रेल्वे रुळासारखे आम्ही जंक्शनला एकत्र येऊ : शिवसेना सहसंपर्क प्रमुख प्रा. संजय मंडलिक

0

वार्ताहर सिध्दनेर्ली :
समरजितसिंह घाटगे व माझे काम रेल्वे रुळाप्रमाणे आहे. रेल्वे रूळ जंक्शनला एकत्र येतात त्याप्रमाणे आम्ही एकत्र येऊ. शिवसेना व भाजप युती अखेरच्या टप्प्यात होईल यात शंका नाही. जनभावना आम्ही एकत्र यावे अशी आहे. ती जपण्याचे काम केले जाईल. असे प्रतिपादन शिवसेना सहसंपर्क प्रमुख प्रा. संजय मंडलिक यांनी केले. ते सिध्दनेर्ली (ता. कागल) येथे विविध विकासकामांच्या उदघाटनप्रसंगी अध्यक्षस्थानावरून बोलत होते.
मंडलिक म्हणाले, स्व. विक्रमसिंह घाटगे यांनी मला विधानसभेसाठी पाठिंबा दिला होता. त्याची या विधानसभेसाठी आपल्याला व्याजासह परतफेड करू. समरजीत घाटगे यांनी लोकोपयोगी उपक्रम सुरु ठेवून कामाचा धडाका लावला आहे. खासदार यांचा निधी गेला कुठे ही शोधण्याची वेळ आली आहे.
म्हाडा पुणेचे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे म्हणाले, स्वर्गीय राजे व मंडलिक यांनी संघर्ष प्रामाणिकपणे केला. पण कधीही पाटीवर वार केले नाहीत. युती होईल. पक्षाच्या निर्णयाप्रमाणे आपण प्रामाणिकपणे काम करू व समाजकारणासाठी एकत्र येऊ. काहीजण गैरसमज पसरविण्यात पटाईत आहेत. त्यामुळे सावध राहून एकत्र येऊन काम केले पाहिजे. स्व. मंडलिक साहेबांचे स्वप्न येत्या ऑक्टोबरमध्ये आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने पूर्ण करू.
आमदार प्रकाश आबिटकर म्हणाले, कागल ही राजकारणाचे विद्यापीठ आहे. आपल्याकडे बघूनच आम्ही राजकारण करतो. लोकसभेला मांडलिकांशिवाय पर्याय नाही. समरजितसिंह घाटगे यांचे काम मोठे आहे. त्यांची धडपड वाखाणण्यासारखी आहे. यावेळी विविध विकासकामांचे उदघाटन करण्यात आले. यावेळी सरपंच सुरेख पाटील शाहू कारखान्याचे उपाध्यक्ष अमरसिंह घोरपडे, राजे बँकेचे अध्यक्ष एम. पी. पाटील, पं. स. चे सदस्या पूनम मगदूम, गणपती पाटील, वाय. व्ही. पाटील.निता पाटील, पुष्पाताई मगदूम, उपसरपंच कबीर कांबळे उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here