सातार्‍याच्या दोन्ही राजेंची अखेर ‘दिलजमाई’

0

मुंबई (प्रतिनिधी) :

सातार्‍यामध्ये आमदार शिवेंद्रराजे आणि खासदार उदयनराजे या दोन राजेंमधील वाद संपूर्ण महाराष्ट्राला माहित आहे. पण यांच्यातील वाद मिटवण्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना यश आले आहे. लोकसभा-विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोन्ही राजेंमध्ये दिलजमाई करण्यात पवारांना यश आले आहे. शनिवारी सकाळी आकरा वाजता शरद पवार यांनी तातडीची बैठक बोलवली होती. सातारा लोकसभेच्या जागेसाठी शरद पवार यांनी अखेर विद्यमान खासदार उदयनराजे भोसले यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले आहे.

पक्षातील विसंवाद दूर करण्यासाठी शुक्रवारीही शरद पवार यांच्या मुंबईतील निवासस्थानी राष्ट्रवादीमधील ज्येष्ठ नेत्यांची बैठक झाली. ही बैठक तब्बल चार तास सुरू होती. या बैठकीला शरद पवार यांच्यासह अजित पवार, दिलीप वळसे पाटील, खासदार उदयनराजे, आमदार शिवेंद्रराजे, गणेश नाईक, सुनील तटकरे, जितेंद्र आव्हाड, छगन भुजबळ यासारखे राष्ट्रवादीचे दिग्गज नेते उपस्थित होते. या बैठकीत उदयनराजे आणि शिवेंद्रराजे यांचं मनोमीलन करण्यात पवारांना यश आलं. एकदिलाने निवडणूक लढण्यास उदयनराजे आणि शिवेंद्रराजे तयार झाल्याची माहिती आहे.

गेल्या काही दिवसांपूर्वी उदयनराजेबरोबरील वाद मिटण्याचे संकेत खुद्द शिवेंद्रराजे भोसले यांनी दिले होते. मला फक्त आमदारकीत रस आहे. त्यामुळे मी विधानसभेची तयारी करत आहे, असं शिवेंद्रराजे म्हणाले होते. आमची दोन घराणी नाहीत, छत्रपतींचं घराणं एकच आहे, असं म्हणत त्यांनी खासदार उदयनराजे भोसले यांच्यासोबतचा वाद मिटवण्याचे संकेत गेल्या काही दिवसांपूर्वी दिले होते. त्याचप्रमाणे गेल्या महिन्यात दोन्ही शिवेंद्रराजे आणि उदयनराजे यांनी एकाच गाडीत प्रवास केला होता. तेव्हा त्यांच्यातील वाद मिटल्याची चर्चा साताऱ्यात होती.

उदयनराजे आणि शिवेंद्रराजे यांच्यात अनेकदा टोकाचे मतभेद झाल्याचं सातारकरांनी अनेकदा पाहिलं. अनेकदा दोघांनी एकमेकांची उणीधुणीही काढली. त्यानंतर दोघांमध्ये मनोमिलन करण्याचे अनके प्रयत्न झाले. मात्र आज दोन्ही राजेंना शरद पवारांनी एकत्र आणले. यावेळी हा प्रयोग यशस्वी होईल का हे पाहावं लागणार आहे. नेत्यांच्या प्रेमापोटी एकमेकांपासून दुभंगलेल्या कार्यकर्त्यांच्या मनाचं काय? हा प्रश्न अनुत्तरित आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here