साहेबांचे मीठाचे प्रयोग…

"काही काळजी करू नकोस मी भरपूर मीठ आणले आहे आणि आपल्याकडचे बरेच खानसामेदेखील आता बाहेर पाठवणार आहे"

0

जानेवारी २०१४ मध्ये कोल्हापूरातला एक वजनदार कार्यकर्ता साहेबांना भेटला. त्याच्या आदल्या दिवशीच साहेबांनी जाहीर केलं होतं की देशात कुणाची लाट बीट काही नाहीये आणि असली तरी महाराष्ट्र लाटेवर मतदान करत नाही. भेटायला गेलेला माणूस साहेबांचा अगदी जुना माणूस. त्याला माहिती होतं की साहेब असे बोलले म्हणजे नक्कीच उलटे असणार. त्यामुळे त्याला दहा मिनिटे भेटण्याची वेळ असूनही गेल्या गेल्या त्याने ‘लाटे’चा विषय काढला. साहेब मिश्कीलपणे हसले. त्याने काय ओळखायचे ते ओळखले. मग स्थानिक राजकारणावरची आपली माहिती देताना त्या कार्यकर्त्याने आपल्या जिल्ह्यात नव्या पक्षाचा ‘स्वाभिमान’ वाढत चालल्याचे सांगितले. तरीही साहेब शांतच होते. शेवटी तो कळवळून गेला आणि आता आपला पक्ष संपतोय की काय असे दिवस आलेत असं सांगून गहिवरून गेला. साहेबांनी त्याच्या खांदयावर थाप टाकली. ते म्हणाले “काही काळजी करू नकोस मी भरपूर मीठ आणले आहे आणि आपल्याकडचे बरेच खानसामेदेखील आता बाहेर पाठवणार आहे”. साहेब गालात हसले आणि तो ज्येष्ठ कार्यकर्ता मनावरचा ताण हलका होऊन तिथून निघून कोल्हापूराकडे रवाना झाला.

खरे तर पश्चिम महाराष्ट्राचे राजकारण अगदी साहेब म्हणतील तसेच चालले होते. पण २००४ मध्ये शेतकरयांचे प्रश्न आणि भूमीपुत्रांचा तोंडवळा घेऊन एक पक्ष पुढे आला. अर्थात हा पक्ष आधीच्या एका संघटनावजा पक्षातूनच निर्माण झालेला होता. बघता बघता याकडे ग्रामीण भागातील लोकांचा ओढा वाढत गेला. नेत्यांना हुरूप आला हिंसक आंदोलने आणि मागण्यांचा जबरदस्त रेटा यांच्या जोडीला उत्कृष्ट संघटन याच्या जोरावर बघता बघता पश्चिम महाराष्ट्रात जम बसवला. आपले शेतकरी, कष्टकरी आपल्या पासून हलण्याच्या बेतात आहेत हे साहेबांनी ओळखले. पण तोवर दहा वर्षे उलटली. दोन शिलेदारांच्या जोरावर उभ्या असणारया या पक्षाचे ‘धिरडे’ कसे करायचे हे साहेबांच्या डोक्यात होतेच. २०१४च्या लोकसभा निवडणुकात आपण आधीच्याच जागेवरून उभे राहिलो की या पक्षाचा आपल्याला दगाफटका होऊ शकतो हे ओळखून साहेब राज्यसभेत गेले. मरगळून गेलेल्या अकलूजच्या गढीतल्या सुभेदारांना त्यांनी लोकसभेचे ‘ते’ तिकीट बहाल झाले. लोकसभेत साहेबांच्या पक्षाचा अपेक्षेप्रमाणे दारुण पराभव झाला आणि वर्षाच्या उत्तरार्धात झालेल्या विधानसभेत देखील हाच सिलसिला जारी राहिला. त्यांची माणसे सत्तारूढ पक्षात सर्वत्र शिरली होती, ती त्यांच्या पक्षाची खरी रसद होती म्हणूनच साहेब मात्र निर्धास्त होते,
मग रिकामं बसल्या बसल्या साहेबांनी आपल्या वाटेतले काटे कसे दूर करता येतील यासाठीची बेरीज वजाबाकी सुरु केली. मग साहेबांनी दिल्लीवरून एकेक शक्तिमान माणूस आपल्या भेटीस बोलवायला सुरुवात केली. या लागोपाठ भेटीगाठी बघून लोकानी तोंडात बोटे घातली. कधी कधी तेही दिल्लीला जाऊन भेटू लागले. दर भेटीत एक नवा खानसामा तिकडे सोडण्याचा त्यांचा बेत असे आणि त्याला त्यांच्या गोटात नेऊन सोडत. त्याच्यापाशी मिठाचे मोठाले पुडे दिलेले असत. आपले खानसामे कधी तळपातळीवरून तर कधी केंद्रपातळीवरून ते पाठवत राहिले. फेब्रुवारी २०१५ ला बारामतीत साहेबांनी कहर केला, त्यांनी लाटेच्या प्रधानांनाच गावी आणले आणि त्यांच्या डेरयात काही माणसे पाठवली. जून २०१६ मध्ये महाराष्ट्राच्या विधानपरिषदेच्या निवडणुका होत्या. साहेबांनी एक ‘स्वाभिमानी’ माणूस निवडून येईल याची काळजी घेतली. निवडून आणलेला स्वाभिमानी माणूस मंत्रीमंडळात घालताना तिथल्या दारात ताठकळत बसून असलेल्या ‘संग्रामी’ नेत्याचे त्यांनी पार ‘शिव शिव’ केले ! तो बिचारा पुन्हा रस्त्यावर आला ! दुसऱ्या एका कवींची तर आता मिडीयाला देखील ‘आठव’ण येत नाही इतके त्यांचे वजन कमी झालेय. ‘महादेवा’ची देखील साहेबांनी तिकडेच बोळवण करून रान मोकळे करून घेतलेय. आता मंत्रीमंडळातला स्वाभिमानी आणि बाहेरचा स्वाभिमानी एकमेकाची शेंडी तुटो वा पारंबी या मूडमध्ये आलेत.

आता तीन वर्षे झालीत लाटेवरचे सरकार दिल्लीतही आहे आणि राज्यातही आहे. लाटेवर स्वार होऊन भारतभरात आलेली सरकारे खाऊन पिऊन सुखी आहेत पण महाराष्ट्रातले सरकार काही केल्या बाळसेच धरत नाहीये. कारण साहेबांनी वेळोवेळी आत पाठवलेले खानसामे ‘साहेबांनी दिलेलं’ खास ‘मीठ’ वापरून राज्यकर्त्यांचे जेवण पार खारट करताहेत. ते पचणार कसे ?… साहेब आता पुढच्या तयारीला लागलेत, लाटेच्या प्रधानांना ते नुकतेच भेटलेत. आता आणखी एक ‘कोकणी’ खानसामा ते आत पाठवत आहेत. त्याची बोलणी पक्की झालीत. शिवाय मध्येच आत ढकलुन दिलेल्या ‘पुरुषोत्तम’ खानसाम्याचे ‘वर्षा’वरचे शेफ शो अजून व्हायचेत, तो साहेबांचा खास खानसामा आहे. तो कधी काय पकवेल हे साहेब वगळता अजून कुणालाही माहिती नाही. मागच्या तीन वर्षात असे अनेक खानसामे साहेबांनी लाटेच्या घरात मागच्या पुढच्या दाराने आत पाठवले आहेत. आमच्या सोलापुरात तर लाटेच्या घरातली माणसं बाहेर आणि साहेबांची माणसं आत आहेत. अगदी झेडपीच्या अध्यक्षपदी सुद्धा साहेबांचेच लोक आहेत ! लाटघराचे समर्थक आनंदात आहेत, साहेब मात्र गालातल्या गालात बसल्या बसल्या मिठाचे पुडे कुठे किती किती वाटायचे याची गणिते घालताहेत …
कोल्हापूरचा तो वजनदार कार्यकर्ता साहेबांच्या मीठाच्या प्रयोगावर बेहद्द खुश असल्याचे माझ्या करवीरवासी पत्रकार मित्रांनी आजच कळवले आहे…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here