अंनिसच्या आवाहनास इंगोलेवस्ती शाळेचा प्रतिसाद

0

विद्यार्थ्यांनी फटाक्यांच्या पैशांची बचत करून शाळेस दिली पुस्तके भेट

महेश गोडगे

शाळांना दिवाळीच्या सुट्टया लागण्यापूर्वी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती शाखा मोहोळ मार्फत सचिव संजय भोसले यांनी इंगोलेवस्ती शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना फटाके विरोधी अभियानासाठी संकल्प पत्रे दिली होती. त्या पत्रकात फटाक्यांचे दुष्परिणाम, त्यातील विषारी घटक, अपघात, प्रदूषण, पर्यावरणाची हानी याबद्दल माहिती दिलेली होती. येथील विद्यार्थ्यांनी पत्रकाचे वाचन करून कमीत कमी फटाके उडवण्याचे मान्य केले व मोठ्या आवाजाचे फटाके न खरेदी करण्याचा संकल्प केला. प्रकाशाचे फटाके फार कमी प्रमाणात घेऊन राहिलेल्या पैशातून शाळेच्या बालवाचनालयासाठी गोष्टींची पुस्तके भेट देण्याचा निश्चय केला होता.बालचमूने केलेल्या या निश्चयानुसार दिवाळी सुट्टीनंतर जमलेल्या सुमारे एक हजार दोनशे रुपयातून छोटी मनोरंजक गोष्टींची १२० पुस्तके खरेदी करण्यात आली आहेत. या उपक्रमामुळे यंदा फटाक्यांमुळे कोणतीही दुर्घटना घडली नाही आणि सर्व विद्यार्थ्यांच्या सहभागातून शाळेतील वाचनालयात सध्या मुबलक पुस्तके उपलब्ध झाली आहेत. वाचनाचा छंद जोपासण्यासाठी हा उपक्रम यशस्वी ठरला असल्याचे मुख्याध्यापक आबासाहेब टेकळे यांनी सांगितले. तर, बालगोपालांनी जमा केलेल्या रकमेतून शिक्षक रवी चव्हाण आणि शशिकांत कुंभार यांनी पुस्तकांची खरेदी केली.अंनिसच्या या उपक्रमाला प्रतिसाद दिल्याबद्दल शाळेतील विदयार्थी आणि शिक्षकांचे अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे सोलापूर जिल्हा कार्याध्यक्ष सुधाकर काशीद,मोहोळ तालुका अध्यक्ष व्ही.के.पाटील, मोहोळ तालुका कार्याध्यक्ष धर्मराज चवरे, गटशिक्षणाधिकारी मारुती फडके, शिक्षण विस्ताराधिकारी विकास यादव, केंद्रप्रमुख सौदागर चव्हाण आदींनी अभिनंदन केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here