दिव्यांग व्यक्तींना सर्वच क्षेत्रांत समान संधी: बाळासाहेब कामत

0

विद्यापीठात पाच दिवसीय कार्यशाळेस प्रारंभ

कोल्हापूर : सर्वसाधारण व्यक्तींच्या बरोबरीने दिव्यांग व्यक्तींना शिक्षणासह सर्वच क्षेत्रांत समान संधी उपलब्ध आहेत. त्याचा त्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन कोल्हापूर समाजकल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त बाळासाहेब कामत यांनी आज येथे केले.

शिवाजी विद्यापीठाच्या समावेशी शिक्षण संसाधन केंद्र (ज्ञान स्त्रोत केंद्र) व सामाजिक वंचितता व समावेशक धोरण अभ्यास केंद्र  यांच्या संयुक्त विद्यमाने अंध विद्यार्थी-विद्यार्थिनी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्यासाठी विद्यापीठस्तरीय पाच दिवसीय कार्यशाळा आयोजित केली आहे. या कार्यशाळेच्या उद्घाटन कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी प्र-कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के होते.

दिव्यांग व्यक्तींसाठी शासनामार्फत राबविण्यात येत असलेल्या विविध योजनांची व उपक्रमांची माहिती देऊन श्री. कामत म्हणाले, दिव्यांग व्यक्तींना कोणत्याही पातळीवर केवळ शारिरीक व्यंगामुळे दुय्यम वागणूक दिली जाऊ नये, याकडे शासनाचा कटाक्ष आहे. किंबहुना, ते अन्य सर्वसाधारण व्यक्तींच्या तुलनेत इतर बाबतीत सरस असल्याचे दिसते. या पार्श्वभूमीवर कोणाही दिव्यांग व्यक्तीने स्वतःला कमी न समजता पूर्ण क्षमतेने स्पर्धा परीक्षांसह विविध क्षेत्रांत आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवावा. शासन त्यांना सर्वोतोपरी सहकार्य करण्यास तत्पर आहे, असे त्यांनी सांगितले. यावेळी त्यांनी खास दिव्यांग व्यक्तींसाठी असलेल्या कम्युनिटी-बेस्ड रिहॅबिलिटेशन या उपक्रमाची माहिती दिली.

अध्यक्षीय भाषणात डॉ. डी. टी. शिर्के यांनी दिव्यांग व्यक्तींसाठी परीक्षा पद्धतीमध्ये त्यांना सुकर असे बदल करण्याचे प्रयत्न विद्यापीठ स्तरावर सुरू असल्याचे सांगितले. या कार्यशाळेचा दिव्यांगांनी लाभ घेऊन आपले जीवन अधिक सुलभ करावे, असे आवाहन केले. समावेशी शिक्षण संसाधन केंद्र (ज्ञान स्त्रोत केंद्र) व सामाजिक वंचितता व समावेशक धोरण अभ्यास केंद्र यांच्या मार्फत दिव्यांग/विकलांग व इतर विद्यार्थी – विद्यार्थिनी यांच्यासाठी राबवण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांची माहिती विषद केली.

यावेळी ज्ञानस्रोत केंद्राच्या संचालक व कार्यशाळा समन्वयक डॉ. नमिता खोत यांनी स्वागत  व प्रास्ताविक केले. उपग्रंथपाल डॉ. डी. बी. सुतार यांनी परिचय करून दिला. सामाजिक वंचितता व समावेशक धोरण अभ्यास केंद्राच्या समन्वयक डॉ. नंदा पारेकर यांनी आभार मानले. कु. अलमास पेंढारी यांनी सूत्रसंचालन केले.

सदर कार्यशाळेत येत्या चार दिवसांत श्री. धनंजय भोले (ॲकॅडेमिक को-ऑर्डीनेटर, सेंटर फॉर इन्क्लुजिव्ह एज्युकेशन, शिक्षणशास्त्र अधिविभाग, पुणे विद्यापीठ, पुणे), श्रीमती जैनाब चिनीकमवाला (बुक-शेअर, वेस्ट इंडिया झोन समन्वयक, पुणे), डॉ. मनोहर वासवाणी (सहाय्यक प्राध्यापक, इंग्रजी अधिविभाग, शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर) व डॉ. टी.के. करिकट्टी (सहाय्यक प्राध्यापक, इंग्रजी अधिविभाग, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर) हे तज्ज्ञ मार्गदर्शन करणार आहेत. यावेळी कम्प्युटर बेसिक ॲन्ड इंग्लीश कम्युनिकेशन या उप-विषयावर मार्गदर्शन करण्यात येईल.

कार्यशाळेस विविध महाविद्यालयातील, संस्थेतील, विद्यापीठातील शिक्षक व शिक्षकेतर दिव्यांग कर्मचारी व त्यांचे सहाय्यक अशा एकूण 80 जणांनी सहभाग नोंदविला आहे. यावेळी प्रा. सी. ए. लंगरे, डॉ. शालिनी लिहीतकर, श्री. अविनाश भाले, डॉ. पी. बी. बिलावर, डॉ. एस. व्ही. थोरात, श्री. एस. आर. बिरजे, श्री. ए बी. मातेकर, श्री. शरद पाटील, डॉ. किशोर खिलारे, श्री. श्रीधर साळोखे, श्री. संग्राम किल्लेदार यांच्यासह ग्रंथालय व सामाजिक वंचितता व समावेशक धोरण अभ्यास केंद्र विभागातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित होते.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here