ज्येष्ठ विचारवंत डॉ. एन.डी. पाटील यांना यंदाचा प्राचार्य आर.के. कणबरकर पुरस्कार जाहीर

ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या हस्ते १२ जानेवारीला प्रदान समारंभ

0

कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाच्या वतीने देण्यात येणारा प्रतिष्ठेचा प्राचार्य आर.के. कणबरकर राष्ट्रीय पुरस्कार यंदा ज्येष्ठ विचारवंत डॉ. एन.डी. पाटील यांना आज जाहीर करण्यात आला. विद्यापीठाच्या राजर्षी शाहू सभागृहात शनिवार, दि. १२ जानेवारी २०१९ रोजी सायंकाळी ५.३० वाजता ज्येष्ठ नेते व माजी केंद्रीय कृषीमंत्री, खासदार शरद पवार यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान समारंभ होईल, अशी घोषणा कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांनी आज पत्रकार परिषदेत केली.

कुलगुरू डॉ. शिंदे यांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवाजी विद्यापीठाचे माजी कुलगुरू (स्व.) प्राचार्य रा.कृ. कणबरकर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ राष्ट्रीय पातळीवरील पुरस्कार निर्मितीसाठी त्यांच्या कुटुंबियांनी शिवाजी विद्यापीठाकडे २५ लाख रुपयांची ठेव प्रदान केली आहे. श्रीमती शालिनी कणबरकर यांच्यासमवेत झालेल्या सामंजस्य करारातून शिवाजी विद्यापीठाच्या या माजी कुलगुरूंच्या स्मृतिप्रित्यर्थ ‘प्राचार्य आर.के. कणबरकर पुरस्कारा’ची संयुक्त निर्मिती करण्यात आली. देशातील शैक्षणिक, साहित्यिक, सामाजिक, सांस्कृतिक, क्रीडा तसेच अन्य क्षेत्रांत अत्युत्कृष्ट कामगिरी बजावणाऱ्या व्यक्तीला प्राचार्य कणबरकर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ दरवर्षी पुरस्कार देण्यात येतो. रुपये १ लाख ५१ हजार रोख, स्मृतिचिन्ह, मानपत्र, शाल व श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरुप आहे. यापूर्वी, ज्येष्ठ शास्त्रज्ञ भारतरत्न डॉ. सी.एन.आर. राव (२०१६), रयत शिक्षण संस्था (२०१७), ज्येष्ठ निर्माते-दिग्दर्शक डॉ. जब्बार पटेल (२०१८) यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.

यावेळी पुरस्कारासंदर्भात अधिक माहिती देताना कुलगुरू डॉ. शिंदे म्हणाले की, ज्येष्ठ नेते व विचारवंत डॉ. एन.डी. पाटील यांचे आधुनिक महाराष्ट्राच्या सामाजिक, राजकीय, शैक्षणिक जडणघडणीत डॉ. एन.डी. पाटील यांचे अतिशय महत्त्वाचे योगदान आहे. समाजकारणासाठी राजकारणाचा वापर करणाऱ्या एका ध्येयनिष्ठ विचारवंतांच्या फळीचे ते प्रतिनिधी आहेत. नैतिकता हा त्यांच्या प्रत्येक कार्याचा आणि आंदोलनाचा प्रमुख कणा आहे. त्या बळावरच त्यांनी अगदी अलिकडच्या टोल हटाव आंदोलनापर्यंतची अनेक आंदोलने यशस्वी केली आहेत. संयुक्त महाराष्ट्राचा लढा असो, शेतकरी, कष्टकऱ्यांची, कामगारांची चळवळ असो किंवा आजही अव्याहत सुरू असलेला कर्नाटक-महाराष्ट्राचा सीमाप्रश्नाचा लढा असो, डॉ. पाटील यांनी या साऱ्या चळवळींना प्राप्त करून दिलेले नैतिक अधिष्ठान ही फार मोलाची बाब आहे. शिवाजी विद्यापीठाच्या स्थापनेसाठी आग्रही असणाऱ्यांत आघाडीवर असलेल्या डॉ. पाटील यांनी स्थापनेनंतरच्या कालखंडातही विद्यापीठाच्या जडणघडणीत महत्त्वाची भूमिका बजावली आहे. विद्यापीठाच्या पहिल्या सल्लागार समितीच्या सदस्यत्वापासून सुरू झालेला त्यांचा प्रवास पुढे अधिसभा सदस्य, कार्यकारिणी सदस्य, सामाजिक शास्त्र विद्याशाखेचे अधिष्ठाता असा अनेकांगांनी झाला. शिवाजी विद्यापीठाने त्यांच्या योगदानाबद्दल सन २००६मध्ये विद्यापीठाची सर्वोच्च मानद पदवी डी.लिट. देऊन त्यांचा गौरव केला आहे.

यावेळी शोध समितीचे सदस्य डॉ. जे.एफ. पाटील म्हणाले की, समितीच्या अवघ्या एकाच बैठकीत आणि एकमताने यंदाच्या पुरस्कारासाठी डॉ. एन.डी. पाटील यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले. राजकारण, समाजकारण, अर्थकारण, सहकारिता आणि शिक्षण या पाच क्षेत्रांत अधिकारपूर्ण आणि सहज वावर असणारे हे व्यक्तीमत्त्व आहे. संविधान आणि कायद्याच्या शिस्तीतच त्यांनी आपला संघर्ष मांडला. रायगड येथील विशेष आर्थिक क्षेत्रांसाठी (सेझ) संपादित केलेल्या सुमारे ३६ हजार एकर जमिनीसाठीचा लढा हा ऐतिहासिक स्वरुपाचा आहे. छोट्या छोट्या शेतकऱ्यांना संघटित करून व्यवस्थेविरुद्ध अशा प्रकारचा लढा यशस्वी करणे सहजशक्य बाब नव्हती. मात्र पाटील सरांनी केवळ आपल्या शिस्तबद्ध व्यूहरचनेच्या बळावर तो यशस्वी केला. अद्यावत संदर्भांच्या अभ्यासासह भूमिका घेण्याचा त्यांचा गुणधर्म हा एकमेवाद्वितिय स्वरुपाचा आहे. त्यांना पुरस्कार देताना होणारा आनंद हा त्यामुळे खूप मोठा आहे.

यावेळी प्र-कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के, कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर, शैक्षणिक सल्लागार डॉ. डी.आर. मोरे, अधिष्ठाता डॉ. भारती पाटील, शोध समितीचे सदस्य डॉ. जे.एफ. पाटील, प्राचार्य डॉ. बी.ए. खोत आदी उपस्थित होते.

 

डॉ. एन.डी. पाटील यांचा संक्षिप्त परिचय

संपूर्ण नाव : डॉ. नारायण ज्ञानदेव पाटील

जन्म : १५ जुलै १९२९ – ढवळी (नागाव), जि.सांगली येथे अशिक्षित शेतकरी कुटुंबात जन्म

शिक्षण : एम.ए. (अर्थशास्त्र), पुणे विद्यापीठ, (१९५५); एल.एल.बी. पुणे विद्यापीठ (१९६२)

अध्यापन कार्य:

 • १९५४- १९५७ छत्रपती शिवाजी कॉलेज, सातारा येथे प्राध्यापक तसेच ‘कमवा व शिका’ या योजनेचे प्रमुख व रेक्टर
 • १९६० साली कर्मवीर भाऊराव पाटील कॉलेज, इस्लामपूर येथे प्राचार्य

शैक्षणिक क्षेत्रातील कार्य:

 • शिवाजी विद्यापीठ – पहिल्या सल्लागार समितीचे सदस्य (१९६२)
 • शिवाजी विद्यापीठ – सिनेट सदस्य (१९६५)
 • शिवाजी विद्यापीठ – कार्यकारिणी सदस्य (१९६२-१९७८)
 • शिवाजी विद्यापीठ – सामाजिकशास्त्र विभागाचे डीन (१९७६-१९७८)
 • सदस्य, प्राथमिक शिक्षण आयोग,महाराष्ट्र राज्य (१९९१)
 • रयत शिक्षण संथेचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य- (१९५९ पासून)
 • रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन – (१९९० पासून)
 • दक्षिण महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडळ, बेळगाव अध्यक्ष – (१९८५ पासून)

राजकीय कार्य:

 • १९४८ – शेतकरी कामगार पक्षात प्रवेश
 • १९५७ – मुंबई गिरणी कामगार संघटनेचे सरचिटणीस
 • १९६०-६६,१९७०-७६,१९७६-८२ अशी एकूण १८ वर्षे महाराष्ट्र विधान परिषदेचे सदस्य
 • १९६९- १९७८, १९८५ – २०१० – शे.का.प.चे सरचिटणीस
 • १९७८-१९८० – सहकारमंत्री, महाराष्ट्र राज्य
 • १९८५-१९९०- महाराष्ट्र विधानसभा सदस्य (कोल्हापूर मतदारसंघाचे प्रतिनिधी)
 • १९९९-२००२ – निमंत्रक, लोकशाही आघाडी सरकार
 • महाराष्ट्र राज्य सीमाप्रश्न समितीचे सदस्य व सीमा चळवळीचे प्रमुख नेते.

मिळालेले सन्मान / पुरस्कार:

 • भाई माधवराव बागल पुरस्कार (१९९४)
 • स्वामी रामानंदतीर्थ विद्यापीठ, नांदेड – डी.लीट.पदवी (१९९९)
 • राष्ट्रीय बियाणे महामंडळ (अध्यक्षपद) भारत सरकार (१९९८ – २०००)
 • डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ – डी.लीट. पदवी (२०००)
 • विचारवेध संमेलन, परभणी अध्यक्षपद (२००१)
 • शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर – डी.लीट. पदवी (२००६)
 • शाहीर पुंडलिक फरांदे पुरस्कार

भूषविलेली पदे:

 • रयत शिक्षण संस्थेचे मॅनेजिंग कौन्सिल- सदस्य
 • समाजवादी प्रबोधिनी ,इचलकरंजी – उपाध्यक्ष
 • अंधश्रद्धा निमूर्लन समिती,महाराष्ट्र – अध्यक्ष
 • डॉ.बाबासाहेब आंबेडकर अकादमी , सातारा – अध्यक्ष
 • जागतिकीकरणविरोधी कृती समिती – मुख्य निमंत्रक
 • म.फुले शिक्षण संस्था, इस्लामपूर – अध्यक्ष
 • दक्षिण महाराष्ट्र शिक्षण प्रसारक संस्था, बेळगाव – अध्यक्ष
 • महाराष्ट्र राज्य सीमा प्रश्न समिती – सदस्य

प्रसिद्ध झालेले लेखन:

 • समाजविकास योजनेचे वस्त्रहरण (पुस्तिका)
 • शेतजमिनीवरील कमाल मर्यादा आणि महाराष्ट्र सरकारचा प्रतिगामी कायदा (पुस्तिका) (१९६२)
 • काँग्रेस सरकार आणि शेतकऱ्यांची लूट (पुस्तिका) (१९६२)
 • शेतीमालाला किफायतशीर किमतीची हमी आणि घाऊक व्यापाराचे राष्ट्रीयीकरण (पुस्तिका) (१९६३)
 • वाढती महागाई आणि ग्राहकांची ससेहोलपट (पुस्तिका) (१९६६)
 • महाराष्ट्र सरकारच्या श्वेतपत्रिकेचे (White Paper) कृष्णस्वरूप (पुस्तिका) (१९६७)
 • शेतीमालाच्या किफायतशीर किमतीची कैफियत (पुस्तक) (१९७०)
 • शेवटी हे शिक्षण आहे तरी कोणासाठी? (पुस्तिका) (१९९२)
 • महर्षी विठ्ठल रामजी शिंदे (पुस्तिका)
 • नववे विचारवेध संमेलन परभणी, अध्यक्षीय भाषण, (२००१) (नवसाम्राज्यवादी युगातील भारतीय लोकशाहीसमोरील आव्हाने)

रयत शिक्षण संस्थेतील विशेष कार्य:

 • चेअरमन पदाच्या काळात : औद्योगिक प्रशिक्षण संस्था, आश्रमशाळा, साखरशाळा, नापासांची शाळा, श्रमिक विद्यापीठ, संगणक शिक्षक केंद्र, कर्मवीर भाऊराव पाटील इन्फॉर्मेशन अॅण्ड टेक्नोलॉजी इन्स्टिट्यूट, ‘कमवा व शिका’ या योजनेवर भर, स्पर्धा परीक्षा केंद्रे, गुरुकुल प्रकल्प, लक्ष्मीबाई पाटील शिष्यवृत्ती योजना, सावित्रीबाई फुले दत्तक – पालक योजना यांची राबवणूक, दुर्बल शाखा विकास निधी, महर्षी वि. रा. शिंदे अध्यासन केंद्र आदींची स्थापना, कर्मवीर विद्याप्रबोधिनीमार्फत विविध पुस्तकांची निर्मिती.
 • डॉ.बाबासाहेब आंबेडकर अकादमी, समाजवादी प्रबोधिनी, अंधश्रद्धा निर्मुलन समिती या संस्थांच्या सहकार्याने विद्यार्थी, शिक्षक –प्राध्यापक प्रबोधन कार्याला चालना.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here