समरजितराजे यांची भाजप उमेदवारी; संजयबाबा यांची भूमिका याबाबत अद्याप संभ्रम. कागलमध्ये राजकीय चर्चा शिगेस

0

(समीर कटके)मुरगुड : मुरगुड येथील शेतकरी मेळाव्यातील समरजितसिंह घाटगे यांची देहबोली बरेच काही व्यक्त करून गेली. भाजप कडून आपली उमेदवारी निश्चित असून 2019 ची लढत राष्ट्रवादीच्या आम.हसन मुश्रीफ यांच्याशी होणार याची शाश्वती त्यांच्या देहबोलीत दिसत होती. सेना-भाजप आघाडी होणार आणि विधानसभा निवडणुकीत आपल्यास शिवसेनेचे संपर्क प्रमुख संजय मंडलीक यांचा पाठिंबा घ्यावा लागणार त्यासाठी आवश्यक रणनीतीची झलक या मेळाव्यात दिसली. पण त्यांचा हा आत्मविश्वास ‘अजाण’ की खरोखरच त्यांना भाजप पक्षश्रेष्ठीनीं कामाला लागण्याचे आदेश दिले आहेत हे अजून गुलदस्त्यात आहे. हाच विषय राजकीय वर्तुळात चर्चेचा आहे. पण आपल्या वेलप्लॅंड सभा आणि मीडिया कव्हरेज मधून समरजितसिंह यांनी आपण भाजपकडून तिकीट मिळवण्याच्या रेस मध्ये आघाडीवर असल्याचे ठसवले आहे.
सेना-भाजपा युती संदर्भात अनेक मते मतांतरे आहेत. राज्य पातळीवरील इलेक्टॉनिक मीडियाचे निवडणूकपूर्व सर्वेक्षण दोन्ही पक्षांची आघाडी न झाल्यास दोघांनाही खूप मोठा फटका बसेल असे निष्कर्ष देत आहेत. संभाव्य धोका ओळखून गेल्या साडेचार वर्षात युती मध्ये निर्माण झालेले कलुषित ढग दूर करण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. उद्धव ठाकरे यांचा अयोध्या दौरा व राम मंदिर उभारणी प्रश्न तापवले जात आहे. त्यातून राज्यातील सेना भाजपच्या युतीसाठी पूरक वातावरण तयार केले जाईल आणि ‘हिंदुत्ववादी मतांची विभागणी टाळणे’ हे कारण पुढे करून दोन्ही पक्षांचे मनोमिलन घडवून आणले जाईल अशी चर्चा मीडिया व राजकीय वर्तुळात आहे. राज्य पातळीवर या घडामोडी सुरु असतानाच समरजितसिंह यांचे राजकीय गुरु चंद्रकांतदादा यांनीही युतीसाठी ‘हात जोडून विनंती’ करण्याची भूमिका घेतली आहे. त्याच बरोबर समरजितसिंह यांच्या भाजप मधून उमेदवारीचे सूतोवाचही केले आहे. त्यांचे अशी वक्तव्ये ‘स्लिप ऑफ टंग’ की या बाबत काही ‘रणनिती’ ठरवली आहे यावर चर्चा रंगली आहे. त्यामुळे नाही म्हटले तरी संशयाचे ढग अधिक गडद झाले आहेत.

काय असेल ही संभाव्य रणनिती ?…….
* कागल मतदार संघ भाजप स्वतःकडे राखून आपल्या कोट्यातील अन्य जागा शिवसेनेस देईल.
* महाडिक लॉबी, चंद्रकांतदादा व भाजप श्रेष्ठी संजयबाबा घाटगे यांचे मन वळणार त्यासाठी साखर कारखाना उभारणी साठी ताकद पुरवणार.
* संजयबाबा गटासाठी गोकुळच्या अध्यक्षपदाची ऑफर दिली जाईल.

*संजयबाबांची अपक्ष उमेदवारी झालीच तर राजेघाटगे गटाची पारंपरिक मते, आजरा-गडहिंग्लज मधील राष्ट्रवादीवर नाराज गट, अशोक चराटी, मुरगुड मधील रणजितसिंह पाटील, बिद्रीचे संचालक बाबासाहेब पाटील व प्रामुख्याने सेनेकडून लोकसभा निवडणुकीच्या तयारीत असणारे प्रा.संजय मंडलिक यांच्या रसदीने विधानसभेची निवडणूक लढवण्याची तयारी समरजितराजे यांनी चालवली आहे हे स्पष्ट आहे.
मुरगुडच्या मेळाव्यात व्यासपीठावर कै.राजे विक्रमसिंह घाटगे, खा. सदाशिवराव मंडलिक आणि विश्वनाथराव पाटील यांच्या प्रतिमांचे पूजन. स्व. खास. मंडलिक आणि प्रा.संजय मंडलिक यांच्या बद्दल समरजितसिंहांची
स्तुती सुमने. मंडलिक-मुश्रीफ संघर्षातील कटू आठवणींना जाणीवपूर्वक दिलेला उजाळा. या बाबी मुश्रीफ यांच्या विरोधात मंडलिक गटाची सहानुभूती मिळवून स्वतःची ‘स्पेस’ तयार करण्यासाठी होता अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे. गट-तट पक्ष विसरून आपणास मते द्या असे आवाहन त्यांनी केले. कागल तालुक्यात गटातटाच्या राजकारणात केवळ राष्ट्रीय पक्ष, पंतप्रधान, मुख्यमंत्री, पालकमंत्री यांची बॅनर चालणार नाहीत तुमच्या गटाची मते किती असाही प्रश्न त्यांचे विरोधक करताना दिसतात. याचीही जाणीव त्यांना असल्याचे त्यांच्या भाषणातून प्रकर्षाने जाणवले यावेळी त्यांनी पालिका आणि जि.प., पंचायत समिती निवडणुकीत आपल्या उमेदवारांना पडलेल्या मतांचा लेखाजोखाही मांडला. व्यासपीठावर कोठेही माजी आमदार संजय घाटगे यांचा उल्लेख झाला नाही. मुश्रीफ यांना दूर करून त्यांना सत्तेपासून वंचित करण्यासाठी सर्व राजकीय गट एकत्र आणण्याचा समरजीतसिंह यांचा इरादा आहे. तो त्यांनी पालिका निवडणुकीपासून आजपर्यंत कधी ‘परिवर्तनाची लढाई’ तर कधी ‘तालुक्यातील आमदारकीची आरक्षण बदला’ अशा घोषणातून व्यक्त केला आहे. आपले राजकीय हितासाठी नेहमी अष्टवधानी असणारे कागलच्या राजकीय पटावरील मुरब्बी खेळाडू या भावनिक लढाईत सहभागी होणार का आणि कोणत्या अटीवर हे पाहणे रोचक ठरणार आहे. आगामी काळातील तालुक्यातील राजकीय घडामोडी अनुभवण्यास राजकीयदृष्ट्या सुज्ञ जनताही सरसावली आहे. काही दिवसांपूर्वी गोरंबे येथील कार्यक्रमात मुश्रीफ यांनी संजयबाबा यांच्या उपस्थितीत ‘आम्ही दोघे विरोधक असलो तरी कोणत्या वळणावर एकत्र येऊ हे सांगता येत नाही’ असे वक्तव्य करून धमाल उडवली होती ही घटनाही या संदर्भात लक्षवेधी आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here