतले असून शाळेसाठी जिल्हा वार्षिक योजनेतून साहाय्य देणार आहेत, असे शिक्षकांनी सांगितले. आता ही शाळा पाहण्यासाठी लोक दूरवरुन येत आहेत. शाळेच्या प्रतिक्रिया पुस्तकातील एक प्रतिक्रिया खूप बोलकी आहे. “मला माझ्या मुलीला या शाळेत शिकवायला आवडले असते”, सातारा जिल्हा परिषदेचे तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी आणि सध्याचे लातूरचे जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांची ही प्रतिक्रिया या पुस्तकात आहे. आशा शाळा सगळीकडेच झाल्या तर जिल्हा परिषद शाळेत प्रवेशासाठी प्रतीक्षा यादी लागेल. एवढे प्रयत्न झाले तर असे दिवस यायला वेळ लागणार नाही हे निश्चित …!!

 

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here