नैसर्गिक प्रसूतीसाठी महिलांचं प्रबोधन करणाऱ्या संगीता उघाडे

0

स्त्री आयुष्यातला महत्वाचा क्षण म्हणजे आई होण्याचा. भावी पिढीला जन्म देऊन तिचं संगोपन करण्याच्या मोठ्या दायित्वासाठी स्त्रीला निसर्गानं शक्ती आणि बळ दिलेलं आहे. स्त्रीत्वाच्या पूर्णत्वाच्या टप्प्यावरील महत्वाचा टप्पा म्हणजे आई होणं. आज प्रगत तंत्रज्ञान आणि वैज्ञानिक प्रगतीने सर्व जीवन सुसह्य तर बनले आहेच, पण आज विविध प्रकारच्या गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया देखील तंत्रज्ञानाच्या आधारे सुसह्य झाल्या आहेत.

नुकतेच केंद्र सरकारच्या महिला आणि बालकल्याण विभागाने प्रत्येक स्त्री रुग्णालयाचा नैसर्गिक प्रसुती आणि शस्त्रक्रियेद्वारे करण्यात आलेल्या प्रसूती संख्या अहवाल मागवला आहे. यावरून कृत्रीम प्रसूती ही नक्कीच स्त्री आरोग्याच्या दृष्टीकोनातून गंभीर बाब आहे. शहरात आरोग्याच्या सुविधा मोठ्या प्रमाणात उपलब्ध असतात. पण ग्रामीण भागात शासनाच्या आरोग्य विभागाच्या प्राथमिक आरोग्य केंद्रातून गरजू रुग्णांना शासनामार्फत वैद्यकीय उपचार आणि मदत मोठ्या प्रमाणात होत असते. याच अनुषंगाने वेगळ्या विषयावर स्त्रीयांची प्रसूतीवेदनेतून मुक्ती करणाऱ्या व सर्वांच्या चेहऱ्यावर हास्य आनंद फुलवणाऱ्या आरोग्य सेविका संगीता उघाडे यांच्या कार्याविषयी जाणून घेणार आहोत. त्या सध्या हासेगाव प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र सारोळा ता. औसा जि. लातूर येथे आरोग्य सेविका म्हणून काम करतात.

जवळपास आरोग्य क्षेत्रात सर्वार्थाने सेवाभावाने झोकून देऊन काम करणाऱ्या संगीता उघाडे एक बोलकं व्यक्तीमत्व. 35 वर्षापासून महिलांच्या आरोग्याची काळजी त्या घेत आहेत. 1982 मध्ये त्या आरोग्य सेविका म्हणून लातूर जिल्ह्यातील औराद शहाजनी या ठिकाणी रुजू झाल्या. आजपर्यंत जवळपास सहा हजार नैसर्गिक प्रसूती करण्याचे काम त्यांनी केले आहे. त्यांच्या या कार्याविषयी त्यांना राज्य शासनाच्या आनंदीबाई जोशी पुरस्काराने गौरवण्यात आलं आहे. त्याचप्रमाणे जिल्हा परिषदेचे विविध पुरस्कार आणि स्थानिक पुरस्कारांनीही त्यांना गौरविण्यात आलं आहे. त्यांच्या जीवन कार्याविषयी सांगायचं म्हटलं तर त्या वयाच्या 20 व्या वर्षापासून आरोग्य सेविका म्हणून काम करीत आहेत. लातूर जिल्ह्यातील विविध प्राथमिक आरोग्य केंद्रात त्यांनी काम केलं.

स्त्रीयांच्या नैसर्गिक प्रसूती विषयीचं वैज्ञानिक कारण सांगताना त्या म्हणतात, स्त्रीची शरीररचना आणि क्षमतेमुळे नैसर्गिक प्रसूतीचे 99 टक्के पर्यंत प्रमाण आहे. पण काही शारीरिक व्याधी असतील तर एक टक्का प्रसूती फक्त शस्त्रक्रियाद्वारे करावी लागते. पण समाजातील प्रसूती विषयीचा हा गैरसमज दूर करण्यासाठी डॉक्टर आणि इतर कर्मचाऱ्यांनी प्रामाणिक प्रयत्न करणं आवश्यक आहे. शासकीय रुग्णालयात हे केलं जातं ही अभिमानाची बाब त्या सांगतात. आरोग्य विभागाने आपलं मानून जर सेवा केली तर समाजातील महिला, नागरिक यांच्याशी आपुलकीचं, विश्वासाचं नातं निर्माण होतं. त्यांच्या अनुभवाविषयी त्या सांगतात की माहूर येथील दाम्पत्य अमरजा ढोक तुंगीच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात आले होते. त्या महिलेला खाजगी रुग्णालयात सिझेरियनद्वारे प्रसूती करावी लागेल आणि जुळी मुलं गर्भात असल्याकारणाने हे करणं आवश्यकच असल्याचं सांगण्यात आलं. पण प्रसूतीसाठी जेव्हा अमरजा संगीता उघाडे काम करीत असलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल झाल्या तेव्हा प्राथमिक तपासण्या करुन प्रसूती तीही नैसर्गिक पद्धतीने यशस्वी केली. तसेच जन्मलेले दोन्ही बाळ हे तीन-तीन किलो वजनाचे होते. हा अनुभव त्या स्वत:ही नाही विसरत आणि ते पती-पत्नी अजूनही संगीताताईचे आभार मानतात आणि इतरांना सांगतात की शासकीय रुग्णालयात आपलेपणाची वागणूक मिळते. हे सर्व सांगतांना त्यांच्या चेहऱ्यावर आत्मिक समाधान तर दिसतेच, पण जवळपास हजारो स्त्रीयांची दु:खातून मुक्ती आणि स्त्री परिपूर्णतेचा आनंद दिल्याचं समाधान वाटतं असं सांगतात.

समाजात शासकीय रुग्णालयांच्या सोयीसुविधा व इतर वागणुकीविषयी जे गैरसमज आहेत ते नागरिकांनी काढून टाकावेत व या आरोग्याच्या सुविधाचा लाभ घ्यावा. काही तांत्रिक अडचणी असतात. त्यावेळी समाजानेही सहकार्याच्या भावनेत साथ द्यायला हवी अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. ग्रामीण भागातील महिलांनी स्वत: आरोग्याची काळजी घ्यावी, बालकांचे लसीकरण देखील वेळच्या वेळी करून घेणं आवश्यक आहे. आहारासंदर्भात आणि स्वच्छतेच्या सवयी विषयी कुटुंबातील स्त्रियांप्रमाणेच पुरूषांनीही अधिक लक्ष देणं आवश्यक आहे. महिलांनी स्वत:च आरोग्य व्यवस्थित ठेवलं तर कुटुंबाचं आरोग्य सदृढ ठेवू शकतात. आज शस्त्रक्रियेद्वारे अनाठायी प्रसूती करण्याचे निर्माण झालेले प्रमाण कमी व्हायला हवे यासाठी समाजामध्ये मानसिकतेत बदल व्हायला हवा आणि शासकीय रुग्णालयाच्या सेवेप्रती विश्वास दृढ व्हायला हवा. यामधून खऱ्या अर्थाने महिलेचं आरोग्य जपलं जाईल, असा विश्वास संगीता उघाडे व्यक्त करतात.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here