रामदास आठवले करणार सामाजिक सलोखा रॅलीचे नेतृत्व

रिपब्लिकन पक्षातर्फे मुंबईत दि 22 जानेवारीला सामाजिक सलोखा रॅली चे आयोजन

0

प्रतिनिधी : पुनम पोळ

मुंबई: भिमाकोरेगाव येथे आंबेडकरी जनतेवर झालेल्या हल्ल्यानंतर निर्माण झालेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात सामाजिक सलोखा राखण्यासाठी रिपब्लिकन पक्षातर्फे राज्यभर सामाजिक सलोखा रॅली आयोजित करण्यात येणार आहेत.  महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा सामाजिक समतेचा बंधुत्वाचा एकतेचा संदेश देणाऱ्या या मूक रॅली असेल. रिपाइंच्या सामाजिक सलोखा रॅलीचा प्रारंभ येत्या दि 22 जानेवारीला दुपारी 2 वाजता मुंबईत चैत्यभूमी येथे केंद्रिय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या नेतृत्वात होणार आहे.

अनेक ठिकाणी शंभरहून अधिक लोकांवर कलम 307 सारखे गुन्हे नोंदविणे अन्यायकारक आहेत .त्यामुळे बंद आंदोलनात चांगल्या पद्धतीने नियंत्रण मिळविणाऱ्या पोलिसांनी अटकेत असलेल्या आंदोलकांना मारहाण करीत असल्याच्या तक्रारी काही ठिकाणाहून येत आहेत. आंदोलकांवर अन्यायकारक कारवाई पोलिसांनी करु नये यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची रिपाइं तर्फे भेट घेण्यात येईल असेही यावेळी रामदास आठवले यांनी सांगितले.

भीमकोरेगाव येथे दगडफेकीत जखमी झालेल्यांना रिपाइं तर्फे तसेच शासनातर्फे मदत केली जाईल. राज्यात कार्यकर्त्यांवर झालेल्या गुन्हे नोंदीची माहिती घेऊन मुख्यमंत्र्यांची रिपाइं शिष्टमंडळातर्फे भेट घेणार असल्याचे ना रामदास आठवले म्हणाले.

औरंगाबाद मधील सभा उधळली नाही

औरंगाबाद येथे नामांतर वर्धापन दिनी झालेल्या आरपीआयच्या सभेत समतासैनिक दलाचे काही लोक ऐक्याच्या घोषणा देत आले. त्यांच्या दोघा प्रतिनिधींशी स्टेजवर आपण चर्चा केली . त्यांना आपली रिपब्लिकन ऐक्यासाठी सुरुवातीपासून तयारी आहे. आपली ऐक्यवादी भूमिका असल्याचे कळल्यानंतर ते सर्व निघून गेले व सभा शांततेत पार पडली. त्यामुळे सभा उधळली हा आरोप पूर्ण खोटा आणि चुकीचा आहे. असे स्पष्टीकरण ना रामदास आठवले यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here