महात्म्याचे कार्य आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचवण्यासाठी महात्मा फुले यांच्यावरील चित्रपटाची निर्मिती करणार

0

थोर समाज सुधारक महात्मा जोतिबा फुले यांचे जीवनकार्य राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचावे यासाठी त्यांच्या जीवनावरील चित्रपटाची निर्मिती नामांकित आणि व्यावसायिक संस्थेकडून करण्यात येणार आहे. मराठी, हिंदी आणि इंग्रजी या तीन भाषांत तयार होणारा हा चित्रपट वर्षभरात पूर्ण करण्यात येणार असून यासाठी ई-निविदा मागवून संस्थेची निवड करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला.

महात्मा फुले यांचे संघर्षमय जीवन व कृतिशील विचारांचा आढावा या चित्रपटात घेण्यात येणार असून तो ऐतिहासिक सत्यावर आधारित असण्यासह या थोर महात्म्याचे जीवनकार्य यथार्थपणे साकारले जावे यासाठी शासनाकडून तज्ज्ञांची समिती स्थापन करण्यात येणार आहे. दर्जेदार चित्रपट निर्मितीचा अनुभव आणि वितरणाची सक्षम व्यवस्था असणाऱ्या संस्थांकडून ई-निविदा मागविण्यात येऊन पारदर्शक पद्धतीने संस्थेची निवड करण्यात येईल.

चित्रपट निर्मितीचे अर्थकारण, वितरणासाठीचे अत्याधुनिक मार्ग, प्रदर्शनासाठीची नवीन तंत्रज्ञानयुक्त माध्यमे आणि मल्टिप्लेक्समुळे चित्रपट वितरणाचे बदललेले व्यावसायिक गणित या सर्व बाबींचा विचार या चित्रपट निर्मितीसाठी करण्यात येणार आहे. चित्रपटाच्या निर्मितीबरोबरच वितरण आणि प्रदर्शनासाठी व्यापक प्रसिद्धीला महत्त्व देण्यात येणार आहे. यासाठी व्यावसायिक कौशल्याचा वापर करून जनतेपर्यंत महात्मा फुले यांचे जीवनकार्य आणि विचार या चित्रपटाच्या माध्यमातून पोहोचतील यादृष्टीने प्रयत्न करण्यात येतील. मूळ विषयाशी प्रामाणिक राहून उत्कृष्ट दर्जाचा व्यक्तीचित्रणात्मक चित्रपट तयार करून तो व्यापक पातळीवर लोकांपर्यंत पोहोचेल अशाप्रकारे वितरित करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. याच उद्देशाने शासनाकडून या चित्रपटासाठी अनुदान देण्यात येत आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here