महाराष्ट्र राज्यात ११ लाख तरुण मतदार पहिल्यांदाच करणार मतदान

0

मुंबई (प्रतिनिधी) :

आगामी लोकसभा निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाची मतदार यादी करण्याची तयारी अंतिम टप्प्यात पोहचली आहे. राज्यात एकूण ८ कोटी ७३ लाख मतदारांची नोंदणी करण्यात आली आहे. मतदार नोंदणीत महाराष्ट्रातील तरुणांचा पुढाकार उल्लेखनीय असून राज्यातील ११ लाख ९९ हजार ५२७ तरूण मतदार प्रथमच मतदानाचा हक्क बजावणार आहेत. त्यामुळे हे मतदार आपल्या पक्षाकडे आकर्षित करण्यासाठी राजकीय पक्ष सरसावले आहेत.

केंद्रीय निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या आकडेवरीत ही माहिती पुढे आली आहे. महाराष्ट्रासह देशात होऊ घातलेला लोकशाहीचा सर्वोच्च उत्सव १७ व्या लोकसभेच्या निवडणुकीत सहभागी होण्यासाठी महाराष्ट्रातील मतदार सज्ज झाले आहेत. महाराष्ट्रात मतदारांची एकूण संख्या ८ कोटी ७३ लाख २९ हजार ९१० आहे. राज्यात १८ ते १९ वर्ष वयोगटात अर्थात प्रथमच मतदार म्हणून नोंदणी करणाऱ्या तरूणांची संख्या ११ लाख ९९ हजार ५२७ आहे. हे तरुण प्रथमच लोकसभा निवडणुकीसाठी मतदानाचा हक्क बजावणार आहेत. देशात १८ ते १९ वर्ष वयोगटातील मतदारांची एकूण संख्या १ कोटी ५० लाख ६४ हजार ८२४ आहे.

मतदार नोंदणीत महिलांचीही आघाडी

मतदार नोंदणीमध्ये राज्यात महिला मतदारही आघाडीवर आहेत. राज्यातील पुरुष व महिला मतदारांचे प्रमाण एक हजार पुरुष नोंदणीकृत मतदारामागे नोंदणीकृत ९११ महिला मतदार असे आहे.

राज्यात एकूण ८ कोटी ७३ लाख २९ हजार ९१० नोंदणीकृत मतदार आहेत. यापैकी ४ कोटी ५५ लाख १ हजार ८७७ पुरुष तर ४ कोटी १६ लाख २५ हजार ९५० महिला मतदार आहेत. राज्यात २ हजार ८३ नोंदणीकृत तृतीयपंथी मतदार आहेत. एक हजार लोकसंख्येमागे मतदार नोंदणीचे प्रमाणही राज्यात उल्लेखनीय आहे. राज्यात एक हजार लोकसंख्येमागे ७१० नोंदणीकृत मतदार आहेत. तर राज्यात एकूण ४८ लोकसभा जागांसाठी चार टप्प्यात एकूण ९५ हजार ४७५ मतदान केंद्रावर मतदान घेण्यात येणार आहे.

देशात ८९ कोटी ८७ लाख मतदार

देशातील २९ राज्य आणि ७ केंद्रशासित प्रदेशांमध्ये आजमितीस एकूण ८९ कोटी ८७ लाख ६८ हजार ९७८ मतदार आहेत. यामध्ये ४६ कोटी ७० लाख ४ हजार ८६१ पुरुष मतदार आहेत तर ४३ कोटी १६ लाख ८९ हजार ७२५ महिला मतदार आहेत. देशभरात ३१ हजार २९२ तृतीयपंथी मतदार आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here