हिंदू सणांवर कोणाचाही दबाव खपवून घेणार नाही : आमदार राजेश क्षीरसागर

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मूर्ती वाहत्या पाण्यात विसर्जित करण्याकरिता हिंदुत्ववादी संघटना करणार प्रबोधन

0

गणेशोस्तव काळामध्ये पुरोगामी आणि पर्यावरणवादी संघटनान कडून घरगुती आणि मंडळाच्या गणेश मूर्ती दान करण्याकरिता दबाव आणला जातो याला प्रशासनाचीही तितकीच साथ असते, परंतु हिंदू धर्म पद्धती नुसार गणेश मूर्तींचे वाहत्या पाण्यात विसर्जन करणे अनिवार्य असून, चाली रितीरीवाजाने सुरु असलेली हि परंपरा बंद करण्याचा प्रयत्न काहींच्या कडून होत आहे. हिंदू सणांवरच हे निर्बंध का? असा सवाल उपस्थित करीत हिंदू सणांवर कोणाचाही दबाव खपवून घेणार नाही, असा इशारा आज आमदार राजेश क्षीरसागर यांनी दिला. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मूर्ती वाहत्या पाण्यात विसर्जित करण्याकरिता शहरातील सर्वच हिंदुत्ववादी संघटना एकत्रित आल्या असून, हिंदुत्ववादी संघटनान कडून मूर्ती दान करण्याऐवजी वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करण्याबाबत प्रबोधन करण्यात येणार आहे. याबाबत हिंदुहृद्य सम्राट मा.बाळासाहेब ठाकरे जेष्ठ नागरिक विरंगुळा केंद्र, टाउन हॉल बाग येथे समस्त हिंदुत्ववादी संघटनाची प्राथमिक बैठक आज पार पडली.

                यावेळी बोलताना आमदार राजेश क्षीरसागर यांनी, हिंदू धर्माप्रमाणे गणेश मूर्तीचे विसर्जन करणे वाहत्या पाण्यात करण्यात येते ही रितीरीवाजाने सुरु असणारी परंपरा प्रदुषणाच्या नावावर बंद करण्याचा घाट घालण्यात येत आहे. परंतु, नदी प्रदुषणाच्या इतर प्रमुख कारणांकडे  डोळेझाक करून हिंदू सणावर निर्बंध घालान्याकारीताच काहींच्या कडून हा नसता उद्योग चालला आहे. हिंदू सणांना टार्गेट करून प्रसिद्धी मिळविण्याचा हा केविलवाणा प्रयोग आहे. शहरातील हिंदुत्ववादी संघटना एकसंघ होऊन हिंदू सणांवरील दबाव मोडून काढतील. हिंदू धार्मिक सणांमध्ये हस्तक्षेप करण्याचा अधिकार कोणालाच नसून, कोणाची दादागिरी ही खपवून घेतली जाणार नाही, असा सज्जड इशाराही आमदार राजेश क्षीरसागर यांनी दिला.

                ते पुढे म्हणाले कि, गणेश मूर्ती मुळे प्रदूषण होण्याचे टक्का ०.९ इतका आहे, असे असताना ९९ टक्के प्रदूषण ज्या घटकांमुळे होते त्यावर आळा घालण्याऐवजी हिंदू सणांना टार्गेट केले जात आहे. दान केलेल्या गणेश मूर्तीची नंतर या नास्तिक लोकांकडून विटंबना केली जाते. दहा दिवस या गणेश मूर्तींची आम्ही भक्तिभावाने जपणूक केली असते आणि प्रदुषणाच्या नावावर गणेश मूर्तींची झालेली विटंबना पुढील काळात खपवून घेतली जाणार नाही. गणेश मूर्ती दान केल्यानंतर त्याच्या होणाऱ्या विटंबने बाबत विविध माध्यमातून नागरिकांचे प्रबोधन हिंदुत्ववादी संघटना करणार आहेत. मूर्ती दान करा असे आवाहन करणाऱ्यांना महापालिका प्रशासनाकडून मंडप आणि सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात. हिंदुत्ववादी संघटनांनीही मूर्तीचे वाहत्या पाण्यात विसर्जन करावे असे आवाहन करतात. त्यामुळे दिल्या जाणाऱ्या सुविधा मंडप, जागा आदी बाबी महानगरपालिकेने हिंदुत्ववादी संघटनानाही पुरविणे गरजेचे आहे. मूर्तीचे वाहत्या पाण्यात विसर्जन केल्याने कोणतेही प्रदूषण होत नाही, पण मूर्ती दान केल्यावर त्याची विटंबना होऊन समस्त हिंदू धर्मियांच्या भावना दुखावल्या जातात, हीच सत्यपरिस्थिती नागरिकांपर्यंत पोहचविणार आहोत, असेही आमदार राजेश क्षीरसागर म्हणाले.

 

                यावेळी बोलताना सनातन संस्थेचे मधुकर नाझरे यांनी, हिंदू सणांवर मे. न्यायालयाच्या आदेशानुसार निर्बंध आणायचे आणि बाकी निर्णयांना बगल देऊन मे. न्यायालयाचा अवमान करायचा, हि प्रशासनाची पद्धत चुकीची असून सर्वाना समान न्याय या भावनेने प्रशासनाने कृती करणे गरजेचे असल्याचे मत मांडले.

                यावेळी अखिल भारतीय हिंदू महासभेचे संजय कुलकर्णी यांनी, हिंदुत्ववादी संघटनांनी संघटीत शक्तीद्वारे हा डाव उधळून लावण्याचे आवाहन करीत. नागरिकांचे प्रबोधन करण्याकरिता आजपासूनच सुरवात करण्याचे आवाहन उपस्थिताना केले.

                यावेळी बोलताना संजय गांधी योजनेचे अध्यक्ष किशोर घाटगे यांनी, मूर्ती दान करावयास लावणारे जसे प्रदूषणाचा आव आणून जाहिरात बाजी करतात त्याच पद्धतीने आपल्या भावनाशी खेळ करून दान झालेल्या गणेश मूर्तींची विटंबना कशी केली जाते हे लोकांपुढे आणणे गरजेचे आहे. याकरिता हिंदुत्ववादी संघटनांही मूर्ती विसर्जन करण्याचे आवाहन करण्याची जाहिरात करतील, असे सांगितले.

                यानंतर शिवप्रतिष्ठानच्या सुरेश यादव यांनी, गेल्या वर्षी शिरोली गावात १०० टक्के मूर्ती विसर्जनाचा उपक्रम राबुवून एकही मूर्ती दान केली गेली नसल्याचे सांगत, सर्वांनी ठरविले तर कोल्हापूर शहरातही हा उपक्रम यशस्वी होण्यास वेळ लागणार नाही, असे सांगितले. या बैठकीचे आभारप्रदर्शन दीपक गौड यांनी केले.

                या बैठकीस जेष्ठ हिंदुत्ववादी बाबा वाघापुरकर, हिंदू एकता आंदोलनचे चंद्रकांत बराले, आण्णा पोतदार, शिवाजीराव ससे, हिंदू महासभेचे मनोहर सोरप, सौ.सुवर्णा पोवार, सौ. रश्मी अडसुळे, शिवप्रतिष्ठानचे शरद माळी, शिवसेनेचे कमलाकर किलकिले, जयवंत हरुगले, सुनील जाधव, उदय भोसले, रमेश खाडे, दीपक चव्हाण, सागर घोरपडे, धनजी दळवी, तुकाराम साळोखे, रणजीत जाधव, विशाल देवकुळे, अमित चव्हाण, अनिल पाटील, अजित गायकवाड, सुनील करंबे, राजू काझी, सुहास डोंगरे, रणजीत सासणे, रविंद्र सोहनी, राहुल चव्हाण आदी हिंदुत्ववादी संघटनाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here