विधानपरिषदेचे माजी सभापती शिवाजीराव देशमुख यांचे निधन

0

सांगली (प्रतिनिधी) :
महाराष्ट्र विधानपरिषदेचे माजी सभापती आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शिवाजीराव देशमुख यांचे सोमवारी निधन झाले. वयाच्या ८४व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. किडनीच्या आजारावर त्यांच्यावर गेल्या महिनाभरापासून उपचार सुरु होते. दरम्यान, बॉम्बे हॉस्पिटलमध्ये उपचारांदरम्यान त्यांचे निधन झाले. सांगली जिल्ह्यातील कोकरुड येथे उद्या मंगळवारी (दि.१५) त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार आहेत. देशमुख यांच्या निधनानंतर चांगले मार्गदर्शक आणि नेतृत्व हरपल्याच्या भावना विविध राजकीय पक्षांनी व्यक्त केल्या आहेत.

१ सप्टेंबर १९३५ रोजी शिवाजीराव देशमुख यांचा सांगलीत जन्म झाला होता. काँग्रेसचे ते ज्येष्ठ नेते होते तसेच पक्षात त्यांनी महत्वाची पदेही भुषवली होती. एक संयमी नेता आणि चांगला मार्गदर्शक अशी त्यांची ख्याती होती. ते १९९६ आणि २००२ मध्ये विधानपरिषदेवर निवडून गेले होते. तत्पूर्वी १९७८, १९८०, १९८५ आणि १९९० मध्ये ते आमदार म्हणून निवडून आले होते. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस सत्यजित देशमुख हे त्यांचे पुत्र होत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here