महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या योजना

0

प्रवाशांच्या सेवेसाठी या ब्रीद वाक्याला अनुसरुन महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाकडून समाजातील विविध घटकांना एसटी प्रवास सवलतीबाबत विविध उपक्रम राबविले जातात. या सवलतीच्या विस्ताराबाबत नुकताच राज्यमंत्री मंडळाच्या बैठकीत निर्णय घेण्यात आला. याचा विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, स्वातंत्र्य सैनिक, आजारी व्यक्तीसह विविध घटकांना लाभ होईल.

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या विविध प्रवास सवलत योजनांमध्ये पुढीलप्रमाणे सुधारणा केली आहे. तसेच नवीन योजना सुरू करण्यात येत आहेत.

१. अहिल्याबाई होळकर योजना :
या योजनेअंतर्गत सध्या ग्रामीण भागातील ५ वी ते १० वी पर्यंत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थीनींना शाळेत जाण्यासाठी एसटीने मोफत प्रवास सवलत लागू आहे, ही सवलत आता १२ वी पर्यंतच्या विद्यार्थीनींकरिता राबविण्यास मान्यता देण्यात आली आहे. ही सवलत १०० टक्के इतकी आहे. या योजनेत १० वी पर्यंत १९.५४ लाख विद्यार्थीनी तसेच १२ वी पर्यंत २४ लाख विद्यार्थीनी लाभ घेणार आहेत. यास्तव वाढीव आर्थिक भार ४४ कोटी इतका असणार आहे.

२. विद्यार्थी (तंत्र व व्यावसायिक शिक्षण) मासिक पास :
१९८६ नंतर सुरु झालेले विविध तंत्र व व्यावसायिक शैक्षणिक अभ्यासक्रमांचा सवलत योजनेत समावेश करण्यास मान्यता देण्यात आली. ही सवलत ६६.६७% असेल. सध्या या योजनेचे ४४ लाख विद्यार्थी लाभार्थी आहेत. या निर्णयामुळे ५० लाखापेक्षा जास्त लाभार्थी लाभ घेणार आहेत.

३. ६५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना देण्यात येणारी सवलत :
ही सवलत सध्या सर्वसाधारण व निम-आराम बसेसमध्ये ५०% सवलत लागू आहे. आता वातानुकुलित शिवशाही (आसनव्यवस्था) बसमध्येही ४५% सवलत लागू करण्यात येत आहे. प्रतिवर्षी कमाल ४००० कि.मी. अंतराची मर्यादा लागू केली असून वयाचा पुरावा म्हणून आधारकार्ड ग्राह्य धरले जाणार आहे. या योजनेचे सध्या ७० लाख लाभार्थी आहेत.

४. क्षयरोगग्रस्त व कर्करोगग्रस्त व्यक्तींना देण्‍यात येणारी सवलत :
वैद्यकीय प्रमाणपत्राच्या आधारे सर्वसाधारण बसने राज्यांतर्गत अमर्याद अंतरापर्यंत प्रवास करण्यासाठी ५० % पर्यंत सवलत लागू होती, ती सवलत आता ७५% करण्यात येत आहे. या योजनेतून ८४ हजार रुग्णांना सवलत मिळत आहे.

५. अधिस्वीकृतीधारक पत्रकारांना प्रवास सवलत :
सध्या सर्वसाधारण व निमआराम बसमध्ये वर्षभर १०० टक्के प्रवास सवलत लागू आहे. आता वातानुकूलित शिवशाही (आसनी व शयनयान) बसेसमध्येही १०० टक्के सवलत लागू करण्यात येत आहे. या योजनेचे सध्या २८०० लाभार्थी आहेत.

६. सिकलसेलग्रस्त, हिमोफिलीया आणि एचआयव्ही बाधित रुग्ण यांना १००% प्रवास सवलत देण्यात येत आहे.

७.सध्या १००% अपंग व्यक्तीसोबत असलेल्या साथीदारास ५०% प्रवास सवलत आहे. आता रेल्वेप्रमाणे ६५% अपंगत्व व्यक्तीसोबत असलेल्या साथीदारासही ५०% सवलत मिळणार आहे. या योजनेचे सध्या ८० लाख लाभार्थी आहेत.

८.कौशल्य सेतू अभियान :
ही नवीन योजना लागू करण्यात येत असून, शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने माध्यमिक शालांत परीक्षा (इ. १० वी) मध्ये अनुत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सुरु केलेल्या कौशल्य सेतू अभियान योजनेमध्ये १११ प्रशिक्षण केंद्रात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना निवासस्थान ते प्रशिक्षण केंद्र या प्रवासासाठी ६६.६७% टक्के प्रवास सवलत लागू करण्यात येत आहे. या योजनेचे सध्या २५ हजार लाभार्थी आहेत. पुढे हे एक लाख लाभार्थी होणार आहेत.

लाभार्थ्यांना या प्रवास सवलत योजना लागू करताना आधारकार्ड संलग्न स्मार्टकार्ड देण्यात येणार आहे. तसेच, यापूर्वी लागू असलेल्या योजनांना आहे तीच सवलत पूर्वीप्रमाणे देण्यात येणार आहे, अशी माहिती मंत्री श्री. रावते यांनी दिली. वरील नमूद योजनेचे एकूण लाभार्थी सुमारे २ कोटी १८ लाख लाभार्थी या विविध योजनांचे लाभ घेणार आहेत. महाराष्ट्र राज्य परिवहन (एसटी) महामंडळाबाबत अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले आहेत. सुविधांनी सुसज्ज शिवशाही, परिवर्तन बसेस, स्लीपर शिवशाही आणि लालपरीचे लाँचिंग, स्वच्छतेसाठी एकात्मिक सुविधा व्यवस्थापन योजना, जुन्या बसस्थानकांचे नुतनीकरण, दर्जावाढ, बसस्थानकावर मिनी थिएटर उभारण्याचा निर्णय, मराठी चित्रपटांचे प्रसारण, अत्याधुनिक १५ बसपोर्ट, पनवेल बसपोर्टचे भूमिपुजन, कॉलसेंटरची सुविधा, एसटी कर्मचाऱ्यांसाठी बाळासाहेब ठाकरे कन्यादान योजना, हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे अपघात सहाय्यता निधी योजना, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे शहीद सन्मान योजना, शहिदांच्या पत्नींना एसटीमध्ये आजीवन मोफत प्रवास, बिरसा मुंडा पुनर्वसन प्रकल्प, आत्मसमर्पित नक्षलवादी तरुणांना एसटीत नोकरी देण्यात येणार आहे, आदिवासी युवतींना एसटी चालक पदासाठी प्रशिक्षण व नियुक्ती देण्याची योजना आहे.

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची वाहतूक विषयक सांख्यिकीची माहिती पुढीलप्रमाणे आहे. राज्यात मंडळाकडे एकूण ताब्यातील वाहने १८५६९ आहेत, मार्गस्थ बसगाड्यांची प्रतिदिन सरासरी संख्या १६४४७ आहे, एकूण कर्मचारी (३१ मार्च रोजी) १०१३७३ एवढे आहेत, प्रतिदिन सरासरी सार्थ किमी (लाख) ५५.८२, वाहतूक केलेल्या प्रवाशांची प्रतिदिन सरासरी संख्या (लाख) ६६.३१ आहे, वाहन उत्पादकता (किमी) ३००.५९, प्रति दहा लीटर डिझेल मागे किमीचे प्रमाण (मानक ४८.५०) ४७.२८, चालक-वाहक उत्पादकता (किमी) २१६.३०, प्रति वाहन कर्मचाऱ्यांचे प्रमाण (मार्गस्थ वाहनांच्या आधारे) ६.१८, सरासरी आसन क्षमता ४३.४०, भारमान (सवलतीच्या रकमेशिवाय) टक्के ५६.३७, भारमान (सवलतीच्या रकमेसह) ७०.६२ आहे. अर्थात ही आकडेवारी सन २०१७-१८ या वर्षातील आहे.

सर्वसामान्यांची जीवन वाहिनी म्हणून एसटी ओळखली जाते. सुरक्षित व वक्तशीर धावणाऱ्या एसटीचा प्रवास आजही लोक करतात. एसटी ही सर्वसामान्यांच्या हक्काचे दळण-वळणाचे साधन आहे. एसटीने काळानुरुप सेवेत बदल केला आहे. साध्या गाड्या निमआराम बसगाड्यांसोबतच नव्या काळात आधुनिक सेवाही एसटीने सुरु केल्या आहेत. काही वर्षांपूर्वी दादर-पुणे मार्गावर अश्वमेध या नावाने वातानुकूलित बससेवा सुरु करून एसटीने आणखी एक पाऊल पुढे टाकले. शिवनेरी, अश्वमेध, शीतल आणि शिवशाही या चार प्रकारच्या वातानुकुलित आरामसेवा एसटी चालवित आहे. प्रामुख्याने महाराष्ट्रातील महानगरांदरम्यान या सेवा चालवल्या जातात.

एसटीची आगाऊ तिकीट विक्री सेवा एजंटमार्फत सुरु करण्यात आली आहे. त्यानंतर स्वत:च्या संकेतस्थळावरुन आगाऊ तिकीट विक्रीची सुविधा देऊन एसटीने एक पाऊल पुढे टाकले. मोबाईल ॲपही उपलब्ध करून देऊन त्याद्वारे आगाऊ आरक्षणाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. बस प्रवासादरम्यान प्रवाशांच्या मनोरंजनासाठी अनेक मार्गावर मोफत वायफाय सेवा उपलब्ध करून देण्यात आली असून त्याद्वारे मनोरंजनाचे निवडक कार्यक्रम पाहता येतात. गांव तेथे एसटी ऐवजी आता प्रवाशांसाठी एसटी असेच म्हणावे लागेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here