शिवाजी विद्यापीठाचा शुक्रवारी दिक्षांत समारंभ

0

कोल्हापूर (प्रतिनिधी) :

शिवाजी विद्यापीठाच्या सर्वसाधारण कौशल्यासाठीच्या राष्ट्रपती सुवर्णपदकाचा मानकरी अर्जुनवाडा (ता. राधानगरी) येथील सत्यजित संजय पाटील ठरला. पुलाची शिरोली (ता. करवीर) येथील साक्षी शिवाजी गावडे हिने कुलपतीपदक मिळविले. यावर्षी ४८,५१५ स्नातकांना पदवीप्रमाणपत्रे प्रदान केली जाणार असल्याची माहिती कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे आणि परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक महेश काकडे यांनी पत्रकार परिषदेत दिली. विद्यापीठाचा ५५ वा दीक्षान्त समारंभ शुक्रवारी (दि. २२) दुपारी दीड वाजता लोककला केंद्रात होणार आहे. अध्यक्षस्थानी राज्यपाल सी. विद्यासागर राव, तर तिरूचिरापल्ली येथील इंडियन इन्स्टिट्यूट आॅफ मॅनेजमेंटचे संचालक डॉ. भीमराया मेत्री प्रमुख उपस्थित असणार आहेत.


विद्यापीठाच्या सर्वसाधारण कौशल्यासाठीच्या राष्ट्रपती सुवर्णपदकाचा मानकरी ठरलेला सत्यजित पाटील हा भौतिकशास्त्र अधिविभागात एम. एस्सी. द्वितीय वर्षात शिकत आहे. एम. ए. अभ्यासक्रमात सामाजिकशास्त्र विषयामध्ये सर्वाधिक गुणांसह ‘कुलपती पदक’ पटकविणारी साक्षी गावडे ही मानसशास्त्र विषयातील एम. ए. पदवीधारक आहे. दीक्षान्त समारंभानिमित्त ग्रंथमहोत्सव आणि ग्रंथदिंडीचे आयोजन केले आहे. शासन परिनियमानुसार यावर्षी विद्यापीठातील अधिविभागांतील स्नातक, पीएच. डी.धारकांना दीक्षान्त समारंभात पदवी प्रदान केली जाणार आहे. त्यांची संख्या २७०२ इतकी आहे.


महाविद्यालयातील स्नातकांना ‘ग्रॅज्युएशन डे सेरेमनी’ (पदवी प्रदान सोहळा)च्या माध्यमातून पदवी प्रदान करण्यात येणार आहे. यंदा पदवी प्रदान केल्या जाणाऱ्या स्नातकांमध्ये विद्यार्थिनी आघाडीवर आहेत. त्यांची संख्या २६०३६ इतकी आहे. या पत्रकार परिषदेस प्र-कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के, कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here