लक्षात ठेवा, सत्ता कुणाची गुलाम नसते – भाजपाचे जेष्ठ नेते

0

– सुरेश ठमके – 

ब-याच कालावधीनंतर भाजपाची केंद्रात आणि राज्यात सत्ता आली आहे. ही सत्ता कशाच्या जोरावर आली आहे तर राज्यातील जनतेने दाखविलेल्या विश्वासावर. मात्र, तुम्ही जर तीन वर्षातच उतणार मातणार असाल तर ही जनता तुम्हाला फेकल्याशिवाय रहाणार नाही. कायद्याच्या आणि बळाचा वापर करून विरोधकांना संपवायचे, प्रसारमाध्यमांची मुस्कटदाबी करायची असे वर्तन जर चालू रहाणार असेल तर लक्षात ठेवा, सत्ता कुणाची गुलाम नसते, असे भाजपाच्या एक ज्येष्ठ नेत्याने खडसावून सांगितले.

सत्तेत आल्यानंतर सत्ताधा-यांचे वर्तन हे लोकाभिमुख असले पाहिजे. जनता ही कोणत्याही सरकारच्या आणि सत्ताधा-यांच्या विरोधात असते. मात्र, जनतेचा रोष कमी करत जर योग्य आणि जनकल्याणाचे निर्णय होत असतील तर जनताही मोठ्या मनाने सरकारच्या पाठीशी उभी रहाते. याचा विचार सत्ताधा-यांनी केला पाहिजे तरच ते टिकतील, असे मत या जेष्ठ पण सत्तेपासून दुरावलेल्या नेत्याने व्यक्त केले आहेत.

यावेळी बोलताना त्यांनी इंदिरा गांधीच्या काळाचे अनेक दाखले दिले. इंदिरा गांधी सत्तेत असताना त्यांनी अनेक लोकहिताचे निर्णय घेतले आणि ते जनतेच्या गळ्यातील ताईत बनल्या.बॅकांच्या राष्ट्रीयीकरणाचा निर्णय, गरीबी हटावचा नारा तसेच पोखऱणची अणुचाचणी या सर्व बाबींनी त्यांना लोकसभेत पाशवी बहुमत मिळाले मात्र, पाशवी बहुमत मिळाले की तुमच्या डोक्यात हळूहळू हवा जाते. तुमची वाटचाल नकळत हुकूमशाहीकडे होते. त्यांनी आपल्या विरोधात बोलणा-या लोकांच्या मागे सीबीआय लावणे, ईडी लावणे, विरोधकांना बदनाम करायचे, असे उद्योग चालू केले होते.. त्यातच अलाहाबाद न्यायालयाचा निर्णय त्यांच्या विरोधात गेला, त्यांची खासदारकी रद्द ठरवण्यात आली. मात्र,त्यांनी तो निर्णय मान्य न करता, राजीनामा न देता आपली हुकूमशाही चालुच ठेवून आणिबाणी जाहीर केली. त्यामुळे नंतरच्या निवडणूकीत जयप्रकाश नारायण, राममनोहर लोहिया यांना प्रचंड यश मिळाले. देशात कॉंग्रेसचा प्रचंड धुव्वा उडाला हा इतिहास आहे आणि इतिहासाची पुनरावृत्ती होत असते असा इशाराही द्यायला ते विसरत नाहीत.

    सध्या आमच्या पक्षातही फक्त मन की बात चालू असते, एकदाच आकाशवाणी होते लाखो, करोडो लोक ती ऐकतात. पण ती एकतर्फीच असते त्यामुळे तुमच्या बोलण्याला, मताला तशी काहीच किंमत नसते. सध्या आपल्या पक्षातही विरोधकांना नामोहरम करण्यासाठी हेच हातखंडे वापरले जाताहेत. कुणाला धमकावून तर कुणाला बदनाम करून सत्तेचा खेळ खेळला जातो आहे. मात्र, हे फार काळ टिकत नाही. तीन वर्षातच ही हुकूमशाहीकडे जाणारी वाटचाल थांबली नाही, तर सत्ता जायलाही वेळ लागणार नाही, कारण सत्ता कुणाची गुलाम नसते त्यासाठी जरा इतिहासात डोकावून पहा म्हणजे डोके ठिकाणावर येईल, असा गर्भित इशाराही त्यांनी यावेळी खाजगीत बोलताना दिला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here