एसटीच्या ताफ्यात कमी पल्ल्यासाठी विजेवरील बस?

0

मुंबई (प्रतिनिधी) :

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ अर्थात लालपरी एसटी विभागाने प्रवाशांचा प्रवास सुकर, पर्यावरणस्नेही करतानाच खर्च आटोक्यात आणण्यासाठी विजेवरील बस चालवण्याचा प्रस्ताव तयार केला आहे.

राज्याच्या ग्रामीण भागांत विजेची मोठ्या प्रमाणावर समस्या आहे. त्यामुळे लांब पल्ल्याच्या मार्गावर चार्जिग स्टेशन उभारणीच्या येणाऱ्या अडचणी निर्माण होणार आहेत. हे पाहता प्रथम प्रायोगिक तत्त्वावर मुंबई-पुणे या कमी अंतरावर विजेवरील (इलेक्ट्रिक) वातानुकूलित बस चालवण्याचा विचार केला जात आहे. हा प्रस्ताव परिवहन विभागाकडेही पाठवण्यात आला आहे.

केंद्र सरकारकडून विजेवर धावणाऱ्या बस गाडय़ांना प्राधान्य दिले जात आहे. केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी तर विजेवर धावणाऱ्या बस एसटी महामंडळाला फायदेशीर ठरतील. त्यामुळे एसटीचा खर्च कमी होईल. या बस चालवण्याचा विचार महामंडळाने करावा, अशा सूचना केल्या होत्या. एसटीला आपल्या ताफ्यात असणाऱ्या प्रत्येक बस गाडय़ांच्या इंधनाच्या प्रति किलोमीटरमागे १ रुपये २० पैसे खर्च येत आहे. तर विजेवरील प्रत्येक बसमागे साधारण ६४ पैसे प्रतिकिमी खर्च येतो. त्यामुळे कमी होणारा खर्च पाहता विजेवरील बस चालवण्याचा निर्णय महामंडळाने घेतला आहे. हा प्रस्ताव परिवहन विभागाकडेही पाठवण्यात आला आहे.

सध्या मुंबई, ठाणे तसेच नागपूरमध्ये या बस गाडय़ा धावत आहेत. विजेवर धावणाऱ्या बस गाडय़ा जास्तीत जास्त ३०० ते ४०० किलोमीटपर्यंत धावू शकतात, असा विविध कंपन्या दावा करत आहेत. सध्या महाराष्ट्रात धावणाऱ्या विजेवरील बस गाडय़ा शहरी भागातच धावत असल्याने लांब पल्ल्याच्या मार्गावर विजेवरील बस गाडय़ा धावत असल्याची माहिती अद्याप तरी नसल्याचे एसटीतील सूत्रांनी सांगितले.

एसटी महामंडळासमोर ग्रामीण भागांतील विजेचा प्रश्न पाहता तेथे चार्जिग स्टेशन बसवण्याची समस्या आहे. त्यामुळे प्रथम लांब पल्ल्याच्या मार्गावर विजेवर धावणारी बस चालवण्याऐवजी मुंबई ते पुणे अशा कमी अंतरावर बस चालविण्याचा प्रयत्न महामंडळाकडून केला जाणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here