कोण टोळीवाले …? ….कोणाचा बंदोबस्त करणार ?महायुतीच्या कोल्हापूर सभेत शेतकरी नेते सदाभाऊ खोत यांचा घणाघात

0

BY Newstale
Correspondent
Murgud 25 March 2019

महायुतीच्या कोल्हापूर सभेत शेतकरी नेते सदाभाऊ खोत यांचा घणाघात

खासदार राजू शेट्टी यांचे नाव न घेता केली टिका :हातकणंगले मतदार संघात सदभाऊंची ताकद लागणार पणाला…

तुम्ही टोळीवाले आहात… तुमचा बंदोबस्त शेतकरी करेल…

तुम्हीच म्हणत होता काँगेस राष्ट्रवादीवाले शेतकऱ्यांना लुटणारे टोळीवाले आहेत.मग आता काय झाले.तुम्ही त्या टोळी मध्ये सामील झाला असला तर तुम्हीही टोळीवाले आहात.तर शेतकरी तुमचाही बंदोबस्त या निवडणुकीमध्ये केल्याशिवाय राहणार नाही.निकराची लढाई केल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही असे आव्हान शेतकरी नेते सदाभाऊ खोत यांनी खासदार राजू शेट्टी यांना नामोल्लेख न करता दिले.

कोल्हापूर येथे तपोवन मैदानावर आयोजित शिवसेना-भाजप-रिपाई-
राष्ट्रीय समाज पक्ष-जनसुराज्य यांच्या महायुतीच्या प्रचार शुभारंभ सोहळ्यात ते बोलत होते.

सदाभाऊ खोत म्हणाले,’साखरेची आधारभूत किंमत साठ वर्षे ठरली नव्हती ती या सरकारने 29 रुपयावरून एक 31 रुपयावरती आणली.शेतकऱ्याच्या दुधाला लीटरला पाच रुपये अनुदान दिले.तुम्हीच म्हणत होता हे साखर कारखानदार काटा मारतात.आता तुम्ही कुठे गेला.काटा मारणाऱ्यांच्या मांडीला मांडी लावून बसला असाल तर इथली जनता तुमचा काटा काढल्याशिवाय राहणार नाही.गेली 30 वर्षे आम्ही त्यांच्या विरोधात लढलो.मावळमध्ये पाणी मागायला आलेल्या शेतकऱ्याला गोळ्या घातल्या,उसाचा भाव मागायला आलेल्या शेतकऱ्याला गोळ्या घातल्या,ज्यांचे हात शेतकऱ्याच्या रक्ताने माखलेल्या आहेत त्यांच्या हातात हात घालून तुम्ही जर परिवर्तनाची भाषा बोलत असाल तर हा कोल्हापूर जिल्हा आहे,इथला प्रत्येक युवक लाल मातीतील पैलवान आहे.कधी ढाक मारायची आणि ढाकंवर कसं घ्यायचं इथल्या युवकाला समजते.तुम्हाला ढाके वर घेतल्याशिवाय स्वस्थ बसणार नाहीत.जे शेतकरी नेते काँग्रेस-राष्ट्रवादीबरोबर गेले तेच म्हणायचे त्यांचेच वाक्य आहे “गली गली मे शोर है साखर सम्राट चोर है”आता तुम्ही कोण आहे ? असा सवालही त्यांनी केला.तुम्ही लोकांना सांगितलं तुम्ही देवाच्या आळंदीला निघालाय पण तुम्ही आता चोराच्या आळंदीला पोहोचला आहात.हे आता महाराष्ट्राच्या जनतेने ओळखले आहे.म्हणून मी हात जोडून शेतकऱ्यांना विनंती करणार आहे आता भूलथापांना बळी पडू नका.या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना सन्मान देण्याचे काम या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांनी केले आहे म्हणून पहिल्यांदा याठिकाणी प्रधानमंत्री किसान सन्मान योजना या देशांमध्ये सुरू केली. शेतकऱ्याच्या खात्यावर पैसे जमा करण्याचा ऐतिहासिक निर्णय नरेंद्र मोदींच्या केंद्र सरकारने घेतला. खोत म्हणाले” मी शेतकऱ्यांना युवकांना आवाहन करतो.आपण ठरवूया.आमचे उमेदवार मोदी आहेत.आमचे उमेदवार देवेंद्र फडणवीस आहेत.आमचे उमेदवार उद्धव ठाकरे आहेत.ही भावना मनात ठेवून तन-मन-धन विसरून घरच्या भाकरी बांधून कामाला लागूया.मला खात्री आहे जमलेल्या प्रत्येकाच्या अंगावर गुलाल असेल आणि हा गुलाल दिल्लीच्या तख्तावर भगवा झेंडा फडकवेल”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here