लहान मुलांवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या नराधमांना मृत्यूदंड

0

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) :
लहान मुलांवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या नराधमांवर कठोर कारवाई करत मृत्यूदंडाची शिक्षा दिली जाणार आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाने हा निर्णय घेतला असून मृत्यूदंडाच्या शिक्षेला परवानगी दिली आहे. पॉस्को कायद्यात बदल करण्यात आला असून त्याअंतर्गत ही शिक्षा दिली जाणार आहे. मंत्रिमंडळाची बैठक पार पडल्यानंतर केंद्रीय कायदा मंत्री रवीशंकर प्रसाद यांनी ही माहिती दिली.

१२ वर्षांखालील लहान मुलांवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या नराधमांना मृत्यूदंडाची शिक्षा व्हावी, यासाठी केंद्र सरकार कायद्यात बदल करेल, असे आश्वासन महिला व बालविकास मंत्री मनेका गांधी यांनी दिले आहे. यासाठी लहान मुलांवरील लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यात (पोस्को) बदल केला जाईल, असे मनेका गांधी यांनी म्हटले होते. त्यानुसार केंद्रीय मंत्रिमंडळाने अखेर पॉस्को कायद्यात बदल केले असून यापुढे लहान मुलांवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या नराधमांना मृत्यूदंडाची शिक्षा दिली जाणार आहे.

कठुआमधील आठ वर्षांच्या मुलीची सामूहिक बलात्कारानंतर हत्या करण्यात आली होती. या प्रकरणानंतर बलात्कार प्रकरणात फाशीची शिक्षा देणारा कठोर कायदा करावा, अशी मागणी पुन्हा एकदा जोर धरु लागली होती. या पार्श्वभूमीवर केंद्रीय महिला व बालविकास मंत्री मनेका गांधी यांनी पोस्को अॅक्टमध्ये बदल करण्याचे आश्वासन दिले होते.

केंद्र सरकारने कायद्यात बदल करण्यापूर्वी राजस्थान व मध्य प्रदेश सरकारने १२ वर्षांखालील मुलींवरील बलात्कार प्रकरणात मृत्यूदंडाची शिक्षा देणारा कायदा मंजूर केला होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here