शिष्यवृत्तीची रक्कम थेट विद्यार्थ्यांच्या बॅंक खात्यावर !

0

सन 2017-18 या वर्षापासून महाराष्‍ट्र शासनाने सर्व प्रकारच्‍या शिष्‍यवृत्‍तीसाठी एकत्रित संकेतस्‍थळ विकसित केले आहे. महाडीबीटी ( https//mahadbt.gov.in ) हे या संकेतस्‍थळाचे नाव असून माहिती व तंत्रज्ञान यांच्यामार्फत कार्यान्वित करण्‍यात आले आहे. सामाजिक न्‍याय विभागाच्‍या शिष्‍यवृत्‍ती, शिक्षण व परीक्षा शुल्क, विद्यावेतन, निर्वाह भत्‍ता वितरीत करण्‍याच्‍या योजनांचा समावेश या संकेतस्‍थळावर करण्‍यात आला आहे. आता विद्यार्थ्‍यांना देय होणारी वित्‍तीय लाभाची सर्व रक्‍कम ही विद्यार्थ्‍यांच्‍या आधार संलग्नित बँक खात्‍यात थेट जमा करण्‍यात येणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना दिली जाणारी शिष्यवृत्ती थेटपणे त्यांच्या उपयोगाला येणार आहे. मध्यस्थ अथवा शिष्यवृत्ती कमी मिळण्याचा त्रास यापुढे असणार नाही. या ऑनलाईन शिष्यवृत्ती योजनेचा फायदा राज्यातील लाखो विद्यार्थ्यांना होणार आहे. या शिष्‍यवृत्‍तीच्‍या लाभासाठी विद्यार्थ्यांना ऑनलाईन अर्ज भरणे आवश्‍यक आहे.

भारत सरकार मॅट्रिकोत्‍तर शिष्‍यवृत्‍ती, राज्‍य शासनाची मॅट्रिकोत्‍तर शिक्षण शुल्क, परीक्षा शुल्क प्रतीपुर्ती योजना, राजर्षी शाहू महाराज गुणवत्‍ता शिष्‍यवृत्‍ती (इ. 1112 वी), सैनिक शाळेतील विद्यार्थ्‍यांना निर्वाह भत्‍ता, राज्‍य शासनाची मॅट्रिकपूर्व शिक्षण शुल्क, परीक्षा शुल्क प्रतीपुर्ती योजना, अस्‍वच्‍छ व्‍यवसायात काम करणा-या पालकांच्‍या मुलांना मॅट्रिकपूर्व शिष्‍यवृत्‍ती, इ. 9 वी व 10 वीच्‍या अनुसूचित जातीच्‍या विद्यार्थ्‍याना केंद्र शासनाची मॅट्रिकपूर्व शिष्‍यवृत्‍ती, सावित्रीबाई फुले शिष्‍यवृत्‍ती (इ.5 वी ते इ. 7 वी, इ.8 वी ते 10 वी), माध्‍यमिक शाळेतील इ. 5 वी ते 10 वी मधील विद्यार्थ्‍यांना शिष्‍यवृत्‍ती या योजना आता ऑनलाईन करण्‍यात आल्‍या आहेत.

आतापर्यंत शिष्‍यवृत्‍तीची रक्‍कम विद्यार्थ्‍यांच्‍या खात्‍यावर आणि शिक्षण शुल्क व इतर शुल्‍काची रक्‍कम विद्यार्थी ज्‍या महाविद्यालयात शिक्षण घेत आहेत, त्‍या महाविद्यालयाच्‍या खात्‍यावर जमा करण्‍यात येत होती. परंतू आता देय होणारी वित्‍तीय लाभाची सर्व रक्‍कम ही लाभार्थी विद्यार्थ्‍याच्‍या आधार संलग्नित बँक खात्‍यात थेट जमा करण्‍यात येणार आहे. अनुसूचित जातीच्‍या विद्यार्थ्‍यांना शिष्‍यवृत्‍ती, शिक्षण शुल्क, परीक्षा शुल्क, निर्वाह भत्‍ता, विद्यावेतन विषयक योजनांचा लाभ मिळणेकरिता स्‍वतःची नोंदणी करणे, अर्ज भरणे, अर्ज भरल्‍यापासून ती रक्‍कम लाभार्थ्‍यांच्‍या बँक खात्‍यात जमा करण्‍याची सर्व प्रक्रिया आता राज्‍यस्‍तरीय महाडीबीटी पोर्टलमार्फत करणे अनिवार्य करण्‍यात आले आहे. विद्यार्थ्‍यांच्‍या आधार संलग्‍न बँक खात्‍यावर ही लाभाची रक्‍कम जमा केल्‍याबाबतची सूचना महाडीबीटी पोर्टलद्वारे प्रत्‍येक महाविद्यालयांना दिली जाणार आहे. त्‍यामुळे संबंधित विद्यापीठ, शैक्षणिक संस्‍था, महाविद्यालय, तंत्रनिकेतन यांनी कोणत्‍याही अनुसूचित जातीच्‍या विद्यार्थ्‍याकडून प्रवेशाच्‍या वेळी शिक्षण शुल्‍काची रक्‍कम घेवू नये, तसेच कोणत्‍याही अनुसूचित जातीच्‍या विद्यार्थ्‍याची आर्थिक पिळवणूक होणार नाही याची योग्‍य ती दक्षता घेण्‍याची जबाबदारी संबंधित शैक्षणिक संस्‍थांची राहणार आहे.

अ) ऑनलाईन नोंदणी करण्यासाठी पूर्वतयारी – विद्यार्थ्‍यांनी आपला आधार क्रमांक काढणे आवश्‍यक आहे. विद्यार्थ्‍यांनी कोअर बॅंकींग सुविधा असलेल्‍या बँकेच्‍या शाखेमध्‍ये खाते उघडावे. विद्यार्थ्‍यांना आपला जातीचा दाखला, जात पडताळणीचा दाखला, इयत्‍ता 1012 वी तसेच मागील परीक्षा उत्‍तीर्ण झालेला दाखला व गुणपत्रक, जन्‍मतारखेचा पुरावा, रहिवासी दाखला, उत्‍पन्‍नाचा दाखला, प्रवेशित महाविद्यालयाची माहिती, प्रवेशित अभ्‍यासक्रमाची माहिती, अभ्‍यासक्रमाचा कालावधी, बँकेच्‍या पासबुकची झेरॉक्‍स, आधार कार्ड, दिव्‍यांग असल्‍यास दिव्‍यांगाचा दाखला, शिधापत्रिका इत्‍यादी कागदपत्रांची आवश्‍यकता आहे.
ब) नोंदणी कशी करावी – कोणत्‍याही ब्राऊझरचा वापर करुन https//mahadbt.gov.in या वेबसाईटवर जाऊन नवीन नोंदणी बटनावर क्लिक करावे. प्रत्‍येक विद्यार्थ्‍याने (ज्‍या विद्यार्थ्‍याने यापूर्वी e-scholarship पोर्टलवर नोंदणी केली होती त्‍यांनी सुध्‍दा) mahadbt पोर्टलवर नोंदणी करणे आवश्‍यक आहे. आधार क्रमांकाचा उपयोग करुन नोंदणी करावी. त्‍यासाठी आधार कार्ड आहे ? असेल तर होय व नसेल तर नाही वर क्लिक करावे. त्‍यानंतर ओटीपी हा पर्याय निवडावा, वैध आधार क्रमांक टाकल्‍यानंतर ओटीपी पाठवा या बटनवर क्लिक करावे, मोबाईल क्रमांकावर प्राप्‍त झालेला ओटीपी टाकून पडताळणी करा हे बटन क्लिक करावे. उपलब्‍ध विंडोमध्‍ये नाव, जन्‍मतारीख, फोन नंबर, पत्‍ता आधार संलग्‍न बँक खाते नंबर इत्‍यादी आधार कार्डवरील माहिती आपोआप दिसेल. आधार क्रमांक नसल्‍यास आधार कार्ड नाही हा पर्याय निवडा आणि आवश्‍यक ती माहिती भरावी व कागदपत्रे अपलोड करावीत. नोंदणी अर्जाच्‍या विंडोमधील सर्व माहिती भरावी स्‍वतःचा युजर नेम व पासवर्ड तयार करावा.

क) अर्ज कसा करावा – महाडीबीटी पोर्टलवर लॉगइन करण्‍यासाठी सिलेक्‍ट युजरमध्‍ये जावून विद्यार्थी हा पर्याय निवडावा, युजर नेम व पासवर्ड टाकून लॉगइन करावे. लॉगइन झाल्‍यानंतर विंडोमध्‍ये योजना तपशील यावर क्लिक करा. त्‍यानंतर विभागावार योजना आपण पाहू व निवडू शकाल. त्‍यानंतर कोणत्‍या योजनासाठी (मॅट्रीकपूर्व / मॅट्रीकोत्‍तर) आपण पात्र आहात त्‍याची खात्री करा व पर्याय क्लिक करा (उदा. शालेय विद्यार्थ्‍यानी मॅट्रीकपूर्व व महाविद्यालयीन विद्यार्थ्‍यांनी मॅटि्कोत्‍तर हा पर्याय निवडावा). आवश्‍यक ती सर्व माहिती उदाहरणार्थ जात, प्रवर्ग, महाराष्‍ट्राचे रहिवासी, अपंगत्‍व, कौटुंबिक उत्‍पन्‍न इत्‍यादी माहिती सॉफ्टवेअरमध्‍ये काळजीपूर्वक भरावी. पालकांची माहिती, शाळा/ महाविद्यालयाचा तपशील नमूद करावा. आवश्‍यक ती कागदपत्रे अपलोड करावीत (रहिवासी दाखला, उत्‍पन्‍न दाखला, एसएससी प्रमाणपत्र, जात प्रमाणपत्र, वैधता प्रमाणपत्र, बँक खाते क्रमांक, आधार क्रमांक इत्‍यादी). अभ्‍यासक्रमाचा तपशील, मागील परीक्षा उत्‍तीर्ण झाल्‍याचा तपशील इत्‍यादी सर्व माहिती अर्जदाराने भरावयाची आहे आणि सबमिशन पेजमधील सादर या बटनवर क्लिक करावयाचे आहे. विद्यार्थी-पालकांना काही अडचण असल्‍यास त्‍यांनी 18001025311 या टोल फ्री क्रमांकावर किंवा helpdesk@mahadbt.gov.in या ईमेल आयडीवर संपर्क साधावा.

ड) महाविद्यालयांसाठी सूचना – महाडीबीटी पोर्टलवर विद्यार्थ्‍यांना ऑनलाईन नोंदणी करणे व अर्ज करण्‍यासाठी सहकार्य करावे. अनूसुचित जातीच्‍या कोणत्‍याही पात्र विद्यार्थ्‍याकडून प्रवेशाच्‍या वेळी शिक्षण व परीक्षा शुल्‍काची रक्‍कम घेवू नये. विद्यार्थ्‍यांना आधार क्रमांक काढणे, कोअर बँकिंग सुविधा असलेल्‍या बँकेच्‍या शाखेमध्‍ये खाते उघडण्‍यासाठी सूचना द्याव्‍यात. आपल्‍या महाविद्यालयाचे नाव, महाविद्यालयास मान्‍य असलेल्‍या अभ्‍यासक्रमांची नावे, अभ्‍यासक्रमाचा कालावधी, अभ्‍यासक्रमनिहाय प्रवेश क्षमता, महाविद्यालयाच्‍या व अभ्‍यासक्रमाच्‍या मान्‍यतेचे विविध आदेशांची माहिती पोर्टलवर मॅप करण्‍यासाठी आपापल्या आयुक्‍तालयास, संचालनालयास, विद्यापीठास, परिषदेस सादर करुन ती मॅप करुन घेण्‍याची कार्यवाही करावी. महाविद्यालय, त्‍यांचा अभ्‍यासक्रम, प्रवेश क्षमता, अभ्‍यासक्रमाचा कालावधी, शुल्‍क रचना इत्‍यादी माहिती पोर्टलमध्‍ये समावेश (मॅप) करण्‍याची जबाबदारी संबधित महाविद्यालयाची राहील. त्‍यासाठी ज्‍या प्राधिकाऱ्यांनी मान्‍यता दिली आहे त्‍यांच्याशी संपर्क साधावा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here