ब.मो.पुरंदरे यांना पद्मविभूषण देणाऱ्या भाजप शासनाचा मुरगुडमध्ये परिवर्तनवादी संघटनांकडून निषेध

0

ब.मो.पुरंदरे यांना पद्मविभूषण देणाऱ्या भाजप शासनाचा मुरगुडमध्ये परिवर्तनवादी संघटनांकडून निषेध

मुरगूड प्रतिनिधी 
महात्मा जोतिबा व सावित्रीबाई फुले आणि राजर्षी शाहू महाराज या बहुजनांच्या उद्धारासाठी आयुष्यभर झटणाऱ्या कर्त्या सुधारकांना भारतरत्न देण्याची मागणी डावलण्यात आली.ज्यांनी शिवचरित्रात कपोलकल्पित कहाण्या घुसडल्या व सर्व जातीधर्माच्या रयतेचे प्रेरणास्थान राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या बद्दल आक्षेपार्ह लिखाण केले अशा ब.मो.पुरंदरे यांना शिवप्रेमींच्या विरोधास न जुमानता बहुजनांच्या नाकावर टिच्चून महाराष्ट्र भूषण पाठोपाठ आता पद्माविभूषण पुरस्कार देण्यात आला ही बाब गंभीर असून मोदी-फडणवीस सरकारचे हे कृत्य पेशवाईला लाजवणारे आहे असे प्रतिपादन दलीतमित्र डी.डी.चौगले यांनी केले.
मुरगुड ता.कागल येथील समाजवादी प्रबोधिनी,दलित वंचित मागास संघ,कामगार संघटना,संभाजी ब्रिगेड,मूलनिवासी,भारत मुक्ती मोर्चा, फुले शाहू आंबेडकरवादी,डाव्या,परिवर्तनवादी संघटनांच्या निषेध बैठकीत ते बोलत होते.
शहरातील या विविध संघटनांनी समाजवादी प्रबोधिनीच्या कार्यालयासमोरील क्रांती ज्योती स्तंभासमोर धरणे धरून मोदी फडणवीस सरकारचा निषेध केला.
आपल्या भाषणात दलीतमित्र चौगले म्हणाले, “मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आद्यसुधारक व स्त्री शिक्षणाचे उदगाते महात्मा जोतिबा आणि सावित्रीबाई फुले दाम्पत्यांना भारतरत्न देणार असल्याची घोषणा सावित्रीबाई यांच्या माहेर नायगाव येथे केली होती.त्याच बरोबर भारतातील आरक्षणाचे जनक आणि आणि दलित मागासांना शिक्षण देऊन त्यांना उभे करणारे कर्ते सुधारक आणि लोकराजे राजर्षी शाहू यांना भारतरत्न देण्याची मागणी होत असताना ही मागणी डावलणारे व लोकमताचा आदर न करणारे हे सरकार बहुजनांना कस्पटासमान लेखत आहे.गाजरं दाखवून बहुजन समाजाला फसवून सत्तेवर आलेल्या सरकारचा त्यांनी तीव्र शब्दात निषेध केला.
आपल्या भाषणात एम.टी.सामंत म्हणाले,”56 मोर्चे काढणाऱ्या मराठा समाजाला आरक्षण देताना चर्चेचं गुऱ्हाळ लावणाऱ्या सरकारने ब्राह्मण समाजास एकही मोर्चा न काढता आरक्षण दिले.ब्राह्मण संघाच्या पंधरा पैकी चौदा मागण्या झटक्यात मान्य केल्या.बहुजन शेतकरी देशोधडीला लागला असताना पुरोहितांना मात्र 5000 रुपये मानधन देण्याचा निर्णय होत आहे,त्यांच्याही मागण्या पूर्ण कराव्यात पण असा भेदभाव का?असा सवाल त्यांनी केला.फडणवीस सरकारचे हे वागणे लोकप्रतिनिधींच्या हुकूमशाही कडे चालले आहे.आपण निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींना जाब विचारता येत नसेल तर लोकशाही संपण्याच्या मार्गावर आहे हे समजून घ्यावे”.
यावेळी मोदी फडणवीस शासनाचा जातीयवादी भूमिका घेतल्याबद्दल तसेच मागील काँग्रेस शासनाच्या नाकर्ते पणाचा निषेध करण्यात आला.यावेळी जोतिराम सूर्यवंशी,बिद्रीचे माजी संचालक अशोक कांबळे,शिवाजी कांबळे,अशोक दरेकर,कॉ.बबन बारदेस्कर,गणपती आंगज,भिकाजी कांबळे,संभाजी ब्रिगेडचे संजय घोडके,विजय सापळे,एस.एम. कांबळे,रवी कांबळे,अमर देवळे,निवास चौगले, सुनील भोई,प्रदीप वर्णे, सुनील गवळी, डी एम कांबळे उपस्थित होते.
फोटो
राष्ट्रमाता जिजाऊ आणि छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह लिखाण करणारे ब.मो.पुरंदरे यांना महाराष्ट्र भूषण व पद्मविभूषण पुरस्कार देणाऱ्या भाजप सरकारचा निषेध मुरगुड येथील परिवर्तनवादी संघटनांकडून करण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here