कुडाळ येथे २२ ते २६ डिसेंबर रोजी राज्यस्तरीय कृषी, पशुपक्षी व पर्यटन मेळाव्याचे आयोजन

0

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकरी, बागायतदार, दुग्ध व्यावसायिक, पशुपालक व सुशिक्षित बेरोजगारांना पशुपालन विकसित यंत्रसामग्री यांचे ज्ञान मिळावे व तज्ज्ञांचे मार्गदर्शन मिळावे यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. याचाच एक भाग म्हणून सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या कृषी व पशुसंवर्धन विभागाच्या वतीने यावर्षीही २२ ते २६ डिसेंबर या कालावधीत कुडाळ एस.टी.डेपोच्या मैदानावर राज्यस्तरीय कृषी, पशुपक्षी व पर्यटन मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असल्याचे माहिती जिल्हा परिषद अध्यक्षा रेश्मा सावंत व उपाध्यक्ष रणजीत देसाई यांनी संयुक्तपणे पत्रकार परिषदेत दिली.

यंदा मेळाव्याचे हे चौथे वर्ष असून गेल्या ३ वर्षात मिळालेल्या उदंड प्रतिसादामुळे यावर्षी पाच दिवसांचे भरगच्च कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या हस्ते व अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत २३ डिसेंबर रोजी मेळाव्याचे उद्घाटन करण्यात येणार आहे. या मेळाव्याला कृषी व पशुसंवर्धन क्षेत्राशी निगडित सुमारे २५० स्टॉल्स उभारण्यात येणार आहेत. यामध्ये आधुनिक व पारंपरिक औजारे, यंत्रसामग्री, सेंद्रिय खत, बियाणे, सिंचन साधने, पशुखाद्य व औषध, डेअरी व कुक्कुट पालन व मत्स्यव्यवसायाशी निगडित साहित्य, शेतीविषयक पुस्तके व नियतकालिके इत्यादी सहभागी होणार आहेत. याचबरोबर संकरीत व देशी गाय, म्हैस, शेळी, मेंढी, ससे व शोभिवंत मासे प्रदर्शनसाठी व विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आले आहेत. यामुळे शेतकऱ्यांना पशुधन खरेदीसाठी जिल्ह्यातच जातिवंत जनावरे उपलब्ध झाल्याने होणारा वाहतूक खर्च वाचेलच शिवाय मोठ्या प्रमाणात जनावरे उपलब्ध असल्याने त्यांना आपल्या पसंतीनुसार जनावरांची निवड करता येईल. तसेच प्रदर्शनात बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे माध्यमातून विकसित केलेली विविध कृषी औजारे यंत्रसामग्री यांचेही दालन उभारण्यात येणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here