शिरढोणमध्ये सव्वाशे एकरावरील ऊस जळून १२ लाखाचे नुकसान

0

इचलकरंजी (प्रतिनिधी) :

शिरढोण (ता. शिरोळ) मधील इचलकरंजी रस्त्यावरील उसाच्या फडाला रविवारी दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास अचानक आग लागली. यामध्ये सव्वाशे एकर ऊसाचा फड जळून खाक झाला. या आगीत 23 शेतकऱ्यांचे अंदाजे दहा ते बारा लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. इचलकरंजी नगरपरिषदेच्या अग्निशामक दलाने आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला, मात्र आगीने रौद्ररूप धारण केल्याने या आगीत सगळा ऊस जळून खाक झाला.

शिरढोण येथील इचलकरंजी रस्त्यावरील शंकर बालीघाटे, शितल देबीसे, विकास तनपुरे, बंडू पाटील, सचिन आडगाणे यांच्यासह पंचवीस ते तीस शेतकऱ्यांच्या उसाला रविवारी दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास अचानक आग लागली. वार्‍यामुळे आगीने रौद्र रूप धारण केले होते. या आगीचे लोट अन्य उसाच्या फडात वाऱ्याने उडून गेल्याने सव्वाशे एकर शेतीचा ऊसपट्टा जळून खाक झाला आहे.

आगीने रौद्ररुप धारण केल्याने परिसरातील विश्वास बालीघाटे, नागेश कोळी, राजेखान नदाफ, रावसाहेब कागले बल्ली गुरुवाण या सामाजिक कार्यकर्त्यांनी इतर उसाच्या फडाला आग लागू नये यासाठी सरीतील उसाचा भाग तोडून टाकत आगीला पसरण्यापासून रोखले. यामुळे आणखीन शेतकऱ्यांचे नुकसान होण्यापासून टळले. मात्र ही आग कोणत्‍या कारणाने लागली हे अजून स्‍पष्‍ट झालेले नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here