शिवसेना-भाजपा सत्तेसाठी नव्हे तर विचारधारेने एकत्र : मुख्यमंत्री फडणवीस

0

अमरावती (प्रतिनिधी) :

शिवसेना भाजपाची युती म्हणजे फेव्हिकॉलचा जोड आहे. कोनीही कितीही तोडण्याचा प्रयत्न केला तरी तुटणार नाही असं वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. ही युती केवळ सत्तेसाठी नाही, ही युती विचारांची आहे. होय आम्हाला अभिमान आहे आम्ही हिंदुत्ववादी पक्ष आहोत असंही यावेळी मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. युती झाल्यानंतर पहिल्यांदाचा अमरावतीत शिवसेना – भाजपा युतीचा महामेळावा पार पडला. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे उपस्थित होते. आमचं हिंदुत्व राष्ट्रसाठी, ज्याला देशावर प्रेम आहे, ते आमचं हिंदुत्व आहे असंही ते यावेळी म्हणाले.

सत्तेकरता युती झालेली नाही असं सांगताना भविष्यात युती अशीच टिकणार असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. युती झाल्यानंतर काहीजणांनी माघार घेतली असा टोला मुख्यमंत्र्यांनी शरद पवारांचं नाव न घेता लगावला. युती हा आपला एकच धर्म, जिथे कमळ तिथे कमळ, जिथे धनुष्य तिथे धनुष्य, इतरत्र बघायचं नाही असं यावेळी मुख्यमंत्र्यांनी बजावून सांगितलं.

आजकाल कोणावर टीका करायची म्हणजे पंचायत होते. उद्या शिवसेना नाही तर भाजपात असायचा. एक विनंती आहे आता शरद पवारांना भाजपात घेऊ नका. नाही तर निवडणुकीत गंमत येत नाही. थोडी तरी लोक समोर ठेवा. सगळेच आपल्या पक्षात आले तर बोलायचं कोणावर असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.

यावेळी उद्धव ठाकरेंनी युतीवर भाष्य केलं. वाद असले तरी कधीही आपला संघर्ष कधीही राज्याच्या हिताआड येऊ दिलं नाही असं सांगताना उद्धव ठाकरेंनी नरेंद्र मोदींचंही कौतुक केलं. अजूनही मी त्यांना नरेंद्रभाई म्हणतो. आपला भाऊ वाटावा अशी व्यक्ती देशाच्या पंतप्रधानपदी असल्याचा अभिमान आहे असं उद्धव ठाकरेंनी सांगितलं.

काही दिवसांपूर्वी दोन्हीकडून उघड तलवारी काढल्या होत्या, काही गोष्टी झाल्या त्या सगळ्या विसरा आणि आता खऱ्या तलवारी काढून मैदानात उतरा असं आवाहन यावेळी उद्धव ठाकरेंनी केलं. मुख्यमंत्र्यांनी मनातून आणि म्यानातून तलवारी काढल्या आहेत असंही ते यावेळी म्हणाले. शिवसेना भाजपा जनतेची शेवटची अपेक्षा असून आम्ही गेलो तर अंधार पसरेल असं सांगत सर्वसमान्यांना आधार देणारा दुसरा कोणताही पक्ष नाही असं उद्धव ठाकरेंनी म्हटलं.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here