ज्येष्ठ विचारवंत प्रा.डॉ.एन.डी.पाटील यांना शिवाजी विद्यापीठाचा”प्राचार्य रा.कृ.कणबरकर राष्ट्रीय पुरस्कार”

0

पुरोगामी चळवळीतील पहाडी नेतृत्व : डॉ एन.डी.पाटील
मुरगुड प्रतिनिधी
ज्येष्ठ विचारवंत प्रा.डॉ.एन.डी.पाटील यांना शिवाजी विद्यापीठाचा”प्राचार्य रा.कृ.कणबरकर राष्ट्रीय पुरस्कार”माजी केंद्रीय मंत्री जेष्ठ नेते शरद पवार यांच्या हस्ते शनिवार ता.१२ जानेवारी २०१९ रोजी सायंकाळी ५.३० वाजता शिवाजी विद्यापीठाच्या राजर्षी शाहू सभागृहात प्रदान केला जात आहे ,त्यानिमित्ताने…वैज्ञानिक समाजवादाचे खुले ज्ञानपीठ समाजवादी प्रबोधिनीचे मुखपत्र ‘प्रबोधन प्रकाशन ज्योती’ मासिकाचे संपादन प्रसाद माधव कुलकर्णी यांनी
‘न्युजटेल’शी आपल्या भावना व्यक्त केल्या.

*पहाडी नेतृत्व:प्रा.डॉ.एन.डी.पाटील*
—-प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी
(९८५०८३०२९०)

महाराष्ट्रातील यच्चयावत प्रबोधन,पुरोगामी,परिवर्तन,समतावादी,साम्यवादी,डाव्या,वंचित-विस्थापित, विवेकवादी,विज्ञानवादी,शेतकरी अशा सर्वच चळवळींचे पहाडी नेतृत्व अशी ज्येष्ठ विचारवंत प्रा.डॉ.एन.डी.पाटील ओळख आहे.अनेक विद्यापीठांनी सन्माननीय “डी.लिट”पदवी देऊन गौरविलेल्या आणि राज्य व राष्टीय पातळीवरील विविध पुरस्कार आपल्या कार्यकर्तृत्वाने मिळविलेल्या एन.डी.सरांना शिवाजी विद्यापीठाचा “प्राचार्य रा.कृ.कणबरकर राष्ट्रीय पुरस्कार”आज प्रदान केला जातो आहे.ही अतिशय आनंददायी बाब आहे.वयाच्या नव्वदीतील एन.डी.सरांनी गेली सात -साडेसात वर्षे समाजासाठी आपले आयुष्य झीजवले आहे.हे तमाम महाराष्ट्र जाणतो.
गेली किमान तीन दशके मी एन.डी.सरांना जवळून पाहतोय.ते सतत कामाच्या रगाड्यात व्यस्त असतात.दिवसाचे चोवीस तासही अपुरे वाटावेत आणि सलग चार तासांची झोप म्हणजे चैन वाटावी इतका हा कामाचा व्याप.लोकांची गर्दी,कार्यक्रमांची आखणी व कृती,प्रचंड स्वरूपाचे अद्यावत वाचन,अफाट व्यासंग,पायाला भिंगरी बांधल्याप्रमाणे होणारा प्रवास,सर्वसामान्यांच्या व्यक्तिगत गाह्राण्यापासून संस्थात्मक अडीअडचणीतुन मार्ग काढण्याची धडपड हे सारे वर्षानुवर्षे नव्हे तर दशकानूदशके सुरू आहे.अलीकडे वयपरत्वे प्रकृतीच्या तक्रारी जाणवत असूनही एन.डी.सर त्या बाजूला ठेवून सदैव कार्यरत असतात.ते स्वतःच म्हणतात तसं “एका पायावर व एका किडणीवर ते लढ्यासाठी सदैव तयार आहेत “.ज्यांना केवळ बघून आपल्या अंगात अक्षय ऊर्जा संचारावी असं विद्यमान महाराष्ट्रातील हे दुर्मिळ व कदाचित एकमेव व्यक्तिमत्त्व आहे.
आशिक्षिततेशी जन्मजात सांगड असणाऱ्या एका गरीब कुटुंबात एन.डी.सर जन्मले.तो दिवस होता १५ जुलै १९२९.हा माणूस मैलोनमैल पायपीट करत,काबाडकष्ट करत शिकला.कर्मवीरांच्या “कमवा व शिका “योजनेचे आचरण करीत ते एम.ए.एल.एल.बी.झाले.शिक्षक,प्राध्यापक,प्राचार्य झाले.नोकरीतून सुखी जीवनाची हमी निर्माण झालेली असतांनाच अवघी सहा -सात वर्षे त्यांनी ती नोकरी केली आणि सोडून दिली.ऐन तारुण्यात गिरणी कामगार युनियनचा सेक्रेटरी म्हणून त्यांनी नाममात्र जीवनवेतनावर कार्यकर्ता म्हणून समाजकारणात,राजकारणात पदापर्ण केले.भारतीय स्वातंत्र्य लढ्याने आणि भारतीय संविधानाने स्वातंत्र्य,सार्वभौमत्व,एकात्मता,धर्मनिरपेक्षता,समाजवाद,लोकशाही अशी मूल्ये रुजवली.त्या मूल्यांशी पूर्ण निष्ठा ठेवून ती समाजात रुजविण्यासाठी एन.डी.आजही उर्मीने कार्यरत आहेत.हे सारे घडते आहे ते सर्वसामान्य जनतेशी त्यांची जी अतूट नाळ जुळलेली आहे त्यामुळेच.ती बांधीलकी अनमोल स्वरूपाची आहे.
विदयार्थीदशेत स्वातंत्र्य आंदोलनात सहभागी होत कारावास भोगलेल्या एन.डी.सरांनी गोवामुक्ती लढा,संयुक्त महाराष्ट चळवळ,सीमा लढा,साराबंदी चळवळ,शेतकरी आंदोलन,दुष्काळ निवारण ,किमान हमी भाव, एन्रॉन विरोधी लढा, टोल विरोधी आंदोलन,सेझ विरोधी लढा,उच्च न्यायालय खंडपीठ,विजदरवाढ विरोधी आंदोलन,शिक्षण बचाओ आंदोलन,पाणी हक्क आंदोलन,जागतिकीकरण विरोधी लढा यासारखी शेकडो आंदोलने गेल्या काही दशकात एन.डी.सरांच्या नेतृत्वाखाली लढली गेली.अनेक यशस्वी झाली या काहींच्या यशस्वीतेसाठी ते आजही लढत आहेत.जनतेसाठी केलेल्या या आंदोलनात त्यांना अनेकदा लाठीमार झेलवा लागला आहे.तुरुंगवास पत्करावा लागला आहे.इतकेच नव्हे तर गोळीबारही पेलला आहे.इस्लामपूरातील लढ्यात आपल्या पुतण्याबरोबरच काही सहकाऱ्यांचे हौतात्म्यही त्यांनी सर्वसामान्य लोकांसाठी चेहऱ्यावर दुःख न दाखवता पचवलेले आहे.तेवीस वर्षे आमदार म्हणून,अडीच वर्षे मंत्री म्हणून,आघाडी सरकारचे निमंत्रक म्हणूनही त्यांनी मोठी कामगिरी केली आहे.
सर्वसामान्यांचे संसार उभे करताना ,लढे लढताना एन.डी.सर व्यावहारिक अर्थाने संसारात फारसे अडकून पडले नाहीत.अर्थात नात्यातला कमालीचा जिव्हाळा मात्र ते सदैव जपत असतात.समाजाचा पूर्ण वेळ संसार करण्याची अशी पूर्ण मोकळीक एन.डी.सरांना मिळाली आहे याचे सर्व श्रेय अर्थातच त्यांच्या अर्धांगिनी सरोजताई उर्फ माईनाच द्यावे लागेल.एन.डी. सरांसारख्या वादळाचा संसार माईंनी शिक्षिकेची नोकरी करत आणि सर्व कौटुंबिक जबाबदाऱ्या पार पाडत पेलला.आजही माई या साऱ्यात कमालीच्या तन्मयतेने व्यग्र असतात.आपल्या मुलांनाही अंगभूत गुणांवरच पुढे जाण्याची दीक्षा या दाम्पत्याने दिली.”सागर”या आंतरराष्ट्रीय पातळीवरील जलतरणपटू नातवाचा वयाच्या ऐन विशीत रक्ताच्या कर्करोगाने झालेल्या मृत्यूचे दुःखही त्यांनी पचविले.त्याच्या स्मृतिप्रीत्यर्थ नवे जलतरणपटू घडावेत याहेतूने आलिम्पिक दर्जाच्या जलतरण तलावाची कल्पना कृतीत आणली.कौटुंबिक सुख -दुःखाच्या सर्व वाटचालीत माईंची खंबीर साथ ,त्यांचा मोठा त्याग हे “एन.डी.”नावाच्या सामर्थ्यामागचे सामर्थ्य आहे यात शंका नाही.
लोकप्रतिनिधी म्हणून त्यांनी केलेले काम व घेतलेले निर्णय महाराष्ट्राच्या दीर्घकालीन हिताचे ठरले आहेत.एक अभ्यासू,जागरूक,झुंझार,निस्पृह आणि कृतिशील विचारवंत व लढवय्ये नेतृत्व म्हणून एन.डी.सरांचा मोठा नावलौकिक आहे.तीव्र स्मरणशक्ती ,लालित्यपूर्ण ओघवती भाषा,कथाकवितांची पेरणी करत प्रसंगांचे गंभीर्य ध्यानात आणून देण्याची अद्भुत शैली आणि शब्दाशब्दातुन व्यक्त होणारी सामान्य माणसांशी नाळ ही वैशिष्टये असणारे त्यांचे भाषण आणि लेखन म्हणजे एक अनमोल ठेवाच असतो.सत्ताधाऱ्यांपासून सर्वसामान्य कार्यकर्त्यांवरही एक प्रकारचा नैतिक धाक असणारे,मात्र सर्व समस्यांतून निश्चितपणे मार्ग काढू शकतील असा विश्वास सर्वाना देणारे एन.डी.सरांखेरीज दुसरे व्यतित्व महाराष्ट्रात नाही असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.त्यांनी लिहिलेल्या अनेक पुस्तिका,लेख अतिशय मौलिक स्वरूपाचे विचारधन आहे.
साधी राहणी व उच्च विचारसरणीचे ते मूर्तिमंत प्रतीक आहेत.साठ वर्षांपूर्वी दस्तुरखुद्द कर्मवीरांनी एन.डी.सरांना रयत शिक्षण संस्थेचे सभासद करून घेतले होते.रयत शंभराव्या वर्षात पदार्पण करताना त्यातील वीस वर्षे चेअरमन म्हणून आणि साठ वर्षे सदस्य म्हणून एन.डी.नी दिलेले योगदान फार मोठे आहे. समाजवादी प्रबोधिनीचे संस्थापक सदस्य व विद्यमान अध्यक्ष असलेले एन.डी.महाराष्ट्रातील अनेक प्रबोधन,शैक्षणिक,सामाजिक संस्था – संघटनांचे ते प्रमुख आधारस्तंभ आहेत.अनेक मनाचे पुरस्कार सरांकडे चालत आले. आज मिळणारा “प्राचार्य रा.कृ.कणबरकर राष्ट्रीय पुरस्कार ” हाही त्यांच्या कार्याचा उचित बहुमान आहे.एन.डी.सर अनेकदा आपल्या भाषणात रॉबर्ट फ्रॉस्टच्या कवितेचा दाखला देत म्हणतात ,” या वनराजीतून बाहेर जाणारे दोन रस्ते होते.त्यापैकी कमी मळलेला रस्ता मी निवडला.आज जो काही मी आहे तो त्या वाटचालीतून घडलो आहे.”पण एन.डी.सर स्वतःच महाराष्ट्राच्या राजकारणात,समाजकारणात,सांस्कृतिक क्षेत्रात स्वतःचा वेगळा रस्ता निर्माण करणारे आहेत “.शिवाजी विद्यापीठाच्या स्थापना समितीत एन.डी.होते,काही वर्षांपूर्वी त्यांना सन्माननीय “डी.लिट”ही दिली होती.आज “प्राचार्य रा.कृ.कणबरकर राष्ट्रीय पुरस्कार “देऊन शिवाजी विद्यापीठाने मोठा कृतज्ञभाव जपला आहे असे म्हणावे लागेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here