जन्मजात आवाज नसणार्‍यांच्या भावना दाबण्याचा पुण्यात प्रकार

0

पुणे (प्रतिनिधी) :

पुण्यात समाज कल्याण आयुक्तालयासमोर आलेल्या कर्णबधिरांच्या मोर्चावर पुणे पोलिसांनी लाठीचार्ज केला आहे. ज्यांना जन्मल्यापासून आवाज नाही अशांच्या भावना दाबण्याचा प्रकार पुणे पोलिसांनी केलाय. या लाठीचार्जमुळे समाजकल्याण आयुक्तालयासमोर तणावपूर्ण स्थिती निर्माण झाली. कर्णबधिरांना शिक्षण रोजगार याच्या अधिकाधिक संधी उपलब्ध करून द्यावा अशी त्यांची प्रमुख मागणी आहे.

आपल्या प्रलंबित मागण्यांकडे सरकारचं लक्ष वेधण्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून कर्णबधिर तरुण-तरुणी सोमवारी पुण्यात आले होते. सोमवारी सकाळपासून पुण्यात समाज कल्याण आयुक्तालयासमोर आंदोलन सुरु होतं. याचवेळी पोलिसांनी त्यांच्यावर लाठीचार्ज करायला सुरुवात केली. पोलिसांच्या लाठीमारात काही युवकांना चांगलाच मार लागला आहे.

प्रशासनाकडे अनेकदा आपल्या मागण्या पोहोचवण्याचा प्रयत्न कर्णबधिर तरुण-तरुणींनी केला. मात्र, त्याकडे नेहमीच दुर्लक्ष झालं. याच मागण्या सरकारपर्यंत पुन्हा एकदा पोहोचवण्यासाठी महाराष्ट्रभरातून आलेल्या कर्णबधिर नागरिकांनी हे आंदोलन सुरू केलं. जर तातडीने सरकारने काही पावलं उचलली नाहीत तर मुंबईकडे मोर्चा काढून चालत जाण्याचं त्यांनी ठरवलं. पण पोलिसांनी याला परवानगी दिली नाही. मात्र, तेव्हाही आमच्यावर अत्याचार झाल्याची भावना या कर्णबधिर तरुणांनी मांडली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here