‘त्रोटक प्रतिक्रिया’ ‘त्रोटक बुद्धी’ आपली मुले ‘त्रोटक प्रवृत्ती’ची शिकार होत आहेत का ? सावधान ….

0

BY Newstale
Correspondent Murgud
21 March 2019
समीर कटके

‘त्रोटक प्रतिक्रिया ‘त्रोटक बुद्धी’
आपली मुले ‘त्रोटक प्रवृत्ती’ची शिकार होत आहेत का ? सावधान ….

ज्ञान विज्ञान संशोधन क्षेत्रामध्ये वास्तविक सर्वव्यापी अभ्यास आणि साकल्याने  विचार करण्याच्या सवयीची गरज असते.प्रगल्भता,बालकांचे सामाजिकीकरण,त्याचे शैक्षणिक -व्यावसायिक जीवनातील स्थैर्य यासाठी बालकांच्या विचार क्षमतांना चालना मिळणे गरजेचे असते किंबहुना शालेय जीवनात स्ट्रेस फ्री वातावरणात ‘हॉटस’ (हायर ऑर्डर थिंकिंग स्किल) त्या विकसित करणं हाच उद्देश असतो.

अलीकडच्या काळामध्ये समाजमाध्यमांच्यात असणाऱ्या ‘त्रोटक अभिव्यक्ती’ फॅड मुळे बालकांच्या सहज आणि नैसर्गिक संवाद प्रक्रियेवर अनिष्ट परिणाम होताना दिसत आहे.मोबाईल फोन टॅब्स याद्वारे व्हॉट्सअप,फेस बुक,मेसेंजर,एसएमएस,इंस्टाग्राम यासह विविध एप्लिकेशन्स आणि संवाद प्रणालीच्या वापराची अतिरेकी सवय मुलांमध्ये दिसून येते.याद्वारे फ्रेझेस,एक दोन शब्दातील अतिसंक्षिप्त,काही वेळा अर्धवट वाक्यात त्रोटक किंवा इमोटिकॉन्सचा वापर करून प्रतिक्रिया दिल्या जातात.हिंग्लिश,मराठी हिंदी इंग्रजीचे कॉकटेल तेही त्रोटक वापरून भावना व्यक्त होतात. नेटिझन्सची ही नवी भाषा जरी सोशल मीडियात चलनी व गरजेची बनली असली तरी हे एक भाषेचं अंग किंवा उपप्रकार आहे हे समजावून प्रमाणित भाषा तिची गरज आणि महत्व नव्या पिढीत रुजवणे आवश्यक बनले आहे.

         ऐतिहासिक,राजकीय व्यक्तिमत्व आणि देशातील ज्वलंत प्रश्न याबाबत तथ्यांची मोडतोड करणारे रिमार्क्स करून कोणत्याही पोस्टवर प्रतिसाद देण्याची प्रवृत्ती वाढली आहे.या सवयीत शालेय मुलांच्या त्रोटक प्रवृत्तीचे दर्शन घडत असते.कोणताही सर्वंकष विचार न करता केवळ एक दोन शब्द आणि इमोटिकॉन्स यांच्या साह्याने आपल्या भावना व्यक्त करण्याची प्रवृत्ती वाढत आहे.अशी त्रोटक पद्धतीने व्यक्त होण्याची प्रवृत्ती सर्वस्तरांवर शालेय विद्यार्थ्यांच्यात सर्व वयोगटामध्ये वाढताना दिसत आहे. ही सवय भाषेचा वापर आणि विचार क्षमता दोहोंना व्याधी ठरली आहे.

      शिक्षणाचा सामाजिक आणि राष्ट्रीय हेतू साध्य करत असताना पुढील पिढीने इतिहास,विज्ञान,संस्कृती,मूल्ये यांचा सर्वंकष अभ्यास करून चौफेर व समतोल व्यक्तित्व घडवावे,संशोधन क्षेत्रामध्ये नाव कमवावं आणि पुढील पिढ्यांना प्रगल्भ व सुजाण घडाव्यात अशी अपेक्षा शासन आणि समाजाची असते.पण त्रोटक अभिव्यक्ती मुलांच्या अंगभूत असणाऱ्या संशोधन,सत्यशोधन,सारासार विचार कौशल्यास अटकाव करण्याचं काम करत आहे.ही वृत्ती मुलांच्या सर्वांगिण वाढीस मारक ठरते. निरीक्षण,विचार,आकलन,सामान्यीकरण, संकल्पना धारणा,पृथ:करण,स्वमत याबुद्धी  कौशल्याच्या वाढीस संपवतात.  त्याच बरोबर अशा सवयी मनुष्यबळ विकासास सुद्धा खीळ घालणाऱ्या ठरतील अशी भीती शिक्षण संशोधन क्षेत्रामध्ये वारंवार व्यक्त होताना दिसते.

        उच्च शिक्षण संशोधन व विकास यासाठी उपयुक्त माहितीचे महाजाल असणाऱ्या सोशल मीडियाचा मार्गदर्शनाअभावी होणारा अनियंत्रित वापर सामाजिक समस्या बनत चालला आहे.दहा ते वीस वयोगटातील विशेषतः माध्यमिक व उच्चमाध्यमिक विभागातील विद्यार्थ्यांचा अभ्यास,संशोधन वृत्ती,सर्जनशीलता व सत्यशोधनाच्या अंगभूत धडपडीवर विपरीत परिणाम होत आहेत.त्यामुळे या माध्यमांचा उपयोग कसा करावा याबाबत पालक विद्यार्थ्यांचे प्रबोधन करणे आवश्यक बनले आहे.

   फेसबुक व्हॉट्सअॅप आणि इतर समाज माध्यमांमुळे विद्यार्थ्यांच्या अभिव्यक्तीस प्रचंड वाव मिळतांना दिसते हे सत्य असले तरी मुलांचे चौफेर वाचन,विषयांचे मुळापासून आकलन,स्वतंत्र मते बनवण्याची क्षमता या बाबींकडे दुर्लक्ष होत आहे.सर्वंकष इतंभूत माहिती घेण्याची सवय जर दुर्लक्षित राहिली तर येणाऱ्या पिढ्यांच्या प्रगल्भतेवर  गंभीर प्रश्न उपस्थित होणार आहे.युवकांनी मुलांनी टेक्नोसेव्ही असणं जरी आवश्यक आहे हे जरी खरे असले तरी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आपल्या  व्यक्तिमत्त्वाला अधिक टोकदार बनवण्यासाठी करणे आवश्यक असते. पण प्रत्यक्षात अर्धवट ज्ञानावर दिलेले प्रतिसाद,मोडक्या तोडक्या भाषेत विपर्यास करत दिल्या जाणाऱ्या प्रतिक्रिया समाजमाध्यमांत येणाऱ्या ऐतिहासिक सामाजिक व्यक्तींच्या बद्दल येणाऱ्या पोस्ट शहानिशा न करता किंवा अधिक माहिती न घेता केली जाणारी त्रोटक विश्लेषणे,अंधपणाने फॉरवर्ड होणाऱ्या पोस्ट यामुळे वैचारिक आणि माहितीविषयक गोंधळाची स्थिती निर्माण होत आहे.त्यामुळे समाजमाध्यमात अफवा,कुजबुज,चारित्र्यहनन, माथेफिरूपणा,मानसिक विकृती फोफावत आहे.राजकीय पक्ष संघटनांचे ट्रोलर्स सुद्धा या स्थितीचा फायदा घेत आपला अजेंडा रेटताना दिसतात.

  सद्यस्थीतीत चौफेर वाचन आकलन स्वतंत्र मत बनविण्याची क्षमता या बाबी दुर्लक्षित होत आहेत.किंबहुना राजकीय पक्षांना अशी नागरी प्रगल्भता परवडणारी नाही.मुलांची सामाजिक सांस्कृतिक राजकीय आणि ऐतिहासिक घटना आणि व्यक्तींकडे पाहण्याची दृष्टी बिघडत आहेे. मीडियावर झळकणाऱ्या फोटो,कॅप्शन, बातम्या व इतर पोस्टवरून चटकन मत बनवणे,तात्काळ मोडक्या तोडक्या शब्दात पोस्ट करणे अशी प्रवृत्ती वाढत आहे.

         विद्यार्थ्यांना आवश्यक असणारी माहिती मोबाईलच्या एका क्लिकमध्ये मिळू लागल्याने माहिती शोधण्यासाठी आवश्यक असणारा ध्यास,सहनशीलता कमी होताना दिसते.परिणामी संदर्भग्रंथ चाळणे,अनुषंगिक वाचन,माहितीची शहानिशा,जाणकारांच्या भेटी,मुलाखती,क्षेत्रभेटी,चर्चा परिसंवाद, ही तंत्रे लोप पावत आहेत.लेखी आणि तोंडी स्वरूपात विचार व्यक्त करण्याच्या औपचारिक पद्धती त्यामधले एटिकेट्स यापासून मुले दुरावत आहेत.एव्हढेच काय तर मुलांना रोजच्या जीवनात पालक मित्रांजवळ विचार व्यक्त करताना झगडावे लागते.

या त्रोटक अभिव्यक्ती मानसिकतेचा परिणाम मुलांच्या सहनशीलतेवर होतांना दिसतो.थोरा मोठ्यांशी बोलताना घ्यायची काळजी,समोरच्या व्यक्तीचे बोलणं नीट ऐकून घेण्याची क्षमता,आपली वेळ येण्यापर्यंत थांबण्याची तसदी घेऊन आपली मते व्यक्त करण्याचा शहाणपणा,सहनशीलता संपत आहे.

        शालेय स्तरावरही भाषा विषयाच्या परीक्षा हेतू वाचन आणि त्रोटक लेखी कथन यावर आधारित बनल्या आहेत. स्टडी स्किलचा(अभ्यास कौशल्य) समावेश अभ्यासक्रमात केला आहे.समग्र अभ्यासासाठी ही कौशल्य असताना केवळ शॉर्टकट म्हणून या कडे पाहिले जाते.त्यामुळे इंटेनसिव्ह रिडींग, इंटेनसिव्ह थिंकिंग आणि एक्सप्रेशन आऊटडेट होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here